आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघनसावंगी - जिल्ह्यात दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत असतानाच नापिकीमुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सावकार,नातेवाईक आणि बँक कर्जाच्या विवंचनेमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी येथील बाबासाहेब परभत राऊत या शेतकऱ्याच्या घरी येऊन एकाने ९०० रुपयांसाठी तगादा लावला होता.
मात्र हे पैसे कसे देणार या विवंचनेतून राऊत यांनी शेतात जाऊन विषारी औषध प्राशन करत आपले जीवन संपवले. अवघ्या ९०० रुपयांसाठी शेतकरी प्राणाला का कवटाळत आहेत, हे आत्महत्या केलेले शेतकरी बाबासाहेब राऊत यांच्या पत्नी कासाबाई यांनी सांगितलेल्या व्यथेतून स्पष्ट होते.
''मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास आम्ही घरात चहा घेत होतो. त्यावेळी एक व्यक्ती आमच्या दारात आला. पती बाबासाहेब राऊत यांनी त्याच्याकडून ९०० रुपये हातउसने घेतले होते. त्या रकमेची त्याने पतीकडे मागणी केली. आमची तंगी आहे, तुमचे पैसे नंतर देतो असे त्यांना सांगितले. मात्र त्याने पैसे आत्ताच पाहिजे, असे म्हणत तगादा लावला. या वेळी त्याच्यासोबत वाद झाला. त्यानंतर पैसे मागणारा तो माणूस निघून गेला. या वादानंतर मालक काही वेळ विचार करत बसले. मी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला, मात्र ते काहीच न बोलता शेतात निघून गेले.
त्यानंतर दुपारी त्यांनी आत्महत्या केल्याची खबर मिळाली. शेतात काहीच पिकत नसल्याने उसनवारी कशी फेडायची हीच चिंता त्यांना लागली होती. यावर्षी खर्च करून सव्वा एकरात कपाशी लावली मात्र त्यातून अवघा ७० किलो कापूस हाती आला. कपाशीवर केलेला खर्च सोडाच परंतु बियाण्याचेही पैसे वसूल झाले नाही. त्यातच नातेवाईक आणि इतरांकडून हातउसने घेतलेल्या पैशासाठी लोकांचा तगादा सुरू होता. पैशासाठी घरी आलेल्या प्रत्येकाला हात जोडून परत पाठवताना मालकांना मोठी कसरत करावी लागत होती. तगादा लावणारा परत पाठवला तरी पुन्हा तो दारात येतो.
प्रत्येक वेळी त्याला काय सांगणार हाच मोठा प्रश्न होता. शेती पिकत नसल्याने मोठा मुलगा दुसऱ्याच्या शेतात ७० हजार रुपये वर्षाप्रमाणे सालगडी म्हणून काम करतो आहे तर छोटा मुलगा जालन्यात वाहन चालवण्याचे काम करतो आहे. जवळपास तीन ते चार लाख रुपयांचे देणे,त्यातच घरखर्च असा ताळमेळ जमवावा लागत होता. दररोजच्या या तगाद्यातून सुटका करण्यासाठी पतीने आत्महत्या केली.
तलाठ्याकडून पंचनामा : तलाठी आर. एम. वैद्य यांनी गावात जाऊन सात शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा केला. यात सव्वा एकर शेतात केवळ ७० किलो कापूस झाल्याचे समोर आले आहे. या कुटुंबात सात जणांचा समावेश आहे. मृताच्या दोन्हीही मुलांचे लग्न झालेले आहे.
> कपाशीवरील खर्च सोडाच, परंतु बियाण्यांचेही पैसे वसूल झाले नाही
- मुलगा करतोय सालदारकी
आत्महत्या केलेले बाबासाहेब राऊत यांना दोन मुले आहेत. २६ वर्षांचा ज्ञानेश्वर राऊत हा मुलगा हातडी कंडारी येथे सालदारकी करत होता. यातून त्याला वर्षाला ७० हजार रुपये मिळते. परंतु, ही रक्कम त्याच्याच कुटुंबीयावर खर्च होत होती. यामुळे घरात आर्थिक उत्पन्न नसल्यामुळे खासगी सावकाराचे कर्ज फिटणे अवघड होत होते.
मजुरीवरच चालवायचा घर
शेतातील पीक गेल्यामुळे राऊत व त्यांचे कुटुंब रोजंदारी करून उदरनिर्वाह चालवत हाेते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रोजंदारीही मिळत नसल्यामुळे ते तणावाखाली आले होते. बाबासाहेब यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. घरात दोन मुले, पत्नी, आई असे कुटुंब आहे.
विहीर, पण पाणी नाही
राऊत यांच्या शेतात विहीर आहे. सध्या पाणी नसल्यामुळे कपाशीला पाणी देता न आल्याने कपाशी जळून गेली. दरम्यान, राणी उंचेगाव येथील महाराष्ट्र बँकेत पीक कर्जासाठी चकरा मारल्या. परंतु, त्या ठिकाणी कर्ज न मिळाल्यामुळे ते अनेक दिवसांपासून तणावाखाली राहत होते, असे नातेवाइकांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.