गडकरी खुलाशांचे पूल / गडकरी खुलाशांचे पूल बांधण्यात व्यग्र; म्हणाले, पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मी नाही, ‘मोदीच माझे नेते!’

माझ्या वक्तव्यांची मोडतोड करून त्यातून सोईस्कर अर्थ काढण्याचा प्रयत्न होत आहे.- गडकरी

Dec 24,2018 08:07:00 AM IST

पुणे- मनात येईल ते बिनधास्त बोलणारे भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या दोन दिवसांपासून खुलाशांचे ‘पूल’ बांधण्यात व्यग्र आहेत. ‘भाजपचे वरिष्ठ नेतृत्व व माझ्यात दरी निर्माण करू पाहण्याचा कट यशस्वी होणार नाही. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मी नाही. मोदीच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील,’ असे स्पष्टीकरण त्यांनी रविवारी दिले.


‘गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमधले काही घटक व विरोधी पक्षांमधले काही लोक माझी आणि पक्षाची प्रतिमा मलिन करण्याच्या प्रयत्नात आहेत. माझ्या वक्तव्यांची मोडतोड करून त्यातून सोईस्कर अर्थ काढण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु भाजपचे नेतृत्व आणि माझ्यात दरी निर्माण करण्याच त्यांचा प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाही,’ हा खुलासा करणाऱ्या संदेशांची माळच गडकरींनी ट्विटर अकाउंटवर लावली. एवढे करून ते थांबले नाहीत. तर रविवारी पुण्यात खास पत्रकार परिषद घेऊनही यासंदर्भात त्यांनी खुलासा केला.

X