आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधू जल करारावरून पाकची भारतविरोधी आक्रमक भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानने सिंधू जल करारावर भारताच्या विरोधात जगभरात आक्रमक मोहीम सुरू करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर तयार होणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांचे निरीक्षण करण्याची परवानगी भारत देत नाही, असा कांगावा पाकिस्तानने केला आहे. 


जलसंसाधन मंत्री फैजल वावडा म्हणाले, ते धमकी देऊ इच्छित नाहीत. परंतु सिंधू जल करार उल्लंघनाच्या विरोधात आक्रमक मोहीम सुरू करण्यात येईल, असे संकेत त्यांनी दिले. मात्र, भारतविरोधी मोहिमेचे स्वरूप नेमके काय असेल? हे सांगणे त्यांनी टाळले. भारताला त्यांच्याच पद्धतीने घेरले जाईल. सध्या या मुद्द्यावर सर्व पक्षांसोबत चर्चा सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. १९६० च्या करारावरून पाकिस्तानला चिंता वाटू लागली आहे. ही चिंता जगासमोर मांडण्याचे पाकिस्तानने ठरवले आहे. विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर पाकुल दुलमध्ये १ हजार मेगावॅट व लोअर कलनाईमध्ये ४८ मेगवॅटचा जलविद्युत प्रकल्प तयार केला जात आहे. या प्रकल्पाचे पाकिस्तान निरीक्षण करू इच्छितो. 

 

९ वर्षांची तडजोड; करार कायम 
१९६० मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात सिंधू जल वाटप करार प्रत्यक्षात अस्तित्वात आला होता. दोन्ही देशांत नऊ वर्षे तडजोड सुरू होती. करारानुसार दोन्ही देश एका वर्षात दोन वेळा भेटून चर्चा करतील, असे ठरले होते. त्यात तांत्रिक भेटीवरही सहमती दर्शवण्यात आली होती. करारानुसार दोन्ही देश जल प्रकल्पांतील बदलाच्या माहितीचीदेखील परस्परांना देवाणघेवाण करतील. त्यासाठी परस्परांत सहमती करार झाला होता. 

 

निवडणुकीचा बहाणा करून विलंब : जल आयुक्त 
स्थायी सिंधू जल आयोगाचे पाकिस्तानचे आयुक्त सय्यद मेहर अली शहा म्हणाले, २९-३० ऑगस्टच्या वार्षिक बैठकीत भारताच्या जल आयुक्तांनी पाक अधिकाऱ्यांना जल प्रकल्पाच्या पाहणीसाठी सहमती दर्शवली होती. त्यानुसार पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांची ही भेट सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात ठरली होती. परंतु जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे ७ ते १२ ऑक्टोबरपर्यंत पाहणी टाळण्यात आली, असा आरोप शहा यांनी केला. राज्यात २० वर्षांनंतर होणाऱ्या पंचायत निवडणुकीचा हवाला दिल्यानंतर त्याचेही भारताने पालन केले नाही. भारताच्या समकक्षांसोबत झालेल्या फोनवरील संभाषणातूनदेखील भविष्यात असा दौरा शक्य होईल, असे दिसत नाही, असा आरोप पाकिस्तानने केला. 

 

 

बातम्या आणखी आहेत...