आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे- हेल्मेट सक्तीस सुरुवात केल्यानंतर पुण्यात रोजच किस्से घडू लागले आहेत. हेल्मेट सक्तीचा पुणेरी पगडी व डोक्यावर पातेलेे ठेवून लोकांनी विरोध केल्याचा प्रकार समोर आला असताना आता पुणे पोलिसांनीही त्यावर कळस केला आहे. चक्क रिक्षाचालकांनाच हेल्मेट घातले नाही म्हणून पोलिसांनी दंडाची पावती दिली आहे.
विशेष म्हणजे, हा प्रकार एखाद्यासोबत नव्हे तर अनेक रिक्षाचालकांसोबत घडला आहे. ही बाब शिवनेरी रिक्षा संघटनेने समाेर आणली आहे. वाहतुकीचे नियम माेडणाऱ्या वाहनचालकांना ई-चलनाद्वारे दंडाची आकारणी केली जाते. वाहतूक पाेलिसांच्या अॅपवरही हे चलन उपलब्ध हाेते. त्याचप्रमाणे वाहनचालकांच्या पत्त्यावर ते पाठवले जाते. संबंधित पावतीत वाहन क्रमांक, नियम ताेडल्याचा दिवस अाणि वेळ त्याचप्रमाणे काेणत्या प्रकारचा नियम ताेडला आहे, याबाबतचा तपशील दिला जाताे. अशाच प्रकारचा तपशील असलेल्या काही पावत्या रिक्षाचालकांना मागील काही दिवसांत मिळू लागल्या आहेत. त्यात काेणता नियम ताेडला या बाबी अंर्तगत 'विदाऊट हेल्मेट' या शीर्षकाखाली दंड आकारण्यात येत आहे. शिवनेरी रिक्षा संघटेनेचे अध्यक्ष अशाेक साळेकर यांनी सांगितले की, अशा प्रकारे काही रिक्षांचालकांना दंड आकारण्यात आला आहे. रिक्षाचालकांना हेल्मेट सक्ती नसतानाही वाहतूक पाेलिसांकडून अशा प्रकारे बेकायदेशीर पावत्या पाठवल्या जात आहे. वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागू नये, याची दक्षता पाेलिसांनी बाळगावी. याबाबत संबंधित वाहतूक पाेलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना माहिती देऊ, असेही साळेकर यांनी सांगितले आहे.
चुकीच्या दिल्या पावत्या, रद्द केल्या
वाहतूक पाेलिस उपआयुक्त तेजस्वी सातपुते म्हणाल्या, हेल्मेट न घातल्याप्रकरणी रोज सुमारे ५ हजारांपेक्षा अधिक पावत्या दिल्या जात असून काही वेळा अनवधानाने अशा प्रकारची चूक हाेऊन एखाद्या दुचाकीची पावती तीनचाकी, चारचाकी वाहनास मिळते. महिन्यातून असे २ ते ३ प्रकार घडत आहेत. शहरात तीन वर्षांपासून सीसीटीव्ही बसवले असून वाहन क्रमांक व्यवस्थित न मिळाल्यास अशा प्रकारच्या तक्रारी दर महिन्याला येत असतात. अशी चूक लक्षात आणून दिल्यानंतर खातरजमा करून सदर पावती रद्द केली जाते व काेणताही दंड आकारला जात नाही. रिक्षाचालकांना चुकून पावतीचा दंड आकारला गेला हाेता व ताे रद्दही करण्यात आला आहे. मात्र, अद्याप याप्रकरणी कुणीच आपणास भेटावयास आलेले नाही, असेही त्या म्हणाल्या.
आतापर्यंत ३० हजारांपेक्षा जास्त वाहनधारकांवर कारवाई
हेल्मेट न घातल्याप्रकरणी पुण्यात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रोज सुमारे ५ हजार, तर १ जानेवारीला ७५००, २ जानेवारीला ७५७५, ३ जानेवारीला ९५१९ तर ४ जानेवारीला ५ हजारांहून अधिक वाहनधारकांवर कारवाई करून दंड आकारण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यात हेल्मेट सक्तीचा विरोध अजूनही कायमच आहे. पोलिसांनी त्यास न धजावता कारवाई अधिकच कडक केली आहे. दुसरीकडे, विविध दुकानांत तसेच रस्त्यांच्या कडेला हेल्मेटची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.