आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महासभेत रस्त्यांवरून गरमागरमी, महापौर आता आयुक्तांसोबत आपल्या दारी; मुंढेंचेही चाेख प्रत्युत्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- काही प्रभागांमधील रस्त्याच्या कामांवर फुली मारल्यामुळे संतप्त झालेल्या सत्ताधारी व विरोधी पक्षांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर केलेला हल्लाबोल, निधीची कमतरता आणि 'गरज-तांत्रिक व्यवहार्यता-तरतूद' या निकषांच्या आधारे शहराच्या समतोल विकासासाठी केलेल्या नियोजनाबाबत मुंढे यांनी दिलेले जशास तसे उत्तर या पार्श्वभूमीवर महासभेत बुधवारी (दि. १९) तब्बल पाच तास जोरदार गरमागरमी झाली. नंतर महापौर रंजना भानसी यांनी रणरागिणीचा अवतार धारण करत यापुढे प्रत्येक प्रभागात आयुक्तांसह दाैरा करून स्पिल ओवर अर्थात दायित्वाचा विचार न करता गरज आहे तेथे रस्त्यांची कामे करणारच, असे प्रशासनाला ठणकावून सांगितले. ना सोबत घेऊन वीस वर्षात आपण अनेक अंदाजपत्रके बघितली. 


महासभा सुरू झाल्यानंतर अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये १९ कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरीचा विषय चांगलाच तापला. प्रवीण तिदमे यांनी चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण झाल्यामुळे खरोखरच गरज आहे अशा भागातील रस्त्यांची कामे होणारच नसल्याकडे लक्ष वेधले. मुशीर सय्यद यांनी आपल्या घरापासून ते द्वारकापर्यंतच्या रस्त्यावर चक्कर मारल्यास किती खड्डे पडले याची प्रचिती येईल असे सांगत ही कामे प्राधान्याची नाही का, असा सवाल केला. माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी मागील आयुक्तांनी मंजूर केलेल्या मखमलाबाद येथील स्वामीनारायण नगरमधील रस्त्याचे काम रद्द कसे झाले, असे विचारले. सत्ताधारी भाजप, शिवसेनेमधील नगरसेवकांनी रस्त्यांची कामे चुकीच्या पद्धतीने होत असल्याच्या मुद्द्यावर हल्लाबोल केला. अधिकाऱ्यांकडून आयुक्तांची दिशाभूल होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी नगरसेवक आपल्या घरची कामे सुचवतात का, कामांना कात्री का लावली जाते, आयुक्त प्रत्यक्ष पाहणी का करत नाहीत, असे प्रश्न उपस्थित केले. प्रतिभा पवार यांनी प्रशासनाचे उपरोधिक अभिनंदन करताना गणेशोत्सव, नवरात्राच्या पार्श्वभूमीवर मंडळांसाठी मोठ्या प्रमाणात मुरूम उपलब्ध करून दिल्याची खाेचक टीका केली. भाजप नगरसेवक कमलेश बोडके यांनी प्रभाग पाचमध्ये एकही रस्त्याचे काम गृहित धरले नसल्याची खंत व्यक्त केली. शाहू खैरे यांनी नाईकवाडीपुरा भागांमध्ये आपल्याला खिशातून रस्त्याचे काम करावे लागत असल्याची खंत व्यक्त केली. 


सभागृह नेते दिनकर पाटील यांनी पाच टर्म निवडून आलेले ज्येष्ठ नगरसेवक योग्य तेच बोलत आहेत, असे समर्थन करत आयुक्तांच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कायद्यातील तरतुदीनुसार देय असलेला नगरसेवकांचा १२ लाख रुपयांचा स्वेच्छा निधी का दिला जात नाही, असा प्रश्न त्यांनी केला. दिनकर आढाव यांनी उपस्थित केलेल्या महासभेच्या अधिकाराच्या प्रश्नाला हात घालत प्रशासनाकडून सोयीनुसार निर्णयाची अंमलबजावणी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला. सरतेशेवटी महापौर भानसी यांनी सभागृहातील सदस्यांच्या भावनांची दखल घेत म्हणाल्या, 'नगरसेवकांच्या १२ लाख रुपयांच्या स्वेच्छा निधीमधील कामे तातडीने मार्गी लावावी, त्यासाठी नगरसेवकांनी आपल्या फायली त्वरित मंजुरीसाठी पाठवाव्या. २० वर्षांपासून सभागृह बघत असून १२-१२ वर्षे खडीकरण-डांबरीकरण-अस्तरीकरण न झालेल्या रस्त्यांची प्रकरणे अधिकाऱ्यांनी तातडीने पुढच्या महासभेपर्यंत सादर करावी. दायित्व वाढले तर ते कसे कमी करता येईल हे बघू; मात्र प्रस्ताव प्रशासनाने सादरच केले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही विशिष्ट भागातच विकास झाला पाहिजे असे सांगितले नसून सर्वंकष विकासासाठी ते कटिबद्ध आहेत'. दौऱ्याची सुरुवात नाशिकरोड विभागापासून होईल, असे सांगताना त्यांनी नगरसेविका शांता हिरे यांच्या मागणीनुसार आयुक्तांनाही सोबत घेऊन दौरे केले जातील, असे जाहीर केले. सदस्यांची दूरध्वनीवरील कामे बैठकीच्या कारणास्तव नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. यापुढे बेजबाबदार वर्तन केल्यास महासभेत गाठ असेल, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. 


नाशिकरोडला ठेंगा; सर्वपक्षीय अाक्रमक 
भाजप गटनेते संभाजी मोरूस्कर यांनी नाशिकरोड विभागामध्ये साधा खडीकरणाचाही रस्ता धरल्यामुळे आवाज उठवल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी उभे राहून एकच विरोध सुरू केला. नाशिकरोड प्रभाग सभापती पंडित आवारे यांनी गुंठेवारीमधील नागरिकांची कामे महापालिका करत नसल्याचे टीका करत, 'तुम्हाला कर घेण्याचा अधिकार आहे का', असा प्रश्न केला. सरोज आहिरे यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर रस्त्यांची अवस्था लक्षात येईल असा टोला लगावला. 


'मला टार्गेट करून शहराचा विकास होणार नाही' 
रस्त्याच्या कामांवरून झालेल्या दुजाभावाबाबत मुंढे यांनीही आपल्या शैलीत प्रत्यूत्तर दिले. ते म्हणाले की, गरज-तांत्रिक व्यवहार्यता-तरतूद' या निकषाच्या आधारावरच कामे सुरू असून एकही नियमबाह्य काम केलेले नाही. महासभेवर मंजुरीसाठी आलेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये पावसाळी गटार व अन्य कामांचा अंतर्भाव केल्यामुळे त्याला सुधारित मान्यता घेणे आवश्यक अाहे. शहराच्या समतोल विकासासाठी प्रयत्नशील असून, यापूर्वी कोणतेही काम न झालेल्या भागाला प्राधान्य दिले अाहे. त्यातही अशा भागात ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकवस्ती असल्यासच कामे सुचवली आहेत. एकीकडे कामांसाठी मागणी करायची व दुसरीकडे करवाढीसारख्या उत्पन्नवाढीच्या स्त्रोतांनाही विरोध करायचा अशी दुटप्पी भूमिका घेऊन चालणार नाही, असे त्यांनी सुनावले. काँग्रेस गटनेते शाहू खैरे यांना स्मार्ट सिटीचे संचालक म्हणून स्मार्ट सिटीमधून ३२२ कोटी रुपयांचे रस्ते गावठाणात होणार असताना व त्याबाबत आपणास माहिती असतानाही प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नसल्याचा टोला लगावला. आजघडीला भुयारी गटार, पाणीपुरवठ्याची कामे महत्त्वाची असून त्यानंतर रस्त्यांना प्राधान्यक्रम आहे. याचा अर्थ रस्त्यांच्या कामांना विरोध आहे वा अशी कामे करूच नये, अशी माझी भूमिका नाही. अशा कामांसाठी निधीचा मोठा स्त्रोत उपलब्ध होणे गरजेचे असून त्याबाबत सदस्य का प्रश्न विचारत नाहीत, का विचार करत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. अविश्वास दाखवण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला असून मी विश्वासाने काम करीत आहे. समतोल विकास करणे हेच माझे कर्तव्य समजतो असेही त्यांनी ठामपणे सांगितले. 


मुंढेेंवर दादागिरीचा आरोप; सभागृहात घोषणाबाजी 
स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी अायुक्त सद्सद‌्विवेक बुद्धीला धरून कामे करीत नसल्याचा गंभीर आरोप सुरुवातीला केला. सदस्य पोटतिडकीने भावना मांडत असताना हसणे बरे नाही, असाही टोला त्यांनी लगावला. आयुक्त मुंडे यांनी गांगुर्डे यांचा आक्षेप नेहमीच्या शैलीत खोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर सर्वपक्षीय सदस्य भडकले. मुंढे यांनी शंभर टक्के सद्सदविवेकबुद्धीला धरून काम करीत असल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर संतोष साळवे यांनी 'आम्ही काही खोटे बोलतो आहोत का', असा प्रतिप्रश्न केला. त्यावर मुंढे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केल्यानंतर दिलीप दातीर यांनी 'महापौरांची परवानगी घेऊन बोला, प्रत्येक प्रश्नावर सदस्यांना क्रॉस करण्याची गरज नाही,' असे म्हणाल्यानंतर शिवसेनेच्या सदस्यांनी 'नहीं चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी' अशी घोषणाबाजी केली. 


आयुक्त व लोकप्रतिनिधींमध्ये संवादाचा अभाव : बाेरस्ते 
विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते म्हणाले, रस्त्यांच्या कामासाठी अक्षरशः भीक मागावी लागत असल्याची वेळ येत अाहे. आयुक्त व लोकप्रतिनिधींमध्ये संवादाचा अभाव असून आयुक्तांनी त्या दृष्टीने लक्ष दिले पाहिजे. सर्वच कामे अधिकारी करणार असतील तर मग आम्ही राजीनामे देतो. महापौर रंजना भानसी यांच्या पाठीमागे उभे राहत त्यांनी स्व. उत्तमराव ढिकले यांच्याप्रमाणे प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन खऱ्या अर्थाने कामाची निकड लक्षात आणून देण्याची गरज असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

बातम्या आणखी आहेत...