आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदूषणाचे विघ्न टाळण्यासाठी घराघरात बाप्पांचे विसर्जन, 11 वाजताच मिरवणूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - बुद्धीचा अधिष्ठाता आणि विघ्नांचा नियंत्रक मानल्या जाणाऱ्या गणरायाला रविवारी (दि. २३) सर्वत्र भावपूर्ण निराेप दिला जाणार अाहे. जीवनाेत्सवात प्रदूषणासारखे विघ्न येऊ नये म्हणून यंदा नाशिककरांनी इकाे फ्रेंडली गणेशाेत्सवाची संकल्पना शब्दश: साकारली. बाप्पाचे विसर्जनही पर्यावरणस्नेही पद्धतीने हाेण्यासाठी शहरातील विविध संस्था पुढे अाल्या असून मूर्ती व निर्माल्य संकलनासाठी उपक्रम राबविण्याचे नियाेजनही करण्यात अाले अाहे. याशिवाय, महापालिकेच्या वतीने ७६ स्थानांवर मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात अाली असून, ३६ कृत्रिम तलाव उभारण्यात आले अाहेत. दुसरीकडे शाडू मातीच्या मूर्तीचे घरच्या घरी विसर्जन करण्याची तयारीदेखील सुजाण नाशिककरांनी केली अाहे. घराघरातच गणपती बाप्पांचे विसर्जन करावे, असे अावाहन 'दिव्य मराठी'च्या वतीने करण्यात अाले अाहे. यंदा प्रथमच पर्यावरणपूरक पद्धतीने सकाळी ११ वाजताच मिरवणूक काढण्याचे पोलिसांचे नियोजन आहे. 

 

कुटुंबियांसह मिरवणुकीचा घेता येणार आनंद 
गणेश विसर्जन मिरवणूक नागरिकांना कुटुंबियांसह पहाता यावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून सकाळी ११ वाजता मिरवणूक काढण्यात येणार आहे. पोलिसांच्या या आवाहनाला मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने नागरिकांनी मिरवणुकीचा अानंद घेण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. 


गणेशाेत्सव मिरवणूक प्रदूषण मुक्त निघणार आहे. या मिरवणुकीत गुलाल न वापरण्याचे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी केले आहे. पारंपरिक वाद्य वाजवण्यासाठी मंडळे आग्रही आहेत. सकाळी पारंपारिक मिरवणूक मार्ग वाकडी बारव येथून मिरवणुकीचा प्रारंभ होणार आहे. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सकाळी ११ वाजता निघणार असल्याने मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बहुतांशी नागरिक कुटुंबीयांसह मिरवणूक बघण्यासाठी येतात मात्र रात्री उशिरापर्यंत नागरिकांची संख्या कमी होते. सकाळी मिरवणूक निघणार असल्याने नागरिकांना विसर्जन मिरवणुकीचा अानंद घेता येईल. 

 

वाहतूक मार्गात बदल 
मिरवणुकीसाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. सकाळी १० वाजेपासून मिरवणूक मार्गावर वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. मिरवणुकीत साध्य वेशातील पोलिसांची गस्त राहणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. 

 

२१ मंडळांचा सहभाग 
विसर्जन मिरवणुकीत २१ मंडळांनी सहभाग घेतल्याची भद्रकाली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गतवर्षी १८ मंडळे सहभागी झाली होती. विशेष म्हणजे, या मंडळांनी पारंपरिक वाद्य वाजवणार असल्याचे हमीपत्र पोलिस यंत्रणेला लिहून दिले आहे. 

 

प्रदुषणमुक्त मिरवणुकीसाठी या अाहेत नाशिककरांच्या भावना 
पर्यावरण पुरक गणेशाेत्सवाचा 'श्रीगणेशा' ज्या नाशिकमध्ये झाला, तेथे कानठळ्या बसवत हृदयाची धडधड वाढवणारा प्रचंड आवाजाचा डीजे विसर्जन मिरवणुकीत धुमाकूळ घालताे. डीजेने कर्णबधीरत्व येऊ शकतेच; शिवाय हृदयविकाराचाही त्रास हाेताे. त्यामुळे ध्वनीप्रदूषण वाढविणाऱ्या डीजेला मिरवणुकीत निर्बंध घालण्याचा निर्णय याेग्यच अाहे. पाेलिसांनीही बाेटचेपी भूमिका न घेता कायदे न पाळणाऱ्यांवर कठाेर कारवाई करायलाच हवी. बेकायदेशीरपणे डीजे वाजविणाऱ्या मंडळांचे नियमाप्रमाणे साहित्य जप्त करावे. त्याचप्रमाणे संबंधित चमकाे नेत्यांवर गुन्हे दाखल करावे. गणेशाेत्सव महामंडळाने यंदा सार्वजनिक मंडळांची जबाबदारी घेतल्याने जर काेणी डीजे वाजविण्याचा प्रयत्न केला तर महामंडळाने मध्यस्थी करून ताे बंद करावा; अन्यथा महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनाही या गुन्ह्यास जबाबदार धरण्यात यावे. गणेश मंडळांनीही अाडमुठी भूमिका न घेता कायद्याच्या चाैकटीत राहून मिरवणुकीत सहभाग घ्यावा. डीजे बंदीमुळे मिरवणुकीतील हिडीस अाणि बीभत्स नृत्याचे प्रकारही बंद हाेतील. परिणामत:, नाशिककर पुन्हा एकदा सहकुटुंब मिरवणुकीचा अानंद घेऊ शकतील. 

 

 

बातम्या आणखी आहेत...