आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहूरगडावर रेणुकामातेचा, तर तुळजाईनगरीत तुळजाभवानीचा जयजयकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर / नांदेड- तुळजाईनगरातील आई तुळजाभवानीचा शारदीय नवरात्रोत्सव आणि माहूरगडावरील माता रेणुकादेवीच्या नवरात्रोत्सवाला बुधवारी आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर विधिवत घटस्थापनेने प्रारंभ झाला. मराठवाड्यातील देवीची ही दोन्ही पूर्णपीठे भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली आहेत. तुळजाभवानी संस्थानात बुधवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी सपत्नीक सिंह गाभाऱ्यात घटस्थापना केली तर माहूरला श्री रेणुकादेवी संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुभाष खरात यांचे हस्ते १० वाजता घट स्थापना करण्यात आली. 


माहूरगडावर न्या. खरात यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून सकाळी ७ वाजता महापूजा करण्यात आली. ८-३० वाजता कुमारिका पूजन, चतुर्वेद पारायण व नवचंडी पाठास सुरुवात झाली,९ वाजता महाअलंकार पूजेनंतर मातेला महानैवेद्य अर्पण करून आरती करण्यात आली व छबिना काढण्यात आला. मातेला आज पिवळ्या रंगाचे महावस्त्र चढवण्यात आले. घटस्थापनेच्या विधीचे पौरोहित्य विनायक फांदाडे, चंद्रकांत रिठे,चंद्रकांत भोपी, आशिष जोशी, अशोक काण्णव, मंगेश रिठे व मिलिंद काण्णव यांनी केले. कुमारिका पूजन व चतुर्वेद पारायणाचा विधी वेद पाठशाळेचे गुरुजी वे.शा.सं. नीलेश केदार यांनी पार पाडला. देशाच्या विविध भागातून येणाऱ्या लाखो भाविकांना मातेचे सुलभ दर्शन घडावे यासाठी दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली. संस्थानच्या वतीने मंदिर परिसरात पिण्याचे शुद्ध पाणी, अद्ययावत सुरक्षा व्यवस्था, २४ तास आरोग्य सेवा व रुग्णवाहिका, अपंग भाविकांसाठी वेगळी दर्शन व्यवस्था व महाप्रसाद आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. अध्यक्ष न्यायमूर्ती सुभाष खरात यांचे हस्ते दसऱ्यापर्यंत सुरू राहणाऱ्या महाप्रसादालयाचाही प्रारंभ करण्यात आला. 


पहाटे ५ ते रात्री १० पर्यंत रेणुकामातेचे दर्शन
नवरात्रोत्सवात रेणुका माता मंदिर पहाटे ५ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच भाविकांची गर्दी अधिक असल्यास वेळेत बदल करण्याचे अधिकार संस्थानकडे आरक्षित असल्याचे संस्थानाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 


तुळजापुरात सुविधांची ध्वनिक्षेपकांवर माहिती
भाविकांना लॉकर रूम कुठे आहेत, स्नानाची सोय कुठे आहे, स्वच्छतागृह कोणत्या दिशेला आहेत, या सगळ्या व्यवस्थेची माहिती मिळू लागली आहे. तुळजापुरात ५ वर्षापूर्वी नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला महाद्वारासमोर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. त्यामुळे मंदिर प्रशासनाने दर्शन रांगेत बदल करत तात्पुरता दर्शन मंडप उभारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी न होता सुलभ दर्शन मिळत आहे. 


तुळजाई नगरीत भक्तांची मांदियाळी 
आई राजा उदो उदो च्या गजरात सनई चौघड्यांचा सुमधूर निनादात दुपारी १२ वाजता घटस्थापनेने कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. तत्पूर्वी पहाटे तुळजाभवानी मातेची सिहांसनावर प्रतिष्ठापना करण्यात आली तर रात्री उशिरा तुळजाभवानी मातेची छबिना मिरवणूक काढण्यात आली. दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी सपत्नीक सिंह गाभाऱ्यात घटस्थापना केली. घटस्थापनेनंतर खंडोबा मंदिर, येमाई त्रिशूल, टोळ भैरव, आदीमाया आदी शक्ती मंदिर या उपदेवतांचा मंदिरात घटस्थापना करण्यात आली. तत्पूर्वी गोमुख तीर्था समोरून घटकलश वाजतगाजत निंबाळकर दरवाजातून मंदिरात आणण्यात आला. यावेळी महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा आदींची उपस्थिती होती. 

बातम्या आणखी आहेत...