आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 ते 31 ऑक्टोबरदरम्यान 'जायकवाडी'साठी पाणी, दारणा, गंगापूर, पालखेडसाठी आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अहमदनगर-नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी दिल्यानंतर औरंगाबाद कडा विभागाच्या वतीने जोरदार पूर्वतयारी सुरू आहे. त्यासाठी ९ पथके नेमण्यात आली आहेत. दरम्यान, दारणा, गंगापूर व पालखेड प्रकल्पातून २६ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान पाणी सोडण्याचे लेखी आदेश कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांनी काढले आहेत. 

 

दरम्यान, एकीकडे पाणी सोडण्याची जय्यत तयारी सुरू असताना मुंबई हायकोर्टात या निर्णयाच्या विरोधात दाखल याचिकांवर गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता असून न्यायालय सुनावणीत काय निर्देेश देते यावर जायकवाडीत येणाऱ्या संभाव्य पाण्याचे भवितव्य अवलंबून आहे. जायकवाडीतील १७२ दलघमी पाण्याची तूट भरून काढण्यासाठी नगर आणि नाशिक जिल्ह्यात असलेल्या प्रकल्पांतून नियोजनपूर्वक हे पाणी सोडले जाणार आहे. 

 

प्रत्येक पथकात 3 अधिकारी 
- पाणी सोडल्यानंतरचे नियोजन काटेकोरपणे पाळण्यासाठी ९ पथके तैनात करण्यात येतील. प्रत्येक पथकात तीन अधिकारी असतील. प्रत्येक समूहातील धरण भागात जाऊन पाणी सोडण्याची कार्यवाही योग्य रीतीने होत आहे की नाही, याची पाहणी हे अधिकारी करतील. 
- याशिवाय केटीवेअर गेटची तपासणी, मध्येच कुणी पाणी अडवले तर त्याची पाहणी करून कारवाई करणे ही जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असेल. पथकात शाखा अभियंता, उपअभियंता यांचा समावेश आहे. 
- अभियंत्यांकडून आढावा कडा विभागाच्या वतीने बुधवारी पाणी सोडण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी म्हणून बैठक घेण्यात आली होती. अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी कामांचा आढावा घेतला आहे. 

 

विरोधातील याचिकांवर हायकोर्टात आज सुनावणीची शक्यता 
नगर-नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडीत पाणी सोडण्याच्या आदेशाविरुद्ध दाखल याचिकेवर गुरुवारी हायकोर्टात सुनावणीची शक्यता आहे. कोर्टाने बुधवारी दिवाळीनंतर सुनावणीचे निर्देश दिले होते. मात्र, आता गुरुवारीच सुनावणी होऊ शकते. 

 

राजकीय वातावरणही तापले : जायकवाडीत पाणी सोडण्याच्या मुद्द्यावरून मराठवाड्यासह नगर-नाशिक जिल्ह्यात राजकीय वातावरणही तापत चालले आहे. शेतकरी तसेच इतरांच्या वतीने पाणी सोडण्याच्या बाजूने व विरोधात निवेदने दिले जात आहेत. मराठवाडा अनुशेष निर्मूलन समितीचे संजय लाखे पाटील, राजेंद्र दाते पाटील यांच्या वतीनेही कार्यकारी संचालकांना तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले. 


सिंचनासाठी तात्काळ पाणी सोडा परभणीतल्या शेतकऱ्यांचा कार्यकारी संचालकांसमोर ठिय्या : जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या संदर्भात परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गोदावरी पाटबंधारे महामंडळात कार्यकारी संचालकाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. वरच्या भागातून पाणी सोडण्यात येत नसल्यामुळे मराठवाड्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे जायकवाडीतून सिंचनासाठी रब्बीसाठी चार पाणी पाळ्या देण्याची मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने विलास बाबर यांनी केली आहे. 

 

जायकवाडीचे फेरनियोजन रद्द करा : जायकवाडीचे फेरनियोजन रद्द करण्याची मागणी सुमारे १०० शेतकऱ्यांनी या वेळी केली. फेरनियोजनाचा सिंचनाला फटका बसणार आहे, असे आंदोलकांचे म्हणणे होते. या आंदोलनात विलास बाबर, लिंबाजी कचरे, लक्ष्मीकांत साकुडकर, दीपक लिपणे, गोपाळ कुलकर्णी, अंकुश तवर, सुदामराव आंधळे, अनंतराव कच्छवे, मुंजाजी काळे, रामप्रसाद कदम, सूर्यकांत आव्हाड, रामा गव्हाणे, दशरथ नाईक, शेख अब्दुल शेख मोहोद्दीन, विश्वनाथ राऊत, प्रवीण कच्छवे, अशोक बारहाते यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. 

 

बातम्या आणखी आहेत...