आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठवाड्यात आता केवळ 15 टक्केच शिल्लक पाणीसाठा, 649 गावांना 827 टँकरने पाणीपुरवठा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाड्यात पाच जानेवारीअखेर केवळ पंधरा टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पाणीटंचाईचे संकट आणखी वाढत चालले आहे. मराठवाड्यातील ८७२ प्रकल्पांत १२९९ दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामध्ये मध्यम प्रकल्पात सर्वात कमी अकरा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यात पाणीटंचाई वाढत असून पाणीसाठे आटत चालल्यामुळे ८२० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

 

मराठवाड्यात पाण्याची टंचाई गंभीर होत चालली आहे. या वर्षी मराठवाड्यात पाणीसाठे घटत चालल्याचा परिणाम टँकरच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी पाण्याची टंचाई वाढण्याची शक्यता आहे. 

 

जायकवाडीत २१ टक्के पाणीसाठा 
मराठवाड्यात जायकवाडीत धरणात अजूनही २१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात उपयुक्त पाणीसाठा ४४९ दलघमी इतका आहे. गेल्या वर्षी याच वेळी जायकवाडीत ५ जानेवारीअखेर ८२ टक्के इतका पाणीसाठा होता. दुधना धरणात ६ टक्के, येलदरी ६ टक्के, ऊर्ध्व पैनगंगा ४६ निम्न तेरणा १५, विष्णुपुरी ५४ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. 

 

औरंगाबाद जिल्ह्यात ३९३ गावांना टँकरने पाणीपुरवठा 
औरंगाबाद जिल्ह्यात सध्या सर्वाधिक टंचाई असून जिल्ह्यातल्या ३९३ गावांना ५१३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये गंगापूर १०४ गावांना ११९, वैजापूर ७४ गावांना १०२, सिल्लोड ४६ गावांना ८८ तर औरंगाबादमध्ये ४६ गावांना ६८ टँकर आणि पैठण तालुक्यातील ७४ गावांना ६८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जालना जिल्ह्यात ८२ गावांत ८३ टँकरने तर बीड जिल्ह्यात १६७ गावांना १८९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 

 

जिल्ह्यात केवळ ४ टक्के पाणीसाठा शिल्लक 
मराठवाड्यातील मध्यम प्रकल्पांत केवळ ११.१४ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात केवळ चार टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत २०५ दलघमी क्षमता असताना केवळ ८.७६ दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील ९३ लघु प्रकल्पांत केवळ १४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ९३ प्रकल्पांची १८८ दलघमी क्षमता असताना केवळ २५ दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.