आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांची तक्रार : कारखान्यांच्या मापात पाप, सरकारचा दावा : एकाही वजनकाट्यात घोळ नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील साखर कारखाने शेतकऱ्यांकडून ऊस घेताना वजनकाट्यात 'माप' मारत असल्याची अनेक शेतकऱ्यांची व शेतकरी संघटनांची तक्रार असते. त्याची दखल घेऊन मागच्या हंगामात गाळप घेतलेल्या खासगी आणि सहकारी अशा १८६ साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या भरारी पथकाकडून तपासणी करण्यात अाली. त्याचा अहवाल नुकताच सहकार विभागाला सादर करण्यात अाला असून त्यात एकाही कारखान्याच्या वजनमापात घाेळ नसल्याचे स्पष्टीकरण या पथकांनी दिले अाहे. या पथकात वैधमापन शास्त्रचे निरीक्षक, महसूल विभाग, पोलिस यांच्यासह शेतकरी संघटनेचे प्रतिनिधीही हाेते. दुसरीकडे, शेतकरी संघटनेने मात्र वजनकाट्यांची ही तपासणी फार्स ठरल्याचा आरोप केला असून कारखान्यांचे वजनकाटे आॅनलाइन करण्याची मागणी केली आहे. 

 

कारखाने उसाच्या वजनात काटा मारत असल्याच्या शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासून तक्रार होत्या. अखेर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी गेल्या वर्षी सर्व साखर कारखान्यांच्या काट्यांची तपासणी करण्याचे आदेश साखर आयुक्तांना दिले हाेते. आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ७ आॅक्टोबर २०१७ रोजी पत्र पाठवून भरारी पथकामार्फत वजनकाट्यांची तपासणी करण्यात सांगितले हाेते. 

 

नोव्हेंबर ते फेब्रुवारी २०१८ दरम्यान १०१ खासगी आणि ८६ सहकारी साखर कारखान्यांची भरारी पथकांनी तपासणी केली. 'आमच्याकडील २० ग्रॅमची प्रमाणित वजने कारखान्याच्या वजनकाट्यावर ठेवून नोंदी घेतल्या. तसेच नुकतेच उसाचे वजन केलेल्या ट्रक व ट्रॅक्टर परत बोलावून त्या वजनाची पुन्हा खातरजमा केली. पण काट्यात गडबड आढळली नाही, असे वैधमापन शास्त्र विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. प्रत्येक जिल्ह्यातील भरारी पथकांनी आपले अहवाल जिल्हाधिकारी यांना आणि जिल्हाधिकारी यांनी साखर आयुक्तांना तपासणी अहवाल पाठवले आहेत. यंदाचा गाळप हंगाम २० आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कारखान्यांना क्लीन चिट मिळाली अाहे. 

 

ऊस एफआरपी रक्कम वाढत चालल्याने तीन वर्षांपासून कारखान्यांनी अर्धा टक्क्याने रिकव्हरी कमी दाखवण्याची चलाखी चालवली आहे. त्यामुळे टनामागे शेतकऱ्यास २५० ते ३०० रुपयांचा फटका बसतो. हंगामात कारखाने १० लाख टन ऊस गाळप करतो. म्हणजे रिकव्हरीच्या चलाखीतून कारखाने वर्षाला ३० कोटी लाटत असल्याचा अाराेपही शेतकरी संघटनेने केला अाहे. 

 

५०० टनांपेक्षा जास्त उसाला अाधार सक्ती करा 
रोज ५ हजार टन गाळप असणाऱ्या कारखान्यात रोज ५०० ते ५५० टन ऊस काटा मारून जमा होतो. तो बोगस व्यक्तीच्या नावे दाखवतात. म्हणून ५०० टनांपेक्षा जास्त ऊस कारखान्याला पाठवणाऱ्यांना आधार कार्ड जोडणी सक्तीची करावी. कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाइन करावेत. साखर आयुक्तांकडून ओटीपी घेतल्याशिवाय वजन न करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. 

 

वर्षाकाठी तब्बल ३० काेटींच्या फसवणुकीचा अाराेप 
राज्यात दरवर्षी सुमारे ८ कोटी मेट्रिक टन उसाचे गाळप होते. कारखाने २० टक्के काटा मारत असल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप आहे. म्हणजे एका हंगामात शेतकऱ्यांचा ८० लाख टन ऊस काटेमारीत जातो. ३००० टन ऊस दर पकडल्यास शेतकऱ्यांची दरवर्षी काटेमारीत २४०० कोटी रुपयांची लूट होते. 

बातम्या आणखी आहेत...