आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दामदुपटीच्या आमिषात अडकले ४८ हजार जण; ९० कोटीही पडले अडकून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- दामदुपटीच्या आशेने कष्टकऱ्यांसह अनेक सुशिक्षित कुटुंबातील नागरिकांनीही घामाचे पैसे गरिमा रिअल इस्टेट आणि मैत्रेय कंपनीत गुंतवले. २ हजारांपासून ते १३ लाखांपर्यंत लोकांनी गुंतवणूक केल्याचे तेराशे जणांच्या जबाबातून समोर आले. परंतु, दुप्पट पैसे तर नाहीच, शिवाय मुद्दलही मिळत नसल्याने ठेवीदारांनी पोलिसांत धाव घेतली. एकट्या जालना जिल्ह्यातील ४८ हजार नागरिकांनी दोन्ही कंपन्यांमध्ये तब्बल ९० कोटींजवळ गुंतवणूक केल्याचे तपासात समोर आले. नाशिक जिल्ह्यात मैत्रेय कंपनीच्या ठेवीदारांना दीड कोटी वाटप झाले. परंतु, जिल्ह्यात गतवर्षी गुन्हा दाखल होऊनही पैसे मिळत नसल्याने ठेवीदार हतबल झाले. दरम्यान, गरिमा कंपनीच्या मुख्य सूत्रधारास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याने तक्रारी देण्यासाठी गुंतवणूकदार सर्टीफिकेटसह तक्रारी देण्यासाठी रांगा लावत आहेत. 


मैत्रेय कंपनीतील ठेवीबाबत सदर पोलिस ठाण्यात १ डिसेंबर २०१७ रोजी गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, या प्रकरणात या पोलिसांनी कुठल्याच प्रकारचा ठोस तपास न लावल्यामुळे ठेवीदारांतून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, मैत्रेय कंपनीला महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे गुंतवणूकदार याकडे आकर्षित झाले. २०१५ पूर्वी मैत्रेयने ग्राहकांच्या ठेवी वेळेच्या वेळी चोख परत केल्या. परंतु, जुलै २०१५ नंतर कंपनीने परतावा दोन महिने उशिरा देणे सुरू केले. ३ हजारांच्या जवळपास चेक बाउन्स झाल्याचे गुंतवणूकदार ग्रुपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ४ फेब्रुवारी २०१६ रोजी मैत्रेयच्या संचालिका वर्षा सतपाळकर यांना नाशिक सरकारवाडा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. यानंतर भारतातील सर्वच कार्यालये बंद झाली. 


नाशिकमधील गर्दी लक्षात घेता ठेवीदारांनी आपापल्या तक्रारी संबंधित जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. दरम्यान, जालना येथील सदर बाजार पोलिस ठाण्यात डिसेंबर २०१७ मध्ये गुन्हा दाखल होऊनही समाधानकारक तपास नसल्याने ठेवीदारांतून नाराजी आहे. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात यावे, अशी मागणी गुंतवणूकदारांनी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने गरिमा रिअल इस्टेट कंपनीचा मुख्य सूत्रधार माजी आमदार बनवारीलाल कुशवाह याला राजस्थान येथून ताब्यात घेतल्याने कुशवाह याची रत्नागिरीतील मालमत्तेचा कोर्टाच्या आदेशाने लिलाव होऊन रक्कम दिली जाणार असल्याने जालनेकरांच्या अपेक्षा उंचावल्या. मैत्रेयचा हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी मागणी गुंतवणूकदार नीरज कांबळे, कचरुलाल विलासचंद्र मदनलाल गौड, संतोष उखळे, प्रिया मिटकर, पांडुरंग मिटकर, स्विटी नरेंद्र दायमा आदींनी केली आहे. 

 
दोन्ही कंपन्यांची जिल्ह्यात अशी आहे स्थिती 
गरिमा : जिल्ह्यात २०१० ते २०१५ या दरम्यान गरिमा रिअल इस्टेट कंपनीने जवळपास १ हजार ८०० च्या जवळपास गुंतवणूकदारांकडून प्रथमदर्शनी ६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यात १३०० जणांचे पोलिसांनी जबाब घेतले आहेत. यातील आरोपी हा जालना पोलिसांच्या ताब्यात अाहे. 


मैत्रेय : जिल्ह्यात ४७ हजार गुंतवणूकदारांच्या ठेवी आहेत. याबाबत सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. परंतु, पोलिसांकडून पाहिजे तसा तपास होत नाही. नाशिक जिल्ह्यात १ हजार ३६६ ठेवीदारांना दीड कोटी रक्कम वाटप झाली. परंतु, जिल्ह्यात मात्र हे प्रकरण अजूनही तपासात अडकलेले असल्याने गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. 


दामदुप्पटसाठी गरिमा कंपनीत गुंतवणूक केलेल्या नागरिकांची आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयासमोर सर्टिफिकेटचे फाॅर्म भरून देण्यासाठी अशी गर्दी होत आहे. 


तपास सुरू 
गरिमा रिअल इस्टेटचा मुख्य सूत्रधार ताब्यात घेतला आहे. दरम्यान, अजूनही तक्रारी येत असून, गरिमाच्या माध्यमातून ६ कोटीपर्यंत उलाढाल झाल्याचे समोर येत आहे. मैत्रेयबाबत अजून आमच्याकडे काही नाही. 
- सोपान बांगर, पो. नि. आर्थिक गुन्हे शाखा, जालना. 


अनेकदा चकरा 
नाशिकला मैत्रेयमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना परतावा रक्कम मिळाली. जालना जिल्ह्यात ४७ हजार नागरिकांनी ८० कोटींजवळ गुंतवणूक केली. वारंवार पोलिसांकडे चकरा मारल्या. आर्थिक गुन्हे शाखेकडे हा गुन्हा वर्ग करून न्याय मिळावा. 
- नीरज कांबळे, ठेवीदार ग्रुप, जालना. 

बातम्या आणखी आहेत...