आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिसऱ्या आघाडीचा तिढा : राज्यातील दहा पुरोगामी पक्षांनी वंचित आघाडीकडे फिरवली पाठ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सहा महिन्यापूर्वी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीकडे एमआयएम वगळता राज्यातील सर्व छोट्या पक्षांनी पाठ फिरवली आहे. हे पक्ष काँग्रेसच्या महाआघाडीत जाण्यात इच्छुक असून त्यांनी वंचित आघाडीत सामील होण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आंबेडकर -ओवेसी यांच्या वंचित आघाडीच्या वाट्यासच वंचना आली आहे. 

 

जून महिन्यात प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. त्यानंतर औरंगाबाद, साेलापूर आणि नागपूर येथे आघाडीच्या जंगी सभाही झाल्या. सभांना गर्दीही मोठी होती. मात्र, तरी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल-मुसलमीन (एएमआयएम) वगळता इतर कोणताही पक्ष अद्याप वंचित बहुजन आघाडीत सामील झालेला नाही. समाजवादी, माकप, भाकप, जनदा दल युनायटेड, जनता दल धर्मनिरपेक्ष, शेकाप, स्वाभिमानी, बहुजन विकास आघाडी, पीआरपी या राज्यातील दहा छोट्या पुरोगामी पक्षांना वंचित आघाडीत सहभागाचे निमंत्रण होते. मात्र, सर्वच्या सर्व छोट्या पक्षांनी त्याला नकार दिला आहे. स्वाभिमानी, बहुजन विकास आघाडी आणि मार्क्सवादी वगळता छोटे पक्ष लोकसभेसाठी इच्छुक नाहीत. मात्र, आगामी विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादीने आमच्यासाठी काही जागा सोडाव्यात, अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही सध्या काँग्रेसच्या निर्णयाची वाट पाहतोय, असे या छोट्या पक्षांकडून दिव्य मराठीला सांगण्यात आले. 

 

यासंदर्भात वंचित आघाडीचे नेते लक्ष्मण माने (सातारा) यांना विचारले असता ते म्हणाले, आमची वंचित आघाडी साळी, कोळी, माळी,न्हावी, वडार, पारधी अशा आलुत्याबलुत्यांच्या संघटनांचे फेडरेशन आहे. छोट्या पक्षांची मानसिकता अभिजनवादी आहे, त्यामुळे ते आमच्यात येत नाहीत, असा आरोपही माने यांनी केला आहे. 

 

दरम्यान, ही आघाडी राज्यात तिसरा पर्याय देऊ शकत नसल्याचे छोट्या पक्षांकडून मिळणाऱ्या अल्प प्रतिसादावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता आंबेडकर आणि ओवेसी वंचित आघाडीबाबत काय निर्णय घेतात याकडे राज्यातील जनतेचे आणि काँग्रेस राष्ट्रवादीसह इतर महत्त्वाच्या पक्षांचे लक्ष लागले आहे. 

 

वंचित आघाडीत संघटनांचाच भरणा 
आंबेडकर यांनी वंचित आघाडी स्थापन केली असली तरी ते सध्या काँग्रेसशी वाटाघाटी करतच आहेत. त्यामुळे वंचित आघाडीला कोणी गांभीर्याने घ्यायला तयार नाही. जागावाटपात काँग्रेसवर दबाव वाढावा यासाठीचे वंचित आघाडी स्थापन केल्याचे काँग्रेसचे नेते सांगत आहेत. २०१४ च्या राज्यातील विधानसभेला प्रकाश आंबेडकर यांनी १३ पक्ष-संघटनांची महाराष्ट्र लोकशाही आघाडी स्थापन केली होती. पण त्या आघाडीत पक्ष कमी आणि संघटनाच अधिक होत्या. सध्याच्या वंचित आघाडीत एमआयएम वगळता एकूणएक सामाजिक संघटनाच आहेत. 

 

गेल्यावेळी ७० पैकी जिंकली एकच जागा 
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भारिपने राज्यात ७० जागा लढवल्या होत्या. त्यातील एक जागा जिंकली. तर ६२ जागी अनामत रक्कम जप्त झाली होती. एमआयएमने २४ जागा लढवल्या. १४ जागी अनामत रक्कम जप्त झाली होती आणि दोन जागांवर विजय मिळवता आला. वंचित आघाडीतील या दोन्ही पक्षांची मतांची टक्केवारी जेमतेम १ टक्के होती. एकूण, आंबेडकर-ओवेसी यांच्या 'दलित-मुस्लिम' आघाडीची चर्चा ही देशभरातील लहान पक्षांच्या भूमिकेच्या संदर्भात आणि आघाड्यांच्या राजकरणाच्या भावी शक्यतांच्या संदर्भात महत्त्वाची आहे. त्यामुळे देखील छोटे पक्ष वंचित आघाडीकडे येत नाहीत.