आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिर्यादीनेच पैसे हडपून दिली पोलिसांत तक्रार; तपासानंतर तोच ठरला आरोपी, असा समोर आला बनाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - चोरट्यांनी एक लाख रुपये लुटल्याचा बहाणा करत पोलिसांत तक्रार देणारा फिर्यादीच तपासात आरोपी निघाल्याचे अवघ्या २४ तासांत निष्पन्न झाले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून चंदनझिरा पोलिसांकडे मुद्देमालही काढून दिला. करण किसन खैरे (२२, मस्तगड, जुना जालना) असे या आरोपीचे नाव आहे. 


करण खैरे हा नवीन एमआयडीसीत विजय स्क्रॅप कंपनीत मागील सहा महिन्यांपासून ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. दरम्यान, शुक्रवारी कंपनी मालक अनुप अग्रवाल यांनी त्याला एमआयडीसीतील रवी चौधरी यांच्याकडून एक लाख रुपये घेऊन ते राजेश काळे यांना पोहोचवून दे, असे सांगितले होते. ठरल्याप्रमाणे करणने एक लाख रुपये घेतले मात्र तेथेच त्याची नियत बदलली. तिघा चोरट्यांनी मारहाण करून एक लाख रुपये लुटल्याचे सांगत त्याने रात्री नऊ वाजेदरम्यान चंदनझिरा पोलिसांत तक्रार दिली. पोलिस अधीक्षक एस.चैतन्या यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी तपास सुरू केला. संशयित आरोपींचा शोध घेतला. मात्र, त्यातून काहीच माहिती समोर आली नाही. यामुळे पोलिसांनी फिर्यादी करणलाच विचारपूस केली. या वेळी त्याच्या जबाबात पोलिसांना तफावत आढळून आली. करणची कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरीचा बनाव केल्याची कबुली दिली. तसेच लोकांचे कर्ज फेडायचे असल्याने हा प्रकार केल्याची सांगितले व पंचासमक्ष घरातून एक लाख रुपये काढून दिले. 


२४ तासांत लागला गुन्ह्याचा छडा 
पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा छडा लागला, शिवाय रोख रक्कमही ताब्यात आली. पोलिस अधीक्षक एस.चैतन्या, अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार, डीवायएसपी शीलवंत ढवळे, स्थानिक गुन्हे शाखेचे राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलिस कर्मचारी अनिल काळे, अजय फोके, चालक मच्छिंद्र निकाळजे यांनी ही कारवाई केली. 

 

 

बातम्या आणखी आहेत...