आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळ: जेथे कुणीच पोहोचू शकत नव्हते तेथून मच्छीमारांनी लोकांना वाचवले, विद्यार्थी वाटताहेत पॉवर बँक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवनंतपुरम- केरळमध्ये रविवारी पाऊस थोडा थांबला. पाणीपातळीही कमी झाली. मात्र, अजूनही १४ जिल्हे पाण्यात आहेत. लष्कर, नौदल, हवाई दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ, केरळ पोलिस, अग्निशामक दल असे सर्व बचावकार्यात आहेत. यात सर्वात महत्त्वाची भूमिका मच्छीमार बजावत आहेत.


‘सन्स ऑफ द सी’ म्हणून ओळखले जाणारे हे मच्छीमार  अनेकांचे प्राण वाचत आहेत. कोल्लम, एर्नाकुलम आणि अलपुझा येथे मच्छीमारांनी अनोखे बचावकार्य केले आहे. केरळ स्वतंत्र मलसयाथोझिलाली फेडरेशनने जागोजाग केंद्र उभे करून मच्छीमारांचे गट केले आहेत. छोट्या वस्त्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ज्या भागात सरकारी यंत्रणा पोहोचू शकत नाही अशा भागांत हे मच्छीमार बचावकार्य करत आहेत. हे स्थानिक मच्छीमार असल्याने त्यांना प्रत्येक भागाची खडान््खडा माहिती आहे. आपल्या छोट्या नावांच्या मदतीने हे लोक पूरग्रस्तांना वाचवत आहेत. हे मच्छीमार गरीब आहेत. त्यांच्याकडे नावा आहेत. ते प्रशासनाकडून फक्त डिझेल घेत आहेत. लोक आभार मानतात तेव्हा हे मच्छीमार म्हणतात, ‘आम्ही तर पाण्याचेच पुत्र... आभार ते कसले!’


विद्यार्थीही सरसावले, केली अनोखी मदत
तिरुवनंतपुरमच्या अभियांत्रिकीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी वीज नसल्यामुळे मोबाइल चार्ज होऊ शकणार नाहीत हे ओळखून वेगळा प्रयोग केला. त्यांनी डेटा केबल आणि चार बॅटरी जोडून तात्पुरत्या स्वरूपाच्या पॉवर बँक तयार केल्या आहेत. जागोजाग उभ्या करण्यात आलेल्या मदत छावण्यांत ते या पॉवर बँक लोकांना वाटत आहेत.


गर्भवतीचे वाचवले प्राण, डिलिव्हरी झाल्यानंतर कमांडो विजय म्हणाले,  यापेक्षा मोठा आनंद नाही 
बुडत असलेल्या घराच्या छतावरून कमांडो विजय वर्मा यांनी एका गर्भवती महिलेचे प्राण वाचवले. काही वेळानंतर महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. बचाव कार्यातील पुढील टप्पा पूर्ण करून जेव्हा ते तळावर आले तेव्हा बाळाच्या जन्माबद्दल कळले. हे ऐकून विजय म्हणाले की, एका सैनिकासाठी व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळीवर यापेक्षा आनंदाची आणि समाधानाची बाब दुसरी कोणती असू शकत नाही. 


प्रशांत यांनी दोन वर्षांच्या मुलास कवटाळून त्याला एअरलिफ्ट केले
विंग कमांडर प्रशांत हेलिकॉप्टरद्वारे दोरखंडाच्या साहाय्याने अलेप्पीतील दुमजली इमारतीच्या छतावर उतरले. दोन वर्षांच्या मुलाला छातीशी कवटाळून त्याला हेलिकॉप्टरपर्यंत घेऊन आले. हेलिकॉप्टरमध्ये त्या चिमुकल्याची आई डोळ्यात तेल घालून बाळाची प्रतीक्षा करत होती. मुलाला कवटाळल्यानंतर आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. तिने प्रशांत यांच्यासह सर्व जवानांचे आभार मानले. 


राज्य सरकारतर्फे आणखी ३० टन मदत सामग्री केरळसाठी रवाना
पूरग्रस्त केरळमधील अापद््ग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्रानेही हात पुढे केला अाहे. शनिवारी सायंकाळी पूरग्रस्तांसाठी ६.५ टन मदतसाम्रगी जहाजाद्वारे रवाना करण्यात अाली. त्यापाठाेपाठ रविवारीही अाणखी ३० टन मदत सामग्री मुंबईहून हवाई दलाच्या विशेष विमानाने पाठवण्यात आली. याशिवाय आणखी ५ टन मदतसामग्री साेमवारी सकाळी पाठवण्यात येणार आहे. यात अन्न पाकिटे, दूध पावडर, ब्लँकेट, बेडशीट्स, कपडे, साबण, सॅनिटरी नॅपकिन्सचा समावेश अाहे.  

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून २० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा आधीच केली आहे. त्यांच्याच निर्देशानुसार, मदतकार्यासाठी  एक नियंत्रण कक्ष मंत्रालयात  २४ तास कार्यान्वित करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या व्यतिरिक्त एमसीएचआय-क्रेडाई, राजस्थानी वेल्फेअर असोसिएशन, जितो इंटरनॅशनल, रिलायन्स रिटेल यासारख्या विविध संस्था, संघटना या कामात सक्रिय योगदान देत आहेत. राज्य सरकार सातत्याने केरळ सरकारमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून निकडीच्या बाबी प्राधान्याने पाठवल्या जात आहेत. शनिवारी राज्यभरातील विविध सामाजिक संघटनांनी गोळा केलेली ४० टन सामग्रीही पाठवण्यात आली. रविवारी जहाजातून रवाना करण्यात आलेल्या मदतीत हेलिकॉप्टरमधून टाकता येतील, अशा पद्धतीने वॉटरप्रूफ पॅकिंग केलेल्या १५ हजार फूड पॅकेट्सचा  समावेश होता. 


रेल्वे माेफत पुरविणार पार्सल सेवा
साेलापूर : केरळमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांना अथवा व्यक्तींना जर रेल्वेने काही वस्तू पाठवायच्या असतील  तर रेल्वे त्यावर कोणतेच शुल्क आकारणार नाही. रेल्वेकडून पार्सलची ही सेवा ३१ ऑगस्टपर्यंत माेफत असेल.

बातम्या आणखी आहेत...