आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडच्या साहित्यिकांचाही संमेलनावर बहिष्कार; साहित्य मंडळाच्या अध्यक्षांनीच उपद‌्व्याप केल्याचा फुलारी, देशमुख यांचा आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- येथील साहित्य वर्तुळातही नयनतारा सहगल प्रकरणाचे पडसाद उमटले असून साहित्यिकांनी यवतमाळ येथील साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकला असल्याची माहिती ज्येष्ठ कवी देविदास फुलारी यांनी दिली आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनीच हे उपद्व्याप केले असल्याचा आरोप फुलारींसह प्रभाकर कानडखेडकर यांनी केला आहे. 

 

देविदास फुलारी हे ज्येष्ठ कवी असून त्यांना यवतमाळ येथील साहित्य संमेलनाच्या आयोजकाकडून रीतसर निमंत्रण आले आहे. साहित्य संमेलनात आयोजित मान्यवर कवींच्या विशेष कविसंमेलनातही त्यांचा समावेश करण्यात आला होता. निमंत्रण पत्रिकेत त्यांचे नावही छापण्यात आले आहे. परंतु नयनतारा सहगल प्रकरणाने यवतमाळ साहित्य संमेलनाला जायचे नाही, असा निर्णय त्यांनी घेतला आहे. साहित्यिक डाॅ. केशव सखाराम देशमुख यांनीही या संमेलनाला जायचे नाही, असा निर्णय घेतला आहे. डाॅ. केशव सखाराम देशमुख संमेलनात आयोजित परिसंवादातील वक्ते म्हणून जाणार होेते. परंतु संमेलनाच्या निमित्ताने उफाळलेले वाद पाहता तेथे कोणी आपले विचार शांतचित्ताने ऐकून घेण्याची शक्यता नाही. त्यामुळे तेथे जाणे म्हणजे आपला वेळ व्यर्थ घालविणे असल्याची भूमिका घेऊन त्यांनीही संमेलनाकडे पाठ फिरवली आहे. 

 

यशवंतराव चव्हाण उतरले होते व्यासपीठावरून :

साहित्यिक हा सरकारचा प्रवक्ता नसतो. यापूर्वी दुर्गाबाई भागवत यांनी राजकीय नेत्यांचे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर काय काम असा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा यशवंतराव चव्हाणांसारखा, जे स्वत: साहित्यिकही होते, राजकीय नेता व्यासपीठावरुन उतरून खाली जाऊन बसला. मग आताच्या नेत्यांना नयनतारांचे विचारही ऐकून घेण्याची मानसिकता नाही असा संदेश या निमित्ताने गेला. राज्य आणि केंद्र सरकारकडे संशयाची सुई फिरली. हा सर्व उपद्व्याप साहित्य मंडळाच्या अध्यक्षामुळेच झाल्याचा आरोप देविदास फुलारी व प्रभाकर कानडखेडकर यांनी केला. 

 

साहित्य महामंडळाकडे बोट 
ज्येष्ठ कवी देविदास फुलारी व प्रभाकर कानडखेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वाद साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्यामुळेच उफाळला आहे. कोणतेही कारण नसताना त्यांनी हा वाद घडवून आणला. नयनतारा सहगल उद्घाटनाला आल्या असत्या तर संमेलनाची उंची निश्चितच वाढली असती. नयनतारा सहगल यांचे विचार, आचार यापूर्वीच संपूर्ण देशाला माहीत आहेत. केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात त्यांनी यापूर्वीच पुरस्कार वापसीची भूमिका घेतली होती. ते माहिती असूनही त्यांना निमंत्रण का दिले हे श्रीपाद जोशी यांनी सांगितले पाहिजे. निमंत्रण दिल्यानंतरही ते परत का घेतले याचाही खुलासा त्यांनी केला पाहिजे. 
 

बातम्या आणखी आहेत...