आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर झालेली दगडफेक व पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी ७१ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही प्रकरणांत न्यायालयाने जामीन मंजूर केला असला, तरी आता या आरोपींना प्रतिबंधात्मक कारवाईनुसार पोलिस अधीक्षक कार्यालयात सुनावणीसाठी हजेरी लावावी लागत आहे. उर्वरित आरोपींच्या विरोधातही लवकरच ही कारवाई करण्यात येणार आहे.
केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर झालेली दगडफेक व पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफाेडप्रकरणी सुमारे ९०० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिस व परिसरातील घरांवर दगडफेक केल्याप्रकरणी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह ६०० शिवसैनिकांवर कोतवाली पोलिस ठाण्यात, तर पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या सुमारे तीनशे कार्यकर्त्यांवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यात शिवसेनेचे ६२ व राष्ट्रवादीच्या १०५ कार्यकर्त्यांना अटक करून न्यायालयासमाेर हजर करण्यात आले. न्यायालयीन कोठडीनंतर हे आरोपी सशर्त जामिनावर सुटले. मात्र, पुढील काळात काेणताही अनुचित प्रकार शहरात घडू नये, यासाठी पोलिसांनी या आरोपींच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत ७१ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींच्या विरोधातही लवकरच ही कारवाई होणार आहे. प्रतिबंधात्मक कारवाईनुसार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी दिलीप पवार यांच्यासमोर हजेरी लावावी लागत आहे. पवार यांच्यासमोर आरोपीची सुनावणी होते, त्यानंतर संबंधित आरोपीला सुनावणीसाठी पुढील तारीख देण्यात येते. जामिनावर सुटलेल्या या अारोपींना दर शनिवारी कोतवाली व भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागते. आता प्रतिबंधात्मक कारवाईनुसार या सर्व आरोपींना पोलिस अधीक्षक कार्यालयात सुनावणीसाठी हजेरी लावावी लागत आहे.
त्यात राष्ट्रवादीच्या ३०, तर शिवसेनेच्या ४१ कार्यकर्त्यांचा समावेश आहे. गहिनीनाथ दरेकर, राहुल चिंतामणी, अरविंद शिंदे, विलास दरेकर, चेतन चव्हाण, बीर शेख, नगरसेवक विक्रम राठोड, योगिराज गाडे, विठ्ठल सातपुते, संग्राम शेळके, राजेंद्र पठारे, मुकेश जोशी यांच्यासह ७१ जणांना पोलिस अधीक्षक कार्यालयात पवार यांच्यासमोर सुनावणीसाठी हजेरी लावावी लागत आहे.
आरोपींेचे दणाणले धाबे
दगडफेक व पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी आरोपींच्या विरोधात सुरुवातीला मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (भादंवि कलम ३०८) दाखल करण्यात आला होता. नंतर हे कलम वगळून मृतदेहाची विटंबना, शिवीगाळ, तसेच सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी धरपकड सुरू केल्यानंतर अनेक आरोपी स्वत:हून हजर झाले. न्यायालयाने त्यांना जामिनावर सोडले, परंतु पोलिसांनी आरोपींच्या िवरोधात पुन्हा प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कारवाई सुरू केल्याने आरोपींचे धाबे दणाणले आहेत.
पुढील काळात असे प्रकार घडू नयेत
शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे. दगडफेक व तोडफोडप्रकरणी भिंगार व कोतवाली पोलिसांनी अटक केलेल्या ७१ जणांविरोधात प्रतिबंधात्मक करवाई करण्यात आली आहे. त्यांची सुनावणी घेण्यात येत आहे. उर्वरित आरोपींच्या विरोधात देखील लवकरच ही कारवाई करण्यात येणार आहे. पुढील काळात असे प्रकार घडू नयेत, या उद्देशाने ही कारवाई करण्यात येत आहे.''
- दिलीप पवार, निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा.
आरोपी अद्याप फरारच
दगडफेक व तोडफोडप्रकरणी सुमारे ९०० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल असला, तरी आतापर्यंत केवळ १६७ आरोपींनाच अटक झालेली आहे. उर्वरित आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्यांच्या शोधात आहेत. गणेशोत्सव व महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कोणत्याही क्षणी या फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे. घटना घडली तेव्हा आपण नगर शहरात नव्हतोच, असे अर्जही काही आरोपींनी पोलिस अधीक्षक कार्यालयाला दिलेले आहेत. त्याबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.