आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखोंची यंत्रे धूळ खात, आता कचरा साठवण्यासाठी 60 हजार पोती घेणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महानगरपालिकेने तात्पुरती व्यवस्था म्हणून नऊ प्रभागात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी २७ यंत्राचे नऊ संच लावण्यासाठी अडीच कोटी रुपयांची निविदा काढली. त्यापैकी तीन संचात ८१ लाखांची नऊ यंत्रे आली. एक यंत्र चिकलठाण्यात बसवले. ते पूर्ण क्षमतेने काम करत नाही. दोन यंत्र बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराकडून हिस्सा न मिळाल्याने मनपाने कार्यारंभ आदेश देण्यास विलंब केला. त्यामुळे यंत्र सुरू झाले नाही. आता डोकेदुखी ठरत असलेला सुका कचरा साठवण्यासाठी ६० हजार पोती (बारदाना, गोण्या) खरेदी करण्याचा निर्णय महापौर नंदकुमार घोडेले यांनी घेतला आहे. 

 

महापौर दालनात घोडेले यांनी सोमवारी घनकचरा व्यवस्थापन विभागाची बैठक बोलावली होती. शहरातील ओला कचरा संपत आला असून सुक्या कचऱ्याचे ढीग लागले आहेत. या कचऱ्याला आग लागण्याच्या घटनाही वाढत आहेत. त्यामुळे सुका कचरा नियंत्रणात आणण्यासाठी मनपाने पुन्हा एक नवीन प्रयोग राबवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार ६० हजार पोती खरेदी करून शहरातून निर्माण होणारा व रस्त्यावर पडून असलेला कचरा साठवण्याचे नियोजन केले. सुक्या कचऱ्यावरील नियोजनासाठी मनपाने बेलिंग मशीन खरेदी केल्या आहेत. प्रभागनिहाय एकूण सहा मशीन बसवल्या जाणार आहेत. पैकी तीन मशीन मनपाला अडीच महिन्यांपूर्वीच प्राप्त झाल्या. मात्र, यातील एकच बेलिंग मशीन चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्रावर सुरू आहे. तीही पूर्ण क्षमतेने काम करत नाही. 


रिलायन्स मॉलच्या आग प्रकरणावर अधिकारी गप्प : गेल्या रविवारी रात्री साडेदहा वाजता गारखेडा परिसरातील रिलायन्स मॉलच्या गाळ्यात मनपाने साठवलेल्या सुक्या कचऱ्याला आग लागली. ती विझवण्यासाठी रात्रभर अग्निशमन विभागाने शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, ही आग अचानक लागली की कोणी लावली? हे अद्याप समोर आलेले नाही. याची चौकशी होणे अपेक्षित होते. मात्र, सोमवारी महापौरांसह अधिकाऱ्यांनीही यावर मौन बाळगले. 


असे खरेदी केले तीन संच : डीपीअारनुसार श्रेडिंग आणि स्क्रीनिंगसाठी १६ लाख रुपये प्रत्येकी तर बेलिंग यंत्रासाठी तीन लाख रुपये गृहीत धरले होते. प्रत्यक्ष श्रेडिंग आणि स्क्रीनिंग यंत्र प्रत्येकी १२ लाख रुपये तर बेलिंग साडेतीन लाख रुपयात खरेदी केले. 


यंत्र पूर्ण क्षमतेने कार्यरत नाही 
सध्या चिकलठाणा केंद्रावर २७ लाख रुपयांचे तीन यंत्रे बसवली आहेत. त्यात श्रेडिंग, स्क्रीनिंग आणि बेलिंगचा समावेश आहे. बेलिंग यंत्रातून सुक्या कचऱ्याचे गठ्ठे तयार करण्यात येतात. मात्र हे यंत्र पूर्ण क्षमतेने काम करत नसल्याने मोठ्या प्रमाणात येथे सुका कचरा पडून आहे. अन्य दोन ठिकाणी लावण्यात येणारे बेलिंग मशीन सुविधा नसल्याने धूळ खात पडून आहे. मनपाने ही दोन्ही यंत्रे सुरू केल्यास नव्याने पाेती खरेदी करण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची गरज पडणार नाही. 


१५०० हजार मेट्रिक टन सुका कचरा पडून 
मनपाकडून सुका कचरा जमा करण्याचे काम सुरू आहे. जागोजागी कचरा साचला आहे. प्रशासनाने शहरात दीड हजार मेट्रिक टन सुका कचरा पडून असल्याचे सांगितले. वास्तविक यापेक्षा जास्त कचरा पडून आहे. हा कचरा गोण्यात भरण्यासाठी प्रभागनिहाय सहा ते सात हजार पोती दिली जाणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. 


बेलिंग यंत्र लावले तर सुटेल समस्या 
अंदाजे चार लाख रुपये खर्च करून सुका कचरा भरण्यासाठी ६० हजार पोती खरेदी करण्यात येतील. हा कचरा चिकलठाणा येथेच जाणार आहे. मात्र त्या यंत्राला हा सर्व कचरा झेपणार नाही. त्यामुळे मनपाने आलेले बेलिंग यंत्र लावले तरी शहरातील सुक्या कचऱ्याची समस्या सुटू शकते. 

बातम्या आणखी आहेत...