सावत्र बाप व / सावत्र बाप व पत्नीचे होते अनैतिक संबंध..उर्ध्व कालव्यात आढळून मोरेश्वरचा मृतदेह

 

Dec 29,2018 11:53:00 AM IST

धामणगाव रेल्वे- येथील मोरेश्वर सावरकर यांचा सावत्र बाप व पत्नीच्या अनैतिक संबंधातूनच खून करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली असून शुक्रवार (दि. २८) दोघांनाही अटक करण्यात आली आहे. मोरेश्वरचा रविवारी (दि. २३) गंगाजळीनजीकच्या उर्ध्व कालव्यात मृतदेह आढळून आल्यानंतर पत्नीनेच पतीचा खून झाल्याची तक्रारही पोलिसात दाखल केली होती.

धामणगाव रेल्वे येथील मोरेश्वर सावरकर (वय ३०) याचा रविवारी (दि. २३) गंगाजळीनजीकच्या उर्ध्व वर्धा कालव्यात मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचा पंचनामा केला असता शरीरावरील जखमांमुळे मोरेश्वरचा मृत्यू संशयास्पद असल्याची खात्री पोलिसांची झाली.

दरम्यान, पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. पोलिसांनी मोरेश्वरचे सावत्र वडील दादाराव मरसकोल्हे (वय ४९) व मृतकाची पत्नी कुसुम मोरेश्वर सावरकर (वय ३०) यांना ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसी हिसका दाखवताच दोघांनीही मोरेश्वरच्या खुनाची कबुली दिली. मोरेश्वर हा हॉटेलात काम करीत होता. त्याला दारूचे व्यसनह होते. यातून मोरेश्वर व पत्नी कुसुम यांच्यात सतत भांडणे व्हायची. यातूनच दादाराव मरसकोल्हे व कुसुम यांचे सुत जुळले. मोरेश्वर कामावर गेल्यानंतर दादाराव सुन कुसुमला पैसे द्यायचा. घटनेच्या शनिवारी (ता.२२) मोरेश्वर दारू प्राशन करुन घरी आला. त्यानंतर दादारावने मागील दाराने घरात प्रवेश केला. मोरेश्वर झोपल्याची खात्री करून त्याचा रुमालाने गळा आवळला. तो तडफडत असल्याचे पाहून कुसुमने पती मोरेश्वरचे दोन्ही हात पकडले. मोरेश्वरचा मृत्यू झाल्यानंतर रात्री १२ वाजताच्या सुमारास मोरेश्वरचा मृतदेह दादारावच्या दुचाकीवर ठेवला. आपल्याला कुणी ओळखू नये म्हणून दादारावने मोरेश्वरचे पॅन्ट शर्ट घातले. त्यानंतर दादाराव व कुसुम यांनी मृतदेह दुचाकीवर मध्ये ठेऊन गंगाजळी शिवारातील उर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यात टाकून दिला. परंतु कालव्याला पाणी नसल्यामुळे मृतदेह वाहुन गेला नाही. दादाराव व कुसूमच्या संबंधात मोरेश्वर अडसर ठरल्यानेच त्याचा खून करण्यात आल्याची कबुली दोन्ही आरोपींनी दिली.

पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून आरोपींना शोधून काढले. याप्रकरणाची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश शिंगटे यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली. या गुन्हयाचा तपास ठाणेदार रवींद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राम सुरवसे,जमादार पुंडलिक चव्हाण,पोलिस नाईक नरेंद्र मेश्राम,गणेश गायकवाड, जगदीश राठोड, नीलेश चहांदे यांनी तपास केला.

X