आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उड्डाणपुलाबाबत मनपा उदासीन; अनुदान प्रस्तावामध्ये शासनाने दाखवल्या ८ त्रुटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरातील वाढती वाहतूक समस्या पाहता पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दोन उड्डाणपूल मंजूर करून आणले. परंतु, महापालिकेची काम करण्याची मंद गती पाहता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात खो घालण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. 


जुना पुणे नाका आणि मार्केट यार्डपासून ते पत्रकार भवनपर्यंत दोन उड्डाणपूल होणार आहेत. महापालिकेच्या वतीने भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. यासाठी महापालिकेने सुनावणी घेतली. भूसंपादनासाठी १२० कोटींची गरज आहे. ती रक्कम शासनाकडून मिळावी यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला. परंतु, तो प्रस्ताव अर्धवट आहे. त्यात आठ प्रकारच्या त्रुटी आहेत. त्रुटींची पूर्तता त्वरित करून पाठवा, असे पत्र शासनाने महापालिकेकडे ४ आॅक्टोबर रोजी पाठवले. मनपाने त्रुटींची पूर्तता अद्याप केली नाही. 


त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न 
उड्डाणपुलासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी प्रयत्न केले. भूसंपादनासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर करताना परिपूर्ण असणे आवश्यक आहे. त्यात काही त्रुटी काढून महापालिकेस कळवले असेल तर त्याबाबत पाठपुरावा करून त्यांची पूर्तता केली जाईल. 
- शोभा बनशेट्टी, महापौर 


या आहेत प्रस्तावातील त्रुटी, अद्याप नाही केली पूर्तता 
१. उड्डाणपुलाच्या फेरबदलासाठी प्रसिद्ध केलेला नकाशा प्रस्तावात नाही. 
२. फेरबदल प्रस्ताव शासनाच्या राजपत्रात आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध केला नाही. 
३. उड्डापुलासाठीची जागा शासकीय, रेल्वे व पोलिस विभागाची आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांची सुनावणी घेतली नाही. खासगी मालकांना वैयक्तिक नोटीस दिली नाही. 
४. सुनावणीवर ७२७ जणांच्या हरकती व सूचना आल्या. त्यापैकी ५४१ जणांनी उड्डाणपुलास विरोध केला. त्यावर प्राधिकरणाचे म्हणणे आणि निर्णय प्रस्तावात दिले नाही. 
५. रस्ता रुंदी ही मंजूर नगर रचना योजना क्रमांक १, २, ३, ४ क्षेत्रातून प्रस्तावित असल्याचे दिसून येते. त्यात महापालिकेने कार्यवाहीचा तपशील दिला नाही. बदलाची कार्यवाही करणेकामी प्राधिकृत करण्यास महापालिकेने शासनाकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. 
६. काही आरक्षणाचे क्षेत्र व आकार प्रस्तावित रुंदीनंतर वापराकरिता पुरेसा असेल का? याचा अहवाल प्रस्तावात सादर केला नाही. 
७. भाग नकाशा विनास्वाक्षरीचे आहे. रुंदीकरण संपूर्ण रस्त्याचे नाही. गुरुनानक चौकापर्यंत भाग नकाशा आहे. नकाशा अपूर्ण आहे. 
८. फेरबदल २९ मार्च व ४ एप्रिल रोजी राजपत्रात प्रसिद्ध झाले. त्यावर सूचना व हरकतींसाठी एक महिन्याची वाट न पाहता ७ एप्रिल रोजी फेरबदलाचा अंतिम ठराव केला. ४ मेपर्यंत काही हरकत प्राप्त झाले असतील तर त्याचा विचार होणे आवश्यक आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...