आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईने दिले बालिकेच्या सर्वांगाला सळईने चटके:प्रियकरासह संशयित महिलेवर गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अनैतिक संबंधांना अडसर ठरत असलेल्या पाच वर्षीय मुलीच्या सर्वांगाला जन्मदात्या आईनेच तापत्या सळईने चटके दिल्याचा संतापजनक प्रकार गंगापूर परिसरात उघडकीस आला. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी मोखाडा पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, गुन्हा गंगापूर पोलिसांच्या हद्दीत घडल्याने मोखाडा पोलिसांतून गंगापूर पोलिसांत वर्ग करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या पत्नीचे तिच्या चुलत भावासोबत काही वर्षांपासून कथित अनैतिक संबंध आहेत. संशयिताने पत्नीला मोखाडा येथून नाशिकला आणले व गंगापूर परिसरात घर घेऊन दिले. पत्नीसोबत पाच वर्षीय मुलगी होती. सप्टेंबरमध्ये पत्नी आणि तिच्या प्रियकराने मुलीला बेदम मारहाण केली.

 

गरम सळईने हात, पाय, मांडी आणि पोटावर चटके दिले. तक्रारदाराने मुलीला मोखाडा येथे नेल्यानंतर आंघोळ घालताना तिच्या अंगावरील चटक्यांच्या खुणा पाहून त्यांना धक्काच बसला. मुलीने विचारले असता तिने 'मम्मी व मामाने चटके दिले', असे सांगितले. पीडित मुलीसह मोखाडा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गंगापूर पोलिसांनी संशयित विवाहिता व तिच्या कथित प्रियकराच्या विरोधात मारहाण व बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २००० कलम २३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.


पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी प्रलंबित 
तक्रारदार रुग्णवाहिकेवर चालक आहे. ते बाहेरगावी असल्याने जबाबासाठी आले नाही. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर खरा प्रकार पुढे येईल. - एन. जे. कंडरे, उपनिरीक्षक, गंगापूर

बातम्या आणखी आहेत...