आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भय इथले संपत नाही... अश्रू आटले, शोक कायम!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी शहर- लांडकवाडी येथील तरुण शेतकरी सोन्याबापू कावळे म्हशीची धार काढत असताना अंगावर विजेची तार पडल्याने पोळ्याच्या दिवशी गतप्राण झाला. या घटनेला दहा दिवस उलटून गेले, तरी इथले भय मात्र संपलेले नाही. मंगळवारी दशक्रिया विधी झाला. तरुण मुलाच्या एकाएकी मृत्यूच्या धक्क्यातून हे कुटुंब अजून सावरलेले नाही. डोळ्यांतील अश्रू आटले असले, तरी शोक अजूनही ताजाच आहे. महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणाबद्दल गावातील प्रत्येकाच्या मनात चीड असून या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. 


जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, पंचायत समितीचे उपसभापती विष्णूपंत अकोलकर, गटनेते सुनील ओव्हळ यांच्याशी बोलताना ग्रामस्थांनी ही संतप्त भावना व्यक्त केली. गरज पडल्यास संपूर्ण गावाने सहकुटुंब आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. 


राहुल राजळे यांनी या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी स्वीकारली असून त्यादृष्टीने त्यांनी पावले उचलली आहेत. दरम्यान, हा अपघात झाल्यानंतर महावितरणने जुजबी उपाययोजना केली असली, तरी वारंवार तारा तुटण्याच्या प्रकारामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. कक्ष अभियंता वैभव सिंग यांच्या उद्दामपणाचा पाढाच ग्रामस्थांनी राजळेंसमोर वाचला. यावेळी सरपंच रभाजी गर्जे, उपसरपंच म्हातारदेव जिवडे, मृताचे वडील अर्जुन कावळे, नामदेव गर्जे, सावकार गर्जे, माजी सरपंच संदीप गर्जे, गणेश गर्जे, विलास गर्जे, अरुण गर्जे, जालिंदर गर्जे, संपत गर्जे, विक्रम आंधळे, बबन आंधळे, भाऊसाहेब आंधळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


येत्या २४ सप्टेंबरला आंदोलन 
महावितरणच्या विरोधात २४ सप्टेंबरला आंदोलन करण्यात येणार आहे. जोपर्यंत महावितरण कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन संबंधित कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत जाहीर होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा मानस ग्रामस्थांनी उपस्थितांसमोर व्यक्त केला. गटनेते सुनील ओव्हळ यांनी तशा आशयाचे निवेदन तहसीलदार नामदेव पाटील व पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांना दिले आहे. 

बातम्या आणखी आहेत...