आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटी ही काही मुंढे, थविल यांची प्रायव्हेट कंपनी नाही, महापाैरांसह विराेधी पक्षांतील संचालकांकडून टीकेची झाेड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा ड्रीम प्राेजेक्ट असलेल्या स्मार्ट सिटी याेजनेतील कामे करताना सूचना तर साेडा मात्र, साधे लाेकार्पण करण्याची संधीही दिली जात नसल्यामुळे दुखावलेल्या गेलेल्या महापाैर रंजना भानसी यांनी प्राेजेक्ट गाेदा सादरीकरणाच्या निमित्ताने अायाेजित केलेल्या कार्यशाळेत स्मार्ट सिटी कंपनी ही आयुक्त तुकाराम मुंढे व सीईओ प्रकाश थविल या दाेघांची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. लाेकांना विश्वासात न घेता कामे करणाऱ्या या दाेन अधिकाऱ्यांवरच भविष्यात शहराचे वाटाेळे झाल्यास जबाबदारी राहील असाही इशारा दिला. केवळ भानसीच नव्हे तर विराेधी पक्षांतील संचालकांनीही स्मार्ट सिटीच्या नावाखाली नाशिकचा सत्यानाश करण्याची बाब खपवून घेतली जाणार नाही असे ठणकावत सर्वपक्षीय लाेकप्रतिनिधींची एकजूट दाखवून दिली. 

 

स्मार्ट सिटी याेजनेतून पूर्ण हाेणाऱ्या कामांपासून तर अभ्यास दाैऱ्यापर्यंत कशाचीही संचालक असलेल्या लाेकप्रतिनिधींना माहिती दिली जात नसल्याची खंत अनेक बैठकांतून व्यक्त झाली अाहे. कालिदास कलामंदिराचे लाेकार्पणाबराेबरच नेहरू उद्यानाच्याही उद‌््घाटनाचा कार्यक्रम प्रशासनाने घेतला नसल्यामुळे सत्ताधारी भाजप अस्वस्थ हाेता. निवडणुकांचा काळ असताना भाजपनेच केलेल्या कामांचे श्रेयही याच पक्षाला घेता येत नसल्याची खंत व्यक्त हाेत हाेती. या सर्व पार्श्वभूमीवर खदखदणाऱ्या असंताेषाला शनिवारी झालेल्या प्राेजेक्ट गाेदा सादरीकरणात ताेंड फुटले. काँग्रेस गटनेते शाहू खैरे यांनी लाेकांना नेमके काय चालले अाहे हे कळू नये यासाठीच घाईघाईत बैठक बाेलावल्याचा अाराेप केला. नाशिककर नागरिक सोशिक आहेत परंतु याचा गैरअर्थ काढू नका, पहिले शहर समजून घ्या, स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराचा सत्यानाश करू नका, अशी तंबी थविल यांच्याकडे बघत दिली. गुरुमित बग्गा यांनी स्मार्ट सिटीची कामे लपूनछपून करण्याची गरज काय असा सवाल केला. सभागृहनेते दिनकर पाटील यांनी तर शहराच्या नुकसानीस आयुक्त मुंढे, सीईओ थविलच जबाबदार राहतील असा अाराेप केला. संचालकांना डावलून परस्पर निर्णय घेणे, संचालकांची परवानगी न घेता नेहरू उद्यानाचे लोकार्पण करणे, महापौरांचा अवमान करणे हे सत्र सुरू असून शहर तुम्हाला अांदण दिले काय, असाही प्रश्न केला. या दाेन्ही अधिकाऱ्यांचा निषेध करून त्यांनी सभागृह साेडले. नेहरू उद्यानाच्या परस्पर लाेकार्पणावरून अॅड. वैशाली भोसले, वत्सला खैरे यांनी थविल यांना धारेवर धरले. 

 

ही कामे हाेणार स्मार्ट सिटीत 
स्मार्ट सिटीतील क्षेत्रीय विकासांतर्गत पंचवटी व जुने नाशिक भागात २४ तास पाणीपुरवठा, काँक्रीटचे रस्ते, पार्किंगची व्यवस्था, मलनि:सारण व्यवस्थेसह सुरळीत वाहतूक करण्यावर भर दिला जाणार आहे. गावठाणात २४ तास पाणीपुरवठा हाेणार असून ४४ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर पाणीगळती आणली जाणार आहे. ३१८ काेटी रुपयांच्या विकास योजनेत २५ किलोमीटरचे मोठे रस्ते, १२.६३ किलोमीटरच्या छोट्या रस्त्यांचा विकास केला जाणार आहे. ५८ किलोमीटरच्या पावसाळी गटार योजना, वाहतूक सुरळीत करणे, अपघातविरहित रस्ते तयार करणे, प्रदूषण कमी करणे, जलशुद्धीकरण क्षमतेत वाढ करण्याचे नियोजन आहे. नगरसेवक जगदीश पाटील यांनी पाणी साठवण क्षमता वाढविण्याबरोबरच स्थानिक नगरसेवकांना विचारात घेऊन योजना राबविण्याची मागणी केली. 

 

पुतळे किती माहीत नाही; हे कसले स्मार्ट अधिकारी 
सुमारे एक काेटी रुपये खर्चून तयार केलेल्या नेहरू उद्यानात सांगा किती व काेणाचे पुतळे अाहे असा प्रश्न सीईओ प्रकाश थविल यांना विचारल्यानंतर त्यांना नावे सांगता अाली नाही. ते बघून हे बघा कसे स्मार्ट सिटीचे अधिकारी असा सवाल त्यांनी केला. चार लोक म्हणजे स्मार्ट सिटी नव्हे असा टोला लगावताना उदघाटन पालकमंत्री व आमदारांच्या हस्ते करण्याच्या सूचना दिल्या असताना मनमानी करतात, काेणाचीही मनमानी, हिटलरशाही चालू देणार नाही, १२७ नगरसेवक माझ्याबराेबरच, असाही सज्जड दम दिला. 

 

९० अासनक्षमतेच्या सभागृहात कार्यक्रम 
स्मार्ट सिटी याेजनेतील ५०० काेटी रुपयांच्या प्राेजेक्ट गाेदासह गावठाणाशी संबंधित कामांचे सादरीकरणासाठी अायाेजित कार्यक्रम पंचवटीतील पलुस्कर या ९० अासनक्षमतेच्या छाेटेखानी सभागृहात घेतला गेला. त्यामुळे संचालक अाश्चर्यचकित झाले. बाेटावर माेजण्याइतक्या लाेकांपुढे सादरीकरण का असाही सवाल केला. येथे अधिकाऱ्यांची संख्या माेठी व नागरिकांची संख्या कमी हाेती. त्यातही अनेक खुर्च्या खाली असल्याने स्मार्ट दडवादडवी कशासाठी? असेही प्रश्न केले. 

बातम्या आणखी आहेत...