आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर मुलाखत/ एक वर्ष सांगणार नाही. शुभ मुहूर्ताची वाट पाहत आहे...- न्या. चेलमेश्वर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवृत्त न्या. जे. चेलमेश्वर यांनी १२ जानेवारीला तीन न्यायमूर्तींसोबत पत्रकार परिषद घेऊन सुप्रीम कोर्टातील घोटाळ्यांकडे देशाचे लक्ष वेधले होते. ते २२ जूनला निवृत्त झाल्यानंतर सरकारी निवासस्थान सोडले आणि आंध्र प्रदेशात कृष्णा जिल्ह्यातील अापल्या पेदामुत्तेवी गावी पोहोचले.


मछलीपट्टणमपासून हे गाव ३० किमीवर आहे. गावात जाणारा शेवटचा ५ किमी रस्ता अत्यंत वाईट आहे. धक्के खात जाणारी गाडी २० किमीपेक्षा अधिक वेग घेऊच शकत नाही. गावात सर्वात शेवटचे घर चेलमेश्वर यांचे. त्यापुढे शेत सुरू होते. घराला लागूनच त्यांची १७ एकर शेती आहे. यात सध्या भाताची लागवड आहे. घराच्या एका बाजूला मंदिर, दुसऱ्या बाजूला गोशाळा आहे. त्यांनी स्वत: एक गाय पाळली आहे. बहुतांश वेळ ते पहिल्या मजल्यावरील आपल्या वाचनकक्षातच घालवतात. या खोलीत शेकडो पुस्तके आणि स्मृतिचिन्हे आहेत. याची साफसफाई ते स्वत: करतात. मोबाइलवर ते संगीत ऐकतात. खोलीतच चालत चालत ते हातावर ताल धरतात... गुणगुणतात...

- पत्रकार परिषद घेतली तेव्हा खरेच काय झाले हाेते? -  त्याचे उत्तर मी अजून १ वर्ष तरी देणार नाही.

- नवीन सरकार येण्याची वाट पाहत अाहात काय की,  सध्याच्या सरन्यायाधीशांच्या कार्यकाळ पूर्ण हाेण्याची प्रतीक्षा करत अाहात?

- या विषयावर सध्या मी काहीच बाेलू इच्छित नाही. (हसत) शुभ दिवसाची वाट पाहत अाहे. माझी कारणे मी का सांगू?त्याने देशाला काही फायदा हाेणार अाहे का? 

- मग पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला काय मिळाले? सध्या सर्वाेच्च न्यायालयात सारे काही ठीक अाहे का?

- सर्वाेच्च न्यायालयात काही गाेष्टी अयाेग्य सुरू असल्याचे तेव्हा अाम्ही देशाला सांगितले. मात्र काही ‘विद्वान’ लाेकांनी अजब तर्क लावला की त्यामागे माझा काहीतरी अजेंडाच अाहे. ताे अाराेप मी मान्यही केला तरी मग बाकी तीन न्यायमूर्तींच्या तक्रारीचे काय. काॅलेजियममध्ये असलेले चार न्यायमूर्ती काहीतरी चुकीचे असल्याचे सांगत अाहेत. काहीही न समजायला अाम्ही काही लहान बालके नाहीत. खटले वाटपात हेराफेरी हाेत हाेती. एखादा खटला एखाद्या बेंचकडे साेपवला तर सर्वसाधारणपणे शेवटपर्यंत ताे त्याच बेंचकडे असावा. जाेपर्यंत न्यायमूर्ती ताे खटला साेडत नाहीत ताेपर्यंत तरी असेच असावे. जर सरन्यायाधीशच एखाद्या न्यायमूर्तीकडून खटला काढून ताे दुसऱ्याकडे देत असेल तर याचा अर्थ असा की त्यांचा संबंधितावर विश्वास नाही. असे करण्याचे कारण तरी स्पष्ट व्हायला हवे. प्रक्रियेतील पारदर्शकतेचा हा प्रश्न अाहे.

 

प्रश्न: मागील सरन्यायाधीशांना तुम्ही निवेदन पाठवले हाेते. न्यायमूर्ती रंजन गाेगई यांनाही पाठवणार का?
उत्तर: जेव्हा मी पत्र पाठवले हाेते तेव्हा मी सेवेत हाेताे. माझे उत्तरदायित्व हाेते. अाता मी का पाठवू पत्र? अाता यंत्रणेला अडचणीत अाणण्याचा प्रयत्न करणार नाही. सामान्य नागरिकही जबाबदार असताे, मात्र त्याला मर्यादा असतात. पत्रकार परिषदेत जे लाेक साेबत हाेते त्यांच्यावर अाता गावात बसून नियंत्रण ठेवणे हे चुकीचे अाहे.


प्रश्न: तुम्हाला असे नाही वाटत का, की तुम्ही ती पत्रकार परिषद घेतली नसती तर न्यायमूर्ती गाेगोई सरन्यायाधीश झाले नसते?
उत्तर:मी तसा काही तर्क लावू इच्छित नाही. ज्येष्ठतेच्या अाधारे ते सरन्यायाधीश हाेणारच हाेते. इंदिरा गांधींच्या कार्यकाळाचा अपवाद वगळला तर गेल्या ७० वर्षांत ज्येष्ठतेच्या अाधारावरच सरन्यायाधीशांची निवड झाली अाहे.


 प्रश्न: जजच्या नियुक्त्यांवर सरकारचा हस्तक्षेप नको, या वक्तव्यावर अजूनही तुम्ही कायम आहात?
उत्तर:अधिकारांचा मनमानी वापर करणे वेगळे. कॉलेजियम सदस्य म्हणून माझे काही अधिकार आहेत; परंतु याचा अर्थ मी माझ्या मेहुणा-मेहुणीलाच जज नेमावे असा नव्हे किंवा कुणाचा चेहरा मला आवडत नाही म्हणून त्याला जज होण्यापासून मी रोखावे असेही नव्हे. हेच सरकारसाठीही लागू होते. सरकार आणि न्यायव्यवस्था परस्परांबद्दल तडजोडीवर उतरावेत हे घातक आहे. जनतेला सरकारच्या मनमानीपासून वाचवता यावे म्हणूनच न्यायव्यवस्थेची विशेष रचना करण्यात आली आहे. 


उत्तर: निवृत्तीनंतर जीवनात काय बदल झाले?
उत्तर:आता मी दुपारी वामकुक्षी घेतो. शेतातील हिरवळ पाहतो. सकाळी गायीला चारावैरण घालतो... रात्री आकाशातील तारे मोजतो...!

 

प्रश्न : तुम्ही चारही जजनी चर्चा तर केली असेल? आता पत्रपरिषद घ्यायची हे केव्हा, कुठे आणि कसे ठरले?

उत्तर:आम्ही अचानक पत्रपरिषद घेतली असे झाले नाही. नक्की दिवस तर सांगू शकत नाही, पण अनेक आठवड्यांच्या घटनाक्रमानंतर ते घडले.


प्रश्न: पत्रपरिषदेतबाबत कुटुंबाशी चर्चा केली होती?
उत्तर: कुटुंबाशी नाही, फक्त सहकारी जजशी केली होती.


प्रश्न: तुम्ही अडीच वर्षे कॉलेजियममध्ये होता. कोणाला जज करायचे, कोणाला नाही, हे कसे ठरते?
उत्तर: तुम्ही हा प्रश्न सीजेआय राहिलेल्या लोकांना का विचारत नाही? कोणत्या आधारावर हे लोक काही ठरवतात हे मला कधीच समजले नाही. कधी फक्त २ वर्षांच्या अनुभव असलेल्याला हायकोर्टात जज करतात, कधी म्हणतात ५ वर्षे आवश्यक.


प्रश्न: कॉलेजियमच्या शिफारशींत काही मंजूर करणे आणि काही सोडण्याचा प्रकार अजूनही सुरू आहे. अलीकडेच कायदा मंत्रालयाने कॉलेजियमच्या १२ शिफारशी रोखल्या. न्या. गोगोईंनी हा मुद्दा पंतप्रधानांसोबत उपस्थित केल्याची चर्चा आहे...
उत्तर: मलाही वृत्तपत्रांतून हे कळाले. हे चांगले आहे. मागील सरन्यायाधीश असे करत नव्हते अशीच आमची एक तक्रार होती.


प्रश्न: एन. टी. रामाराव तुमचे नातेवाईक होते. तेदेप आणि चंद्राबाबू नायडूंच्या मदतीमुळेच तुम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला होता, असा आरोप अनेक जण करतात.
उत्तर: एनटीआर माझे नातेवाईक होते ही वस्तुस्थिती आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचण्यात नायडूंचा पाठिंबा मला मिळाला की नाही हा मुद्दा आज अप्रासंगिक आहे. मी जज होण्यास लायक होतो की नाही याचा निर्णय २१ वर्षांचे माझे काम पाहून केला जाऊ शकतो. देशाला माझ्या राजकीय संबंधांची चिंता असेल तर मला देशाबद्दल वाईट वाटते. चर्चेला वेगळे वळण लावण्याचा हा प्रयत्न आहे. माझे निकाल सार्वजनिक आहे. ते वाचा, मग निर्णय घ्या. पण कोणी तसे करणार नाही. कॉलेजियममध्येही असेच होते. नायडूंनी मला किती समर्थन दिले ही गोष्ट त्यांच्यात, माझ्यात आणि मला बनवणाऱ्यांतील आहे. कोण कोणामुळे सुप्रीम कोर्टात पोहोचले हे लोकही जाणतात.


प्रश्न: ज्या दिवशी तुम्ही पत्रपरिषद घेतली त्याच दिवशी डी. राजा तुम्हाला भेटले. हाही फक्त योगायोग होता?
उत्तर: मग कुठला कट होता, असे तुम्हाला वाटते का? हा एक कट आहे, असे टीव्हीवर एक व्यक्ती ओरडून सांगत होती. कट दिवसाउजेडी कॅमेऱ्यांसमोर होता हे तुम्ही कुठे पाहिले का? डी. राजांना मी विद्यार्थिदशेपासून ओळखतो. पत्रपरिषदेच्या दिवशी ते माझ्या घराबाहेरून जात होते तेव्हा गर्दी आणि ओबी व्हॅन पाहून ते घाबरले. चेलमेश्वर यांच्याबाबत काही वाईट तर घडले नाही ना, असे वाटल्याने ते भेटीस आले.


प्रश्न: तुमचा सर्वोत्कृष्ट काळ कोणता होता? मनाचा ठाव घेणारा एखादा खटला सांगाल का?
उत्तर:सर्वोत्कृष्ट आणि निम्न असे काही असते असे मी मानत नाही. प्रत्येक खटला समान महत्त्वाचा होता. उदाहरणादाखल एनजेएसीचे प्रकरण घ्या. हे प्रकरण घटना दुरुस्तीला आव्हान देण्याचे होते. सुप्रीम कोर्टाच्या जजच्या यादीत माझा क्रमांक २०८ वा होता. सर्व जजना घटनादुरुस्तीच्या वैधतेवर विचार करण्याची संधी मिळू शकत नाही. ४० ते ५० जजना ही संधी मिळाली असेल. मी त्यापैकीच एक आहे.


प्रश्न: कुठला निकाल लिहिताना अस्वस्थ झाले, दोघेही अंशत: योग्य आहेत, असे कधी झाले का?
उत्तर: कधी नाही. कोणत्याही खटल्यात एक पक्ष पूर्णपणे योग्य आणि दुसरा पूर्णपणे चुकीचा असे होत नाही. सत्य त्यांच्यात कुठेतरी असते. सत्य कुठे लपले आहे हे शोधून काढणे हेच जजचे कौशल्य असते. तेच तर काम आहे. एक उदाहरण पाहू, पती-पत्नीत मुलाच्या ताब्यावरून भांडण होते. मूल माझे आहे, असा दावा दोघेही करतात. दोघेही बरोबर आहेत. त्यामुळे मुलाच्या ताब्याच्या प्रकरणांत निर्णय घेणे खूप कठीण असते. इतर प्रकरणांत मला कधीही अडचण आली नाही.


प्रश्न: निकाल लिहिण्यास किती वेळ लागत होता? खूप वेळ लागला असे एखादे प्रकरण?
उत्तर: निकाल लिहिण्यात वेळेचा अर्थ म्हणजे ऑर्डर स्थगित केल्यानंतर निकाल येण्यासाठी लागणारा वेळ. एक प्रकरण सोडले तर कुठलाही निकाल ८ आठवड्यांपेक्षा जास्त प्रलंबित राहिला नाही. आंध्र प्रदेश हायकोर्टाच्या एका प्रकरणात ७-८ महिन्यांपर्यंत आदेश लिहू शकलो नव्हतो.


प्रश्न: तुम्ही २१ वर्षे जज होता आणि तेवढीच वर्षे वकीलही. त्यादरम्यान न्यायव्यवस्थेत काय बदल झाले?
उत्तर: सर्वात मोठा बदल पैशाचा आहे. ३० वर्षांपूर्वी जेव्हा मला पहिल्यांदा १० हजार रुपये मिळाले तेव्हा खूप मोठी फी वाटली. दुसरे म्हणजे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाची कक्षा खूप वाढली आहे. कोर्ट जी प्रकरणे विचारातही घेत नव्हते तशी आज रोज येत आहेत. सुप्रीम कोर्ट जामीन अर्जावर विचार करेल,अशी कल्पनाही करणे कठीण होते.


प्रश्न: ज्यांना न्याय मिळत नाही असे लोक अवतीभोवती असतील. त्यांच्या मदतीसाठी काही कराल का?
उत्तर: आता मी देशाच्या कोणत्याही कोर्टात वकिली करू शकत नाही आणि जजशी बोलूही शकत नाही. समजा कोणी माझ्याकडे आले तेव्हा तुमची समस्या ही आहे आणि त्याचे उत्तर हे आहे असा सल्लाच मी देऊ शकतो.


प्रश्न: सुप्रीम कोर्टाला शाळेप्रमाणेच खूप सुट्या असतात. त्यामुळे काम प्रभावित होत नाही का?
उत्तर: तुम्हाला १० वाजेपासून ४ वाजेपर्यंत माहीत आहे. तुम्हाला हे माहीत आहे का की, कोर्ट भरण्याआधी आणि नंतर किती काम असते? एनजेएसी खटल्याबाबत बोलायचे तर सलग ६ आठवडे झोपलो नाही. आधारच्या वेळी दोन आठवडे दिवस-रात्र काम झाले.


प्रश्न: सबरीमाला प्रकरणात..

उत्तर: (मध्येच रोखत) मला यावर काहीही बोलायचे नाही. या प्रकरणाची फेरविचार याचिका कोर्टाच्या विचाराधीन आहे.


प्रश्न: संधी मिळाली असती तर तुम्ही अयोध्या प्रकरण कसे हाताळले असते?
उत्तर: ना मला संधी मिळाली आणि मला त्याबाबत काही अटकळ लावायची नाही.


प्रश्न: न्यायमूर्तींची पत्नी अन्नपूर्णा यांना प्रश्न : आता हे तुम्हाला वेळ देऊ शकतात का?
उत्तर: ज्याला व्यस्त राहण्याची सवय आहे, तो रिकामा राहू शकत नाही. वर माझ्या खोलीत दिवसभर गाणी ऐकतात किंवा पुस्तकं वाचतात. गॅलरीत बसून शेत न्याहाळतात. दररोज एखाद्या कार्यक्रमात भाग घेतात किंवा लग्न सोहळ्यासाठी बाहेर जातात.

 

प्रश्न: चेलमेश्वर यांचे पुत्र वेंकट राम यांना : पत्र परिषदेबाबत आधी माहीत होते का?

उत्तर: नाही. मी त्या दिवशी घराच्या पहिल्या मजल्यावर होतो. मी खिडकीवरून पडदा हटवून पाहिले तेव्हा लॉनमध्ये खूप गर्दी होती. ओबी व्हॅन रांगेत उभ्या होत्या. लगेच टीव्ही सुरू करून बाहेर काय सुरू आहे ते पाहिले. पप्पा कधीही नोकरीबाबत बोलत नव्हते.

 

बातम्या आणखी आहेत...