आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मुंबई पुणे मुंबई-3\' मधील \'आई तू बाबा मी होणार गं...कुणी येणार गं...\' हे नवीन गाणे ट्रेंड स्थापित करण्यास सज्ज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळी हा वर्षाचा, अपार आनंदाचा पवित्र सण साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र येत असते. या आनंदामध्ये यंदा भर पडली ती ‘मुंबई पुणे मुंबई-3’ या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या बहुप्रतीक्षित चित्रपटातील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गाण्याच्या घराघरातील आगमनाने. हे अगदी वेगळ्या शैलीचे गाणे जेवढे कर्णमधून आहे तेवढेच कुटुंबवत्सल आहे.

 

यंदा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित केले. यावेळी संपूर्ण कलाकार चमू आणि या चित्रपटाची हिट जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे उपस्थित होती. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत एक इतिहास रचला गेला आहे. पाच वर्षांपूर्वी आलेल्या ‘मुंबई पुणे मुंबई’ या चित्रपटाचा हा तिसरा भाग प्रदर्शित होत असून अशा पद्धतीने तीन भागात प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. ‘मुंबई पुणे मुंबई-३’च्या माध्यमातून स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे साकारात असलेल्या जोडीच्या आयुष्यातील महत्वाचा तिसरा टप्पा प्रेक्षकांसमोर येणार आहे. इतर कोणत्याही जोडीच्या आयुष्यात असतात तसेच टप्पे या जोडीच्या आयुष्यात असल्याने ही जोडी आणि त्यांची कथा पुन्हा एकदा घराघरात पोहोचणार आहे. हे गाणे पारंपारिक डोहाळजेवण (आता त्याला बेबी शॉवर असेही म्हणतात) समारंभातील असून ते चित्रपट 7 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाल्यावर घराघरात पोहोचेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. 

 

 ‘आई तू बाबा मी होणार गं...कुणी येणार गं’ हे गाणे हृषीकेश रानडे, आनंदी जोशी, सई टेंभेकर, जयदीप बागवाडकर, वर्षा भावे, योगिता गोडबोले आणि मंदार आपटे यांनी गायले आहे. या गाण्याला संपूर्ण नवा साज असून कानाला भावेल असे संगीत निलेश मोहरीर यांनी दिले आहे. देवयानी कर्वे-कोठारी आणि पल्लवी राजवाडे यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

 चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले, “डोहाळ जेवण ही केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात साजरी होणारी एक जुनी परंपरा आहे. हल्ली त्याला ‘बेबी शॉवर’ म्हटले जाते. हे गाणे एमपीएम-३ या तंत्रावर संपूर्णतः वेगळ्या पद्धतीने साकारले आहे. या गाण्यामध्ये जो खेळ खेळला गेला आहे, तो आम्ही राजवाडे कुटुंब कार्यक्रमासाठी एकत्र आलो की खेळत असू. मोठ्या एकत्र कुटुंबात हे अशाप्रकारे समारंभ साजरे करायला खूप मजा येते. माझी खात्री आहे कि हे गाणे एक नवीन ट्रेंड सुरु करेल. या गाण्याच्या सहजसाधेपणामुळे हे गाणे पटकन ओठांवर रेंगाळते आणि लक्षात राहते.”

 

 एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटच्या या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आणि त्याला मराठी चित्रपट रसिकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसादही लाभतो आहे.
‘मुंबई पुणे मुंबई’च्या पहिल्या दोन भागांना मिळालेला प्रतिसाद तिसऱ्या भागातही पुनरुक्त होईल, असा विश्वास निर्माते संजय छाब्रिया आणि सहनिर्माते व ‘52 फ्रायडे सिनेमाज’चे अमित भानुशाली तसेच दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी व्यक्त केला. या चित्रपटाच्या उच्च निर्मितीमूल्यांमुळेच हा विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटच्या नावावर अनेक हिट मराठी चित्रपटांची नोंद आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाइम प्लीज, मुंबई पुणे मुंबई-२, बापजन्म आणि आम्ही दोघी यांसारख्या चित्रपटांची निर्मिती आणि त्यांचे सादरीकरण कंपनीने केले आहे.

 

गोड बातमी देणारं "कुणी येणार गं" गाणं आलंय...
पाहा, शेअर करा आणि आमच्या आनंदात सामील व्हा !!#KuniYenarGa Song Out Now #MPM3 #MPM3On7Dec

मुंबई❤पुणे❤मुंबई ३

Music - Nilesh Moharir
Lyrics - #DevayaniKarveKothari & Pallavi Satish Rajwade https://t.co/oJG6clCxB5

— Mukta Barve (@muktabarve) November 13, 2018
बातम्या आणखी आहेत...