आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांशी सलगी साधत चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील 2 महिला पोलिसांच्या ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना/भोकरदन - अंगावर महागड्या साड्या, हातात महागडा मोबाइल, उच्च राहणीमान, सोबत लहान मुले ठेवून प्रवाशांशी भावनिक नाते निर्माण करून नंतर महिला प्रवाशांच्या पर्समधून दागिने लंपास करणारी तीन महिलांची आंतरराज्य टोळी कार्यरत होती. यातील एक महिला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतली. दरम्यान, शनिवारी भोकरदन शहरात महिलेच्या पर्समधून ३० हजार रुपये चोरी झाल्याच्या घटनेत वडीगोद्री परिसरातून अजून दोन महिला ताब्यात घेतल्या आहेत.

 

पंचायत समितीतील कमलबाई पगारे या भोकरदन शहरातील एका दुकानात सोने खरेदीसाठी गेल्या होत्या. पगारे यांचा मुलगा ऋषिकेश पगारे याने त्यांना पिशवीत ३० हजार रुपये दिले. दुकानात गेल्यावर कमलबाई यांना पिशवी फाटलेली दिसली. बॅगेतील ३० हजार लांबवल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता, दोन महिला चोरी करताना कैद झाल्या होत्या. यानुसार गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक परजने यांना भोकरदन येथील चोरीतील दोन्ही महिला वडीगोद्री गावातील असल्याची खात्री होताच अनिता पार्लेस काळे (२५) सुरेखा ज्ञानेश्वर पवार (२५) यांना ताब्यात घेतले.

 

ही कारवाई पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार उपविभागीय अधिकारी शेवगण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साखळे, आमन शिरसाठ, जमादार डी. जे शिंदे, रामेश्वर सिनकर, गणेश पायघन, सागर देवकर, गणेश निकम, सुला मरकड, संगीता मोकाशे, अनिल परजने, हनुमंत वारे, शत्रुघ्न मंडाळे आदींनी पार पाडली आहे.


एक दिवसाची कोठडी : या महिलांच्या टोळीने जालना, सातारा यासह परराज्याच्या बसस्थानकातही गुन्हे केले असल्याचे समोर येत आहे. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.


अशा करायच्या चोऱ्या
या महिला प्रवाशांशी संवाद साधून ओळख निर्माण करतात. यानंतर बाजूला बसून, लघुशंकेला स्वत: त्यांच्याजवळ सामान ठेवतात. प्रवासात जवळ बसून, गर्दीत संधी साधून महिलांच्या पर्समधील दागिने काढून घेत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.


सातारा, जालन्यात दागिने चाेरी
महिलांनी सातारा बसस्थानकातून एका महिलेचे १ लाख ६५ हजार रुपयांचे दागिने पळवले होते. रक्षाबंधनासाठी जात असताना जालना बसस्थानकातूनही एका महिलेच्या अंगावरील दागिने पळवल्याची घटना १२ सप्टेंबर रोजी घडली होती. या प्रकरणात मंदाकिनी गिन्यानदेव भोसले या महिलेस ताब्यात घेतले होते. हा गुन्हा तिने सुरेखा ज्ञानेश्वर पवार, सुरेखा ज्ञान्या काळे यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली होती.

बातम्या आणखी आहेत...