आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकमेकांना समजून घेण्यात हिंदू-मुस्लिम समाज कमी पडले : डॉ. आ. ह. साळुंखे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मुस्लिम मराठी साहित्य संमेलन हा दोन समाजांना जोडणारा उपक्रम आहे. भारतीय समाज संमिश्र स्वरूपाचा आहे. हिंदू - मुस्लिम समाजात हजार वर्षांचा संपर्क असून यात कटुता, युद्ध, संघर्षासोबत मैत्री, जिव्हाळाही आहे. भूतकाळातून काय घ्यायचे, भावी पिढ्यांना काय वारसा द्यायचा, हे ठरवणे आपली व साहित्यिकांची जबाबदारी आहे. पण एकमेकांना समजून घेण्यात हिंदू-मुस्लिम समाज कमी पडले, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह. साळुंखे यांनी शुक्रवारी व्यक्त केली. ते पुण्यात आयोजित १२ व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या उद््घाटनप्रसंगी बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, संमेलनाध्यक्ष डॉ. अलीम वकील, स्वागताध्यक्ष आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार , डॉ. विश्वनाथ कराड, महापौर मुक्ता टिळक आदी उपस्थित होते. सुफी साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. अलीम वकील हे या संमेलनाचे अध्यक्ष असून संमेलनस्थळाला प्रा.फक्रुद्दीन बेन्नूर साहित्यनगरी' नाव देण्यात आले आहे. या संमेलनात डॉ. विश्वनाथ कराड यांना डॉ. अबुल कलाम आझाद सद््भावना पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले. जुल्फी शेख, डॉ. मुहंमद आझम, आबेदा इनामदार, विलास सोनवणे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 

 

डॉ. साळुंखे म्हणाले, आपण सर्वजण समान दर्जाचे भारतीय नागरिक आहोत. कोणाच्याही देशावरील निष्ठेचे प्रमाणपत्र मागण्या-देण्याचा नैतिक, संवैधानिक अधिकार नाही, ही भावना देशात असणे गरजेचे आहे. कोणीही राष्ट्रविघातक काम करीत असेल तर त्याला रोखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. एखाद्या व्यक्तीच्या कृत्यावरून सर्व समाजाला संशयाच्या घेऱ्यात धरता येणार नाही. हजार वर्षांचा संपर्क असूनही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न झाला नाही, ही खंत आहे. एकमेकांचे ग्रंथ, साहित्य समजून घेतले नाही. अल्ला हो अकबर', हर हर महादेव' याचा अर्थ ईश्वर श्रेष्ठ इतकाच आहे. पण या घोषणा ऐकल्या की संशय, द्वेष उगीचच निर्माण होतो, हे संवादाअभावी होते. उर्दू ही भारतीय भाषा आहे, तरीही विरोध केला जातो. पेहराव, अन्नाच्या सवयींची देवाणघेवाण झालेली आहे. एकमेकांच्या साहित्याचा , धर्मग्रंथांचा अभ्यास करणारे पंडित दोन्ही समाजात घडावेत. मुस्लिम समाज मागास आहे म्हणून कर्तृत्ववानांनी मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करायला हवे. या समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणे ही साहित्यिकांची जबाबदारी आहे. दरम्यान, या संमेलनाला राज्यभरातून मराठी साहित्यप्रेमी उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. 

 

सर्व व्यासपीठांवर राजकारण्यांची लुडबुड नकाे : बापट 
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, संघटितपणे समाजात संदेश देण्यासाठी, मानव धर्माला उपयोगी काम या संमेलनातून होत आहे, ही चांगली बाब आहे. समाजातील वाईट गोष्टी उघडकीस आणणे आणि सकारात्मक गोष्टी पुढे आणण्याचे काम संमेलनाने करावे. राजकारण्यांनी सर्व व्यासपीठांवर लुडबुड करू नये, असे मला वाटते. राजकारण्याचे पद एक दिवस जाणार असते, पण साहित्यिकांचे पद अजरामर असते. आज मी हार, फुले घेऊन न जाता पुस्तके घेऊन जाणार आहे. त्यातूनच आमच्या वागण्यात, कामात बदल होणार आहे.' या वेळी डॉ.पी. ए इनामदार म्हणाले, प्रस्थापित साहित्यिकांनी नवोदित तरुणांना वाव द्यावा. नव्या तंत्रस्नेही तरुणांनी कालसुसंगत विचार आधुनिक माध्यमातून मांडावेत, असेही यांनी सांगितले.