आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेचे आयुक्त म्हणतात, मनपात दलाल जास्त असल्याने तिथे बसणे टाळतो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महापालिकेत सर्वसामान्य नागरिकांपेक्षा दलालच जास्त येतात. म्हणून आपण महापालिका मुख्यालयात थांबत नाही, असे स्पष्टीकरण आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी पत्रकारांना दिले. दलालांना टाळण्यासाठी भारतीय प्रशासन सेवेतील आयुक्तांसारखा अधिकारीच महापालिका आवार टाळत असेल तर तिथले तथाकथित दलालांचे राज्य संपवण्याचे काम कोणी करायचे, असा प्रश्न आयुक्तांच्या या स्पष्टोक्तीमुळे विचारला जाऊ लागला आहे. 


औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त निपुण विनायक यांना पदभार घेऊन आता चार महिने झाले आहेत. प्रारंभीचा थोडा काळ वगळता आयुक्त म्हणून महापालिकेच्या आपल्या दालनात उपस्थित राहणे त्यांना आवडत नाही, असाच अनुभव सातत्याने येत राहिला आहे. पत्रकारांनादेखील अनेक प्रशासकीय आणि आर्थिक निर्णयांच्या बाबतीत अधिकृत माहिती हवी असेल तर आयुक्त उपलब्ध होत नाहीत. ते कार्यालयात नसतील तर मोबाइल फोनद्वारेही उपलब्ध होत नाहीत. संवादासाठी 'ट्विटर'चा उपयोग करा, असा त्यांचा आग्रह असतो. ट्विट केल्यानंतरही त्याला त्यांच्याकडून अनेकदा प्रतिसाद मिळतच नाही. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराविषयी पत्रकारांनाही अधिकृत माहिती मिळत नाही. अशा परिस्थितीत सर्वसामान्य औरंगाबादकरांनी काय करायचे, हा अलीकडे सातत्याने विचारला जात असलेला प्रश्न मंगळवारी पत्रकारांनी त्यांना छत्रपती शिवाजी पुराणवस्तू संग्रहालयात गाठून विचारला. वस्तू संग्रहालयात एका उच्चस्तरीय बैठकीसाठी ते उपस्थित आहेत, अशी माहिती मिळाल्यामुळे पत्रकार तिथे गेले होते. आयुक्तांनी मात्र 'दलालांना टाळण्यासाठी' असे कारण सहज देऊन टाकले. विशेष म्हणजे एका पाहणी दौऱ्यानंतर महापौर आणि अन्य काही पदाधिकारीही त्या वेळी तिथे पोहोचले होते. त्यांच्यासमोरच आयुक्तांनी हे विधान केले. 


संवादासाठी ट्विटरचा वापर, मात्र ट्विटलाही अनेकदा प्रतिसादच नाही 
आयुक्तांनी ८ सप्टेंबरला केलेले ट्विट : WAS WONDERING THOUGH, IS ONLY THE OFFICIALS/EMPLOYEES WHO ARE CORRUPT? 


नक्की कोण आहेत हे दलाल? 
पत्रकारांनी आयुक्तांना थेट हा प्रश्नही विचारला. त्यावर 'तुम्ही समजून घ्या काय ते' असे आयुक्त म्हणाले. काही दिवसांपूर्वी महापालिकेतील एका अधिकाऱ्याला आणि त्याच्या सहायकाला लाच घेताना महापालिका आवारातच रंगेहाथ पकडण्यात आले. त्या दिवशी आयुक्त निपुण यांनी एक ट्विट केले होते. केवळ अधिकारी आणि कर्मचारीच भ्रष्टाचार करतात का? असा सूचक प्रश्न त्या ट्विटद्वारे त्यांनी जाहीरपणे उपस्थित केला होता. त्यामुळे त्यांच्या 'दलाल' या शब्दातही काही सूचक अर्थ दडला आहे का, असे विचारण्याचा प्रयत्नही पत्रकारांनी केला. मात्र, त्याला उत्तर न देता आयुक्त तिथून निघून गेले. 


'दिव्य मराठी'चा आयुक्तांना जाहीर प्रश्न 
महापालिकेचे आयुक्त ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. महापालिकेच्या प्रशासकीय आणि आर्थिक कारभारावर आयुक्तांचेच नियंत्रण असले पाहिजे. त्यासाठी त्यांची उपस्थिती महापालिकेच्या आवारात विशिष्ट काळ असणे अपेक्षित असते. आयएएस दर्जाचा अधिकारी महापालिका आवारात उपस्थित असेल तर एक दबदबा असतो आणि अनेक गैरप्रकारांना आपोआपच काही प्रमाणात आळा बसू शकतो. ही बाब लक्षात घेता आयुक्तच तथाकथित दलालांच्या तिथल्या अस्तित्वाला आळा घालू शकतात, हे उघड आहे. असे असताना आयुक्तच त्यांना टाळण्यासाठी महापालिकेबाहेर राहत असतील तर दलालांवर नियंत्रण आणायचे कोणी? असा जाहीर प्रश्न औरंगाबादकर नागरिकांच्या वतीने 'दिव्य मराठी' आयुक्तांना विचारत आहे. 


आयुक्तांची बनावट सही करून कोट्यवधी रुपयांची खोटी बिले काढल्याचे प्रकरण मागच्याच वर्षी याच महापालिकेत उघडकीस आले आहे. आपल्या प्रभागातील कामे व्हावीत म्हणून अनेक नगरसेवकांनाच कामांच्या फाइल्स घेऊन महापालिकेत फिरावे लागते. त्याशिवाय काम पुढे सरकतच नाही, अशा नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. अनेक दलाल बिलांच्या आणि टेंडर्सच्या फाइल्स घरी घेऊन जातात, असेही यापूर्वी उघडकीस आले आहे. काही दिवसांपूर्वीच फाइल मंजुरीसाठी आपल्यावर एका पदाधिकाऱ्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार एका अभियंत्याने पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांना वरिष्ठांच्या आधाराची गरज असते, ही बाब महत्त्वाची नाही का? अनेकदा वेगवेगळ्या अपेक्षेने अधिकारी काम करत नसतील तर सर्वसामान्यांनी कोणाकडे तक्रार करायची आणि दाद मागायची? हे प्रश्नही 'दिव्य मराठी' आयुक्तांना जाहीरपणे विचारत आहे. 

बातम्या आणखी आहेत...