आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोहाऱ्यातील दोन मेगावॅट सोलार प्रकल्पाच्या कामाला सहा महिन्यांपासून ब्रेक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोहारा- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत महाजनको व मेडाच्या पुढाकारातून लोहारा महावितरणच्या उपविभागीय कार्यालय परिसरात एक ते दोन मेगावॅटचे सोलार प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, मागील सहा महिन्यापासून या कामाला ब्रेक लागल्याचे चित्र दिसत आहे.

 

राज्यातील विजेची उपलब्धता व मागणीत मोठी तफावत आहे. त्यामुळे अतिरिक्त भारामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणे, ग्रामीण भागात होणारे भारनियमन आदी समस्यांना ग्राहकांना सामोरे जावे लागत आहे. विजेची वाढती मागणी आणि पुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी अपारंपारिक ऊर्जास्त्रोतातून विजेसाठी उर्जा मंत्रालयाकडून नेहमीच प्रयत्न केले जातात. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत महाजनको व मेडाच्या पुढाकारातून जिल्ह्यातील काही ठिकाणच्या वीज उपकेंद्राजवळ एक ते दोन मेगावॅटचे सोलर प्रकल्प उभारणीचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. या सोलर प्रकल्पातून निर्मिती केलेली वीज जवळच्या वीज उपकेंद्राद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचणार असल्याने काही अंशी विजेचा तुटवडा कमी होण्यास मदत होणार आहे. 

 

लोहारा हे कमी पर्जन्यमान असलेला तालुका आहे. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने येथे स्वच्छ सूर्यप्रकाश मिळतो. सौर उर्जेसाठी पूरक असल्याने पहिल्या टप्प्यात लोहारा व सास्तूर या दोन ठिकाणी सोलर प्रकल्प उभारून वीजनिर्मिती करण्याचा निर्णय झाला. त्या अनुषंगाने लोहारा शहरातील महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयाच्या जवळपास पाच एकराच्या परिसरात एक ते दोन मेगावॅटचे सोलर प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी कार्यालय परिसरात असलेले मोठ्या वृक्षांची तोड करून जागेचे सपाटीकरण करण्यात आले आहे. परंतु, पुढे काहीच हालचाल झाली नाही. सोलर प्रकल्प उभारणीचा निर्णय होऊन सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला, मात्र प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया थंडावल्याचे चित्र आहे. त्यामुळे या सोलार प्रकल्पाचे काम कधी सुरू होणार, हा प्रकल्प होणार याची उत्सुकता शहरवासीयांना लागली आहे.