आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुजय विखेंशी अखेर 'संपर्क', काँग्रेस-राष्ट्रवादीची यादी उद्या होणार जाहीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिका निवडणुकीत आघाडी करण्यासाठी पाच दिवसांनंतर अखेर राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे डॉ. सुजय विखे यांना वेळ मिळाला. शनिवारी विखे व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यात जागावाटप व आघाडीबाबत चर्चा झाली आहे. दरम्यान, शिवसेनेने तिसरी यादी जाहीर केली असताना भाजप सोमवारी दुसरी यादी जाहीर करणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी केली असताना काँग्रेस-राष्ट्रवादीत मात्र अजूनही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. 

 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वीच मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बैठक घेऊन आढावा घेतला होता. चव्हाण यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. दोन्ही प्रदेशाध्यक्षांनी या निवडणुकीची जबाबदारी डॉ. सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांच्यावर टाकली होती. आघाडी व जागा वाटपाबाबत राष्ट्रवादीकडून काँग्रेसशी संपर्क केला जात आहे. मात्र, त्यांच्याशी संपर्क होत नसल्यामुळे दोन्ही पक्षांतील इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 


दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचा दावा सांगणारे डॉ. सुजय विखे यांच्याशी त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांचा संपर्क होत नसल्यामुळे आता काय करायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेसचा निरोप येत नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारी याद्याही लांबणीवर पडल्या आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेशने निवडणुकीचे सर्व अधिकार विखे यांना दिले आहेत. स्थानिक पातळीवरील नेत्यांना आघाडी व उमेदवारी याद्यांबाबत विचारले असताना त्यांनीही वर हात करून आम्हाला काहीच माहीत नसल्याचे सांगितले. 


राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व दिल्लीत राहुल गांधी यांच्या टीममध्ये असलेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आम्हाला काही देणे-घेणे नाही, अशी भूमिका महापालिका निवडणुकीबाबत दाखवल्याने काँग्रेसमधील इच्छुकांची वाऱ्यावरची वरात झाली आहे. साडेचार वर्षापूर्वी देशात व राज्यात सत्तेवर असताना काँग्रेसचे राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात हे दोन मंत्री होते. सत्तेत असतानाही विखे-थोरात यांच्यात जमत नव्हते. आताही या दोघांमध्ये जमत नाही, पक्षांतर्गत विखे-थोरात यांच्यामधील गटबाजीचा फटका मात्र यापूर्वीही व आताही सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाच बसत आहे. 

 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही गट एकत्र येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ती आता फोल ठरत आहे. एकीकडे काँग्रेस अंतर्गत असलेली गटबाजी कायम असताना काँग्रेसने सुजय विखे यांच्यावर महापालिका निवडणुकीची जबाबदारी टाकली होती. राष्ट्रवादीकडून काँग्रेसला संपर्क केला जात असताना काँग्रेसकडून मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने दोन्ही पक्षांच्या याद्या रखडल्या होत्या. त्यामुळे आता कुणाशी संपर्क करायचा हा प्रश्न राष्ट्रवादीबरोबर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना पडला होता. मात्र, शनिवारी विखेंशी संपर्क झाल्यानंतर विखे व जगताप यांच्यात सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे येत्या दोन दिवसांत दोन्ही पक्षांचे चित्र स्पष्ट होणार आहे. एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीत हा घोळ असताना शिवसेनेने मात्र उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करून उमेदवारीसाठी पक्षांतर्गत असलेला संभ्रम दूर केलेला आहे. भाजपनेही दोन दिवसांपूर्वीच पंधरा उमेदवारांची यादी जाहीर केली असून, सोमवारी दुसरी यादी जाहीर होणार आहे. भाजपच्या कोअर कमेटीने दुसरी यादी मुंबईला पाठवली आहे. मुंबईतून मान्यता मिळताच ही यादी जाहीर केली जाणार आहे. 


तांबेंच्या उपस्थितीमुळे विखे गट नाराज? 
विशेष म्हणजे पाच दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसच्या झालेल्या बैठकीला या दोन्ही नेत्यांबरोबर सुजय विखे यांनी दांडी मारली होती. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे या बैठकीला हजर होते. तांबे यांना या बैठकीला बोलावल्यामुळे विखे गटांत नाराजी असल्याचे बोलते जाते. त्यामुळे सुजय सक्रिय झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

बातम्या आणखी आहेत...