आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीच्या रेखांकनाअभावी 6 टीएमसी पाणी कमी मिळाले, विमंचे सदस्य जलतज्ञ शंकरराव नागरे यांनी वेधले लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जायकवाडीच्या लाभक्षेत्राचे रेखांकन न झाल्यामुळे समन्यायी पाणीवाटपानुसार कमी पाणी मिळाले आहे. रेखांकन झाले असते तर किमान सहा टीएमसी पाणी अधिक मिळाले असते, याकडे मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य जलतज्ज्ञ शंकरराव नागरे यांनी लक्ष वेधले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत बंब यांनी सोमवारी मराठवाड्यातील आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत तुटीचा लेखाजोखा मांडला जाणार असून आमदारांनी जायकवाडीच्या रेखांकनाबाबतही आग्रही व्हावे, अशी अपेक्षा नागरे यांनी व्यक्त केली. 

 

दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय होताच नगर-नाशकातून तीव्र विरोध होत आहे. या तिढ्यावर सोमवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत खल होणार आहे. जायकवाडीत पाणी सोडण्याबाबतही याच बैठकीत निर्णय होणे अपेक्षित आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांच्यासोबत ही बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत मराठवाड्याच्या पाणीप्रश्नासह जायकवाडीचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. सोमवारी दुपारी दोन वाजता महसूल प्रबोधिनीत ही बैठक होणार असून किमान २५ आमदार उपस्थित राहतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जायकवाडीच्या प्रश्नावर नगर -नाशिकमधून विरोध सुरू झाल्यानंतर १७२ दलघमीचा तुटीचा निर्णय घेतला तरी त्याची लेखी ऑर्डर अजूनही महामंडळाने काढली नाही. याविरोधात मराठवाड्यात संतापाची लाट आहे. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या बैठकीत आमदार काय भूमिका मांडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महापौरही उपस्थित राहणार आहेत. 

 

हक्काचे पाणी द्या, अन्यथा अवमान याचिका दाखल करू 
ऊर्ध्व खोऱ्यातील सर्व धरण समूहातून मराठवाडा विभागासाठी समन्यायी पद्धतीने पाणी मिळाले पाहिजे. त्यानुसार हक्काचे पाणी नाही मिळाल्यास अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा मराठवाडा अनुशेष निर्मूलन विकास मंचाने दिला आहे. मंचाने याबाबत गोदावरी पाटबंधारे महामंडळास निवेदनही दिले आहे. त्यावर मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचाचे अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील, मंचाचे निमंत्रक राजेंद्र दाते पाटील, प्रा. मनोहर लोंढे, साईनाथ चिन्नादोरे, विवेक जैस्वाल, विजय निकाळजे, विजय राऊत आदींची नावे आहेत. 

 

मराठवाड्यातील आमदारांची पाणीप्रश्नी आज शहरात बैठक 
आ. बंब यांनी सांगितले, जायकवाडीसह उस्मानाबाद, लातूरचा पाणीप्रश्न तसेच इतर जिल्ह्यांतील प्रकल्पांच्या स्थितीसंदर्भात सोमवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता महसूल प्रबोधिनीत ही बैठक होणार आहे. गतवर्षीच्या बैठकीस १४ आमदार उपस्थित होते. या वेळी किमान २५ आमदार येतील, असा विश्वास बंब यांनी व्यक्त केला. 

 

मराठवाड्याला पाणी न मिळाल्यास आत्महत्या वाढतील 
या वर्षीचा दुष्काळ मोठा असल्यामुळे जायकवाडीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. आगामी काळात सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही भेडसावण्याची चिन्हे आहेत. हक्काचे पाणी न मिळाल्यास शेतकरी आत्महत्यात वाढ होऊ शकते. बैठकीनंतर मुख्यमंत्री, जलसंपदामंत्र्यांना भेटणार असल्याचे बंब यांनी सांगितले. 

 

ढिसाळ नियोजनामुळे शहरातही पाणीबाणी; मनपा म्हणते, जलवाहिनी झाली जुनी 
जायकवाडीत थोडाफार साठा असूनही शहरातील नागरिकांना ५ ते ७ दिवसांनंतर पाणी मिळत आहे. जायकवाडीने तळ गाठला असताना समांतर योजनेच्या ठेकेदाराने फ्लोटिंग पंप लावून शहराला दोन दिवसांआड पाणी पुरवले होते. आता मात्र, पाण्याच्या नियोजनातच गोंधळ असल्यामुळे मनपा जलवाहिनी जुनी असल्याचे कारण पुढे करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहे. या गोंधळात शहरातील अनेक भाग तहानलेले आहेत. 

 

कायद्याची अंमलबजावणी करणे गरजेचे 
जायकवाडीत पाणी सोडण्यास नगर-नाशकातून विरोध होत असल्यामुळे गोदावरी पाटबंधारे महामंडळाने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे मार्गदर्शन मागवले आहे. समन्यायी पाणीवाटपाबाबत यापूर्वीच कायदा असताना त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा पद्धतीने पुन्हा मार्गदर्शन मागणे चुकीचे असल्याचे नागरे यांनी सांगितले. 

 

पाणी न सोडणे न्यायालयाचा अवमान 
मेंढेगिरी समितीच्या शिफारशी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या आहेत. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांवर पाणी सोडण्याची जबाबदारी आहे. दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यासाठी पाणी न सोडणे हा न्यायालयाचा अवमान ठरेल, असे मराठवाडा अनुशेष निर्मूलन विकास मंचाने निवेदनात म्हटले आहे. 

बातम्या आणखी आहेत...