आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अखेर मनोहर जोशी यांच्या मुलाच्या हातून गेला कोहिनूर; तब्बल 900 कोटी कर्ज न फेडल्याने प्रकल्पाचे एसएसएकडे हस्तांतरण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दादर येथील शिवसेना भवनसमोर प्राइम लोकेशन असलेल्या कोहिनूर मिलची जागा घेऊन तेथे भव्य सप्त तारांकित प्रकल्प उभारण्याचे स्वप्न राज ठाकरे आणि मनोहर जोशी यांच्या मुलाने उन्मेष जोशी यांनी पाहिले होते. परंतु प्रथम राज ठाकरे यांनी या प्रकल्पातून अंग काढून घेतल्यानंतर आता उन्मेष जोशी यांच्याही हातातून कोहिनूर निसटला असून या प्रकल्पातील आलिशान निवासी घरांच्या डिझायनिंगचे काम पाहणाऱ्या संदीप शिक्रे यांच्या संदीप शिक्रे अंॅड असोसिएटसकडे हा २ हजार कोटींचा प्रकल्प गेला आहे. ९०० कोटी रुपयांचे कर्ज न फेडल्याने लवादाने हा प्रकल्प एसएसएला देण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

कोहिनूर मिलच्या जागेवर कोहिनूर स्क्वेअर नावाने ट्विन टॉवर उभारण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. ट्विन टॉवर पैकी एक ५२ मजल्यांचा तर दुसरा ३५ मजल्यांचा टॉवर आहे. यापैकी एका टॉवरमध्ये पंचतारांकित हॉटेलसह व्यावसायिक गाळे आहेत तर दुसरा टॉवर निवासी सदनिका असणारा आहे. २००९ मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू झाले. मात्र, आर्थिक आणि मुंबई मनपाच्या परवानग्यांमुळे प्रकल्प लांबला. पैशांची जुळवाजुळव होत नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून प्रकल्पाचे काम पूर्णपणे बंद पडले होते. आर्थिक संकटामुळे कर्जाची पुनर्रचना करण्याची वेळ आली होती. नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलच्या मुंबई खंडपीठाने या प्रकल्पासाठी पुनर्रचनेची प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश सप्टेंबर २०१७ मध्ये दिले होते. एडलवाइज अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने लवादाकडे याचिका दाखल केली होती. 

 

आंध्र बँकेकडून कर्ज 
आंध्र बँकेने दिलेल्या मूळ कर्जावर ५० कोटी ९६ लाख ७२ हजार ८६३ रुपयांची देणी कोहिनूर सीटीएनएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने परत केलेली नाहीत, असे त्यात नमूद होते. कोहिनूर स्क्वेअरसाठी आंध्र बँकेने कर्जपुरवठा केला होता. परंतु कोहिनूर सीटीएनएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने २६ एप्रिल २०१७ पर्यंत ही रक्कम थकवली होती. दरम्यान, संदीप शिक्रे प्रख्यात आर्किटेक्ट असून १९८९ मध्ये २६ वर्षांपूर्वी संदीप शिक्रे अॅन्ड असोसिएट कंपनीची त्यांनी स्थापना केली. त्यांच्याकडे २२५ पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. 

 

असा आहे कोहिनूर 
दादरमध्ये मोक्याच्या ठिकाणी ५२ आणि ३५ मजल्यांचे दोन जुळे टॉवर, जुळ्या इमारतीतील पहिले १५ मजले दोन्ही टॉवर्सच्या पार्किंगसाठी; तब्बल दोन हजार गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था. उर्वरित २० मजल्यांवर आलिशान सदनिका. तसेच पंचतारांकित हॉटेल आणि व्यावसायिक गाळ्यांची सोय.