आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री राव यांनी मोदी फॅक्टरपासून वाचण्यासाठी सार्वत्रिक निवडणुकीच्या ६ महिने आधी निवडणूक घेतली; आता काँग्रेस-तेदेप आघाडी ठरली आव्हान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - केवढा अनोखा योगायोग आहे पाहा, ज्या चंद्राबाबू नायडू यांनी तेलंगणच्या स्वतंत्र राज्यास मोठा विरोध केला होता तेच आज जय तेलंगणची घोषणा देत आहेत. भारतीय राजकारणाचा हा स्वभावच आहे. जवळपास साडेचार वर्षे जुन्या या राज्यात ७ डिसेंबरला मतदान होत आहे. एकीकडे तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षांची आघाडी आहे, त्यास महाकुटुमी नावाने आेळखले जाते. यामध्ये काँग्रेसशिवाय चंद्राबाबू यांचा तेलुगू देसम पार्टी (तेदेप) आहे. चंद्राबाबू शेजारी राज्य आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांचा तेलंगणातही चांगला प्रभाव आहे.

 

केसीआर या नावाने प्रसिद्ध चंद्रशेखर राव यांनी मुदतीच्या सहा महिने आधी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. राज्यातील विधानसभा निवडणुका सार्वत्रिक निवडणुकीसोबत व्हाव्यात, अशी त्यांची इच्छा नव्हती. दोन्ही निवडणुका एकाच वेळी झाल्या असत्या तर त्यांना मोदी फॅक्टरचा सामना करावा लागला असता. केसीआर यांनी दिल्लीत मोदींची भेट घेऊन सार्वत्रिक निवडणुकीत टीआरएसची मदत मिळेल, असे आश्वासन दिले. त्या बदल्यात राज्यात लवकर निवडणूक व्हावी यासाठी त्यांना मदत करण्याचे आवाहन केल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मोदींसाठी ही वाईट तडजोड नव्हती. कारण, तेलंगणात भाजप फार मोठी शक्ती नाही. अशा स्थितीत त्यांना टीआरएसची मदत मिळाल्यास लोकसभेच्या निवडणुकीत मोठी मदत मिळू शकते. असे असले तरी त्यांनी अशा प्रकारचे आश्वासन २०१४ मध्ये सोनिया गांधी यांना दिले होते. मात्र, ते नंतर फिरले. केसीआर यांच्यावर सध्या प्रचारात निशाणा साधला जात आहे. एकेकाळी रालोआचे सदस्य, काँग्रेसविरोधी असणारे चंद्राबाबू आता राहुल यांच्यासोबत एकाच मंचावरून प्रचार करत आहेत. राहुल, चंद्राबाबू केसीआरविरोधात आक्रमक प्रचार करत आहेत. राहुल तर राज्य सरकारला ‘४ लाेकांची गँग’ संबोधतात. चार लोक म्हणजे, केसीआर, त्यांचे पुत्र केटी रामाराव, मुलगी कविता व भाचे हरीश राव. तेलंगणमध्ये आंध्राशी चांगले संबंध असणारा मोठा वर्ग आहे. या वर्गास विरोधी महाआघाडीशी जोडण्याचे काम चंद्राबाबू नायडू करत आहेत. हे मतदार नायडू यांचे उघड समर्थन करतात. नायडू यांच्या भाच्या सुहासिनी यांना हैदराबाद शहरातून उमेदवारी दिली आहे. हैदराबादमध्ये आंध्राशी संबंध असणाऱ्या लोकांची मोठी संख्या आहे. आता त्यांच्यात सुहासिनी यांचा स्थानिक उमेदवार म्हणून प्रचार केला जात आहे. केसीआर पुत्र केटीआर यांनी नायडू यांच्या हल्ल्यास प्रतिहल्ला करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. एका सभेत केटीआर म्हणाले की, हा लढा आंध्रापर्यंत घेऊन जाणार आहोत. म्हणजे, समोरासमोरची ही लढाई आंध्र विधानसभा निवडणुकीमध्येही दिसेल.

 

तेलंगण निवडणुकीत माध्यमांचीही मोठी भूमिका आहे. अनेक माध्यमे आंध्राशी संबंधित आहेत. तेलंगण स्थापनेत आंध्रविरोधी लाटेचाही हात होता. तेलंगण निर्मितीनंतर काही 
माध्यमे शांत झाली, तर काहींना जाहिराती देऊन शांत केले. त्यामुळे माध्यमांत केसीआर सरकारविरुद्ध जास्त आले नाही. परिणामी सर्व मनासारखेच चालले आहे, असा केसीआर यांचा भ्रम झाला. निवडणूक येताच त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आली.

बातम्या आणखी आहेत...