आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता पत्राच्या इंग्रजी मसुद्यावरून वाद; साहित्य संमेलनाचे नाट्य महामंडळाचे अध्यक्ष-संकलन समिती अध्यक्षांचे आरोप-प्रत्यारोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- स्वातंत्र्य आणि सहिष्णुता ही मूल्ये प्राणपणाने जपणाऱ्या ज्येष्ठ इंग्रजी साहित्यिक नयनतारा सहगल यांचे निमंत्रण आयोजक संस्थेने रद्द केल्यामुळे पेटलेला वाद शमतो न शमतो तोच त्यांना पाठवलेल्या इंग्रजी पत्राच्या मसुद्यावरून आता नव्या वादाने जन्म घेतला आहे. सहगल यांना निमंत्रित करण्याचा निर्णय महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांचाच होता. श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणजे मराठी साहित्य क्षेत्रातील गुलाबी बोंडअळी असून तिचा नायनाटच केला पाहिजे, अशी विखारी टीका निधी संकलन समितीचे अध्यक्ष पद्माकर मलकापुरे यांनी केली. तर, आयोजकांनी दबावाखाली झालेल्या प्रकाराबद्दल क्षमायाचना आता करून झाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता आपले लक्ष आरोपबाजीऐवजी संमेलनाच्या यशस्वितेवर केंद्रित करायला हवे, असा सल्ला जोशी यांनी दिला आहे. 

 

मसुदा भाषांतरित करून देणे म्हणजे 'निर्देश' नव्हे 
नयनतारा सहगल यांना संमेलनाचे निमंत्रण नाकारण्याच्या निर्णयाबाबत आरोपा करण्यांऐवजी वास्तव समजून घेण्याची गरज आहे. आयोजक संस्थेचे कार्याध्यक्ष व विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी 'संमेलन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सहगल यांना पाठवायच्या पत्राचा मसुदा इंग्रजीत करून द्या,' अशी विनंती मला केली होती, त्यानुसार मदत केली. मात्र, कोणी त्याकडे महामंडळाचा निर्णय वा निर्देश म्हणून पाहत असेल, तर ते चुकीचे आहे, असे महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी म्हटले आहे.

महामंडळाने वा अध्यक्षांनी असे पत्र पाठवण्याचे आदेश दिलेले नाहीत. तो पर्याय मला तेव्हाही मान्य नव्हता व आजही नाही. पण संस्था आणि व्यक्तिगत भूमिका यांची सरमिसळ करायची नसते, हा विवेक आहे. महामंडळ आणि विदर्भ साहित्य संघ या वेगवेगळ्या संस्थांच्या जबाबदाऱ्यांचे वहन या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. त्याची सरमिसळ होऊ नये. तरीही हे जाणून न घेता केवळ वैयक्तिक आरोपबाजीच करण्यात कुणाला रुची असेल, तर त्यातला आनंद त्यांना घेऊ द्यावा, असे श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी म्हटले आहे. 

 

भाषांतरासाठी मदत घ्यावी इतके आम्ही कच्चे नाहीत 
महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्याकडे जाऊन आम्ही पत्राचा मसुदा इंग्रजीत करून मागावा, एवढे आमचे इंग्रजीविषयक ज्ञान कच्चे नाही, असा टोला निधी संकलन समितीचे अध्यक्ष पद्माकर मलकापुरे यांनी जोशींना लगावला आहे. केवळ पत्राचा मसुदा इंग्रजीत करून मागण्यासाठी दोन ते अडीच हजार रुपये खर्चून नागपूरला गेलो नसतो. मसुदा मेलवरही मागवता आला असता, हे जोशींनी लक्षात घ्यावे. जोशी यांनी आयोजक संस्थेत पेरलेले त्यांचे हेर प्रा. विवेक विश्वरूपे हे इंग्रजीचे प्राध्यापक आहेत. शिवाय, प्रा. कोलतेंकडूनही मसुदा इंग्रजीत करून घेता आला असता. हेकेखोर जोशींनी आपले पाप लपवण्यासाठी मसुदा मुद्दाम इंग्रजीत करून पाठवला. त्यांनी डाॅ. कोलते व यवतमाळकरांची बदनामी केली. त्यांनी आपल्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन ते पद व्यासंगी व्यक्तीकडे सोपवावे. जोशींची लपवाछपवी उघड झाली आहे. त्यांनी घडवलेल्या गैरसमजापोटी संमेलनात न येण्याचा निर्णय घेतलेल्या सर्वांनी मोकळ्या मनाने यावे, असे आवाहनही मलकापुरे यांनी केले.

 

संमेलन आयोजकांनी सुचवलेल्या संभाव्य 'उद‌्घाटकां'चाही नकार 
सहगल यांचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केल्यानंतर महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आयोजक संस्थेचे कार्याध्यक्ष रमाकांत कोलते यांना एसएमएस करून उद््घाटक म्हणून नावे पाठवण्याची विनंती केली होती. त्यानुसार प्रा. महेश एलकुंचवार, ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार, ख्यातनाम वऱ्हाडी कवी विठ्ठल वाघ व संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील ही चार नावे आयोजक संस्थेने जोशी यांना पाठवली. दरम्यान, या चौघांनीही आपल्याशी अद्याप काहीच संपर्क झाला नसल्याचे सांगितले आहे. एलकुंचवार, द्वादशीवार आणि वाघ यांनी जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तर, पाटील यांनी अद्याप स्पष्ट केले नाही. 

बातम्या आणखी आहेत...