आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आयपीएल’ही निर्नायकी : राय यांच्या एकांगी कार्यपद्धतीवर एडुलजीची टीका!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आगामी वर्षाची निवडणूक आणि बीसीसीआयची आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल किंवा आयपीएल चेअरमन यांचे अस्तित्वच संपल्यामुळे यंदाच्या आयपीएलच्या बाराव्या पर्वाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात प्रशासक मंडळही अपयशी ठरले आहे. केवळ दोनच सदस्यांच्या या प्रशासक मंडळातही आता फूट पडली आहे. चेअरमन विनोद राय यांच्यावर प्रशासक मंडळाच्या दुसऱ्या सदस्या डायना एडुलजी यांनी एकांगी निर्णय घेत असल्याचे आरोप करत त्यांच्या प्रत्येक निर्णयामधील त्रुटी पुढे आणण्याचा धडाका लावला आहे.

 

बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा कधी होणार? लोढा शिफारशी कधी अमलात आणणार? बीसीसीआयची नवी समिती कधी अस्तित्वात येणार? या प्रश्नांची उत्तरे प्रशासक मंडळही देत नाही. त्यामुळे आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची नियुक्ती, नव्या चेअरमनची निवड या गोष्टी नजीकच्या काळात होणार नाहीत हेही स्पष्ट आहे.  याचाच अर्थ विनोद राय एकटे यासंदर्भात निर्णय घेतील, हे स्पष्ट आहे. श्रीनिवासन यांची छुपी एकाधिकारशाही संपुष्टात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीच्या शिफारशींना मंजुरी दिली होती. मात्र, ज्या प्रशासकांना बीसीसीआयची घडी बसवण्याचे काम दिले होते ते प्रशासकच एकहाती निर्णय घेत आहेत. लोढा समितीच्या शिफारशींच्या विसंगत अशी ही गोष्ट घडत असल्याचा आरोप डायना एडुलजी यांनीही केला आहे.  

 

यंदाच्या आयपीएलच्या आयोजनाचे महत्त्वाचे निर्णय एकटे विनोद राय घेणार का? अकाउंटिंगच्या क्षेत्राचा अनुभव असणारे राय क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाच्या समस्या कशा हाताळणार? असा सवाल फक्त बीसीसीआयचे सदस्यच नव्हे, तर फ्रँचायझी व डायना एडुलजी करत आहेत. गव्हर्निंग कौन्सिलचे अस्तित्वच नष्ट करून त्यांचे अधिकार गोठवण्यासाठीची राय यांची ही युक्ती असल्याचा आरोप बीसीसीआयच्या सदस्यांनी केला.  


यंदा आयपीएलबाबत २ महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. मार्च-एप्रिलला देशातील सार्वत्रिक निवडणुका असल्याने त्यादरम्यान आयपीएल होणे अशक्य आहे. गत निवडणुकांच्या वेळी आयपीएलच्या पहिल्या टप्प्याचे सामने यूएईमध्ये घेण्यात आले होते. तसा निर्णय घेण्याची वेळ आली तर विनोद राय निर्णय घेणार का? इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धा ३० मेपासून सुरू होत आहे. त्याआधी १५ दिवस सर्व संघांचे एकमेकांसोबतचे सराव सामने आहेत. याचा अर्थ मे महिन्यात आयपीएल स्पर्धा संपवावी लागेल. स्पर्धेच्या सामन्यांची संख्याही कमी करावी लागेल. तो निर्णय विनोद राय घेणार?  


अधिकारासाठी समित्या बरखास्त
विनोद राय यांनी बीसीसीआयच्या सर्व समित्या बरखास्त केल्यामुळे क्रिकेटबाबत निर्णय कुणी घ्यायचे, हा प्रश्न निवडणुका होऊन नवी कार्यकारिणी स्थापन होईपर्यंत अनुत्तरितच राहणार आहे. याबाबत राय यांनी सर्व अधिकार आपल्याकडे यावेत यासाठी असे केल्याचीही चर्चा आहे.

 

अंकुश कायम ठेवण्याचा प्रयत्न
श्रीनिवासनवर सत्तेसाठी खुर्चीला चिकटून राहिल्याचे आरोप झाले होते. आता विनोद राय व त्यांचे प्रशासक मंडळही नव्या कार्यकारिणीच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणे सोडून बीसीसीआयवरील आपला अंकुश कायम ठेवण्यासाठी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप होत आहे.

बातम्या आणखी आहेत...