आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंत्री राम शिंदे आमचे सोयरे, त्यांना पोस्टाने आमचा बैल पाठवा; पाेस्टमास्तर म्हणाले, जमणार नाही, मग पाठवला मातीचा बैल!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई (जि.बीड)- पशुधन जगवण्यासाठी कैफियत मांडणाऱ्या नगरच्या शेतकऱ्यांना मंत्री राम शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी 'चारा नाही तर जनावरे पाहुण्यांकडे पाठवा', असा अजब सल्ला दिला होता. यावर गुरुवारी उमापूर (ता. गेवराई) येथील तरुणांनी मंत्री शिंदे हे आमचे सोयरे आहेत. त्यांना बैल पोस्टाने पाठवायचा आहे, असे म्हणत खराखुरा बैल घेऊन थेट पोस्ट कार्यालय गाठले. अर्थात पोस्टाने प्राणी पाठवता येत नसल्याचे पोस्टमास्तरांनी सांगितले. अखेर मंत्री राम शिंदे यांना मातीचा बैल पोस्टाने पाठवून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. 

 

चारा-पाण्याच्या टंचाईमुळे पशुधन जगवताना शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे. बीड जिल्ह्यात एकही चारा छावणी सुरू झालेली नाही. छावणी ऐवजी दावणीला चारा देण्याची मागणी होत आहे. यामुळे मंत्री राम शिंदेंच्या वक्तव्याचा संदर्भ घेत गुरुवारी उमापूर येथील धनगर समाजाचे रवी देशमुख यांनी मित्र ज्ञानेश्वर हवाले, विशाल राऊत, अनिल देशमुख यांच्यासह पोस्ट कार्यालय गाठले. मंत्री राम शिंदे हे आमचे सोयरे आहेत. दुष्काळात बैल जगवणे अवघड आहे. तो त्यांच्याकडे पाठवायचा आहे, असे पोस्ट अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र, प्राणी पोस्टाने पाठवता येत नसल्याचे पोस्टमास्तरने त्यांना सांगितले. 

 

३९ रु. खर्चून मातीची बैलजोडी पाठवली 
पोस्ट मास्तरांनी नकार देताच देशमुख यांनी ३९ रुपयांचा खर्च करत मातीची बैलजोडी व पत्र मंत्री राम शिंदे यांच्या पत्त्यावर पाठवले. पत्रात कर्जमाफी, ५० हजार रुपये हेक्टरी अनुदान, दावणीला चारा, जनावरांसाठी पाणी, मेंढ्या चारण्यासाठी गायरान जमीन उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या केल्या आहेत. 

 

... तर आंदोलन करणार 
पंधरा दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास शेळ्या, मेंढ्यांसह मंत्री राम शिंदे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल. - रवी देशमुख, शेतकरी , उमापूर