आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दलाल बॉम्ब' अंगलट आल्यानंतर आयुक्तांचा मनपात ४.५ तास तळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महापालिकेत काम असलेले नागरिक कमी आणि दलालच जास्त येत असल्याने आपण तेथे बसणे टाळतो, हे वक्तव्य अंगलट आल्यानंतर आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी गुरुवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत म्हणजेच साडेचार तास मुख्यालयात तळ ठोकला. सकाळी याची फारशी कोणाला कल्पना नव्हती. परंतु आयुक्त मुख्यालयात आल्याचे समजताच ११ वाजेपासून येथे अभ्यागतांचा जणू मेळाच भरला होता. दुपारी १ वाजता आयुक्त जेवणासाठी निघाले. कार्यालयातून मोटारीपर्यंत जाण्यासाठी त्यांना तब्बल पाऊण तास लागला. पावणेदोन वाजता नागरिकांच्या गराड्यातूनच त्यांना जावे लागले. तेथे माध्यमांचे प्रतिनिधी छायाचित्रे काढत होते तसेच चित्रीकरण करत होते. तेव्हा बहुधा ते चिडले असावेत. आता माझा काय घरापर्यंत पाठलाग करता की काय? अशा शब्दांत त्यांनी राग व्यक्त केला. यापुढे मुख्यालयात दररोज येणार का, या प्रश्नाचे उत्तर मात्र त्यांनी दिले नाही. 


प्रारंभीचे काही दिवस संपल्यानंतर डॉ. निपुण यांनी महापालिका मुख्यालयात न बसता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र तसेच अन्य ठिकाणी बसूनच कारभार हाकणे सुरू केले. याला नागरिकांसह नगरसेवकांचाही आक्षेप होता. नगरसेवकांच्या अनेक संचिका तुंबल्या होत्या. तेव्हा 'आयुक्त शोधून द्या अन् एक हजार रुपये मिळवा' अशी योजनाही नगरसेवक कैलास गायकवाड यांनी जाहीर केली होती. त्यानंतर काही वेळासाठी आयुक्त मुख्यालयात आले होते. परंतु सर्वसाधारण सभा वगळता त्यांनी महापालिकेत येण्याचे कायमच टाळले. त्यामुळे त्यांना टीकेला सामोरे जावे लागले. 


मुख्यालयात न येण्याबद्दल त्यांच्यावर होत असलेल्या टीकेकडे डॉ. निपुण यांनी दुर्लक्ष केले. त्यातच मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी याच मुद्द्याकडे लक्ष वेधले तेव्हा डॉ. निपुण यांनी एकदमच बॉम्ब टाकला. मुख्यालयात दलालच जास्त येत असल्यामुळे आपण येण्याचे टाळतो, असे त्यांनी बिनधास्त सांगून टाकले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. 


महापालिकेत दलाल येत असतील तर येथे बसून दलालांना नीट करणे अपेक्षित असताना आयुक्तच पोलिसांनी चोरांना घाबरून पळावे तसे पळतो, अशी टीका झाली. ज्येष्ठ सनदी अधिकारी कृष्णा भोगे यांनीही तशीच टिप्पणी केली. गुरुवारी याबाबतचे वृत्त 'दिव्य मराठी'मध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर सकाळी बरोबर साडेनऊ वाजता डॉ. निपुण मुख्यालयात दाखल झाले. तेव्हा अन्य अधिकारीही आले नव्हते. 


सकाळी ९.३० वाजताच झाले मुख्यालयात हजर 
गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजताच आयुक्त डॉ. निपुण विनायक महापालिका मुख्यालयात आले. ११ वाजेपर्यंत त्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. तोपर्यंत 'आयुक्त मुख्यालयात आले रे' असा निरोप सर्वत्र पसरला होता. त्यामुळे ११ वाजेपासून त्यांच्या दालनात अभ्यागतांची गर्दी झाली. 


दररोज नियमित येऊन बसणार का? या पत्रकारांच्या प्रश्नाचे आयुक्तांनी उत्तर टाळले 
इकडे या घटनेची छायाचित्र काढण्याबरोबरच माध्यमांचे प्रतिनिधी चित्रीकरणही करत होते. आयुक्त डॉ. निपूण विनायक मोटारीत बसण्यासाठी निघाले तेव्हाही ते सुरूच होते. तेव्हा मात्र आयुक्तांनी 'आता तुम्ही काय माझा घरापर्यंत पाठलाग करणार का?' असा सवाल केला. 'आपण उद्यापासून नियमित येणार का?' असा सवाल पत्रकारांनी केला, परंतु त्यांनी उत्तर न देता मोटार गाठली. 


लोकांच्या गराड्यातून वाट काढणे अवघड 
१ वाजेपर्यंत आयुक्तांनी नागरिकांच्या भेटी घेतल्या. दुपारनंतर बैठक असल्याने १ वाजता ते निघाले. परंतु अभ्यागत त्यांची वाटेतच भेट घेत होते. त्यांनीही चालत निवेदने स्वीकारली. दालनापासून ते मोटारीपर्यंत येण्यासाठी त्यांना ४५ मिनिटे लागली. 


पाण्यासाठी घेराव 
समतानगर वॉर्डात गढूळ पाणी येत असल्याने तेथील नागरिकांनी नगरसेविका रेश्मा कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना घेराव घातला. तातडीने पाहणी केली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले. तरीही नागरिक ऐकत नव्हते. 


बंद सीसीटीव्ही सक्रिय करणार 
महापालिकेत दलाल सक्रिय असल्याचे समजल्यानंतर तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कॅमेरे बसवण्यात आले. परंतु काही दिवसांत ते बंद झाले. आता ते कॅमेरे पुन्हा सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. यापुढे बहुधा याचे चित्रीकरणही बघतील. 

 

बातम्या आणखी आहेत...