वंचित बहुजन अाघाडी / वंचित बहुजन अाघाडी काेणाची मते खाणार, अाेवेसींनी प्रश्न विचारत प्रतिप्रश्नही केला!

दोन आठवड्यांपूर्वी एमआयएम-भारिप बहुजन महासंघ एकत्र येणार असल्याची घोषणा झाली. त्यानंतर लगेच हे दोन पक्ष कोणत्या पक्षाला धक्का देणार, अशी चर्चा सुरू झाली. मंगळवारी (२ ऑक्टोबर) जबिंदा लॉन्सवर झालेल्या एमआयएम-भारिप बहुजनच्या वंचित आघाडी जाहीर सभेत बॅ. असदुद्दीन ओवेसी यांनीही हाच मुद्दा उपस्थित केला. उद्यापासून आम्ही मते खाण्यासाठीच एकत्र आल्याची चर्चा सुरू होईल, असे ते म्हणाले आणि लगेच त्याचा प्रतिवाद करत त्यांनी सांगितले की, ही आघाडी मते खाण्यासाठी नव्हे, तर मते मिळवण्यासाठी आहे.

प्रतिनिधी

Oct 03,2018 09:15:00 AM IST

औरंगाबाद- दोन आठवड्यांपूर्वी एमआयएम-भारिप बहुजन महासंघ एकत्र येणार असल्याची घोषणा झाली. त्यानंतर लगेच हे दोन पक्ष कोणत्या पक्षाला धक्का देणार, अशी चर्चा सुरू झाली. मंगळवारी (२ ऑक्टोबर) जबिंदा लॉन्सवर झालेल्या एमआयएम-भारिप बहुजनच्या वंचित आघाडी जाहीर सभेत बॅ. असदुद्दीन ओवेसी यांनीही हाच मुद्दा उपस्थित केला. उद्यापासून आम्ही मते खाण्यासाठीच एकत्र आल्याची चर्चा सुरू होईल, असे ते म्हणाले आणि लगेच त्याचा प्रतिवाद करत त्यांनी सांगितले की, ही आघाडी मते खाण्यासाठी नव्हे, तर मते मिळवण्यासाठी आहे. आतापर्यंत आम्ही तुम्हाला (काँग्रेस आणि अन्य धर्मनिरपेक्ष पक्ष) मतदान केले. तुम्ही आम्हाला काय दिले, असा प्रश्नही उपस्थित केला. येत्या लोकसभेत आमच्या आघाडीचे किमान ५ खासदार निवडून येतील, असा दावा त्यांनी केला.


बाबासाहेबांचे ऋण फेडण्यासाठी अॅड. आंबेडकरांना पाठिंबा
एमआयएमने महाराष्ट्रात भारिप बहुजन महासंघाला का सोबत घेतले, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे, असे सांगत ओवेसी म्हणाले की, मुस्लिम समाजावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋण आहे. ते ऋण आपण फेडले पाहिजे. अॅड. प्रकाश आंबेडकर वंचितांसाठी राजकारण करतात. त्यामुळे त्यांना संसदेत पाठवून डॉ. बाबासाहेबांचे ऋण फेडायचे आहे. वंचित बहुजन अाघाडी काेणाची मते खाणार, अाेवेसींनी प्रश्न विचारत प्रतिप्रश्नही केला!


अल्पसंख्याक समाजासाठी स्वतंत्र विभाग असावा, अशी सूचना डॉ. आंबेडकरांनी १९४६ मध्ये केली होती. त्यावर २००५ मध्ये अंमलबजावणी झाली. म्हणजे भविष्यात अल्पसंख्याक विभागाची गरज काय असेल, हे आंबेडकरांनी ६० वर्षांपूर्वी ओळखले होते, यावरून त्यांची दूरदृष्टी दिसून येते, असे ओवेसी म्हणाले.


कोणी पराभव केला
आज काँग्रेसवाले आपल्या कार्यालयात डॉ. बाबासाहेबांचा फोटो लावतात. परंतु इतिहासात बघितले तर डॉ. बाबासाहेबांचा पराभव कोणी केला हे बघितले पाहिजे. बाबासाहेबांना संसदेत पाठवण्यासाठी बंगालचा मुस्लिम समाज पुढे आला होता. तेव्हा अॅड. आंबेडकरांना संसदेत पाठवण्यासाठी आपण पुढे आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.


संविधान नव्हे, भतीजा बचाव
राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव न घेता महाराष्ट्रात एका पक्षाने संविधान बचाव अभियान हाती घेतल्याचे सांगत या पक्षाचे हे संविधान बचाव अभियान नसून 'भतीजा बचाव' अभियान असल्याचे ओवेसी म्हणाले, जे स्वत: संविधानापासून दूर राहिले ते संविधानाला काय वाचवणार, असा सवाल त्यांनी केला.


हमीभावाबाबतची भूमिका राज्य शासनाने ८ दिवसांत स्पष्ट करावी
औरंगाबाद - एमआयएम-बीबीएम (भारिप बहुजन महासंघ) यांच्यासह विविध १६ संघटनांनी मिळून गठीत झालेली 'वंचित बहुजन आघाडी' येत्या काही दिवसांतच रस्त्यावर उतरणार असल्याचे पहिल्याच सभेत या आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. हमीभावाबाबतची भूमिका राज्य शासनाने ८ दिवसांत स्पष्ट करावी, अन्यथा आमची ताकद दाखवू, असे त्यांनी स्पष्ट केले.


अॅड. आंबेडकर म्हणाले, शेतकऱ्यांना कितीही दिले तरी ते रडतातच, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नुकतेच केले. आंबेडकर म्हणाले, दानवे हे अमेरिकेत किती वेळा गेले हे त्यांनी सांगावे. अमेरिकेत शेतकऱ्यांना १०० टक्के सबसिडी मिळते. इकडे तुम्ही थोडेफार देता, तर उपकाराची भाषा वापरता. शेतकऱ्याला तुम्ही जे देताय ते तुमच्या खिशातील नाही, याची जाणीव त्यांना असावी. आम्ही तुमचे सालगडी नाहीत. तेव्हा पुढील निवडणुकीत तुमची जागा दाखवून देऊ, वेळप्रसंगी तुरुंगातही पाठवू, असा इशारा आंबेडकर यांनी दिला.


निवडणूक प्रक्रिया बदलणाऱ्यांना बदलावे लागेल
ओबीसी जास्त निवडून येऊ नयेत, याची व्यवस्था सरकारकडून करण्यात येत आहे. शहरी भागांत वॉर्डनिहाय होणारी निवडणूक ते प्रभागनिहाय करताहेत. त्यामुळे ओबीसी निवडणूक प्रक्रियेपासून दूर जात आहेत. त्यामुळे आता ज्यांनी बदलाची प्रक्रिया हाती घेतली आहे, त्यांनाच बदलण्याची ही वेळ आली आहे. पूर्वी एक तर ओबीसीला राजकीय आरक्षण नव्हते. परंतु १९९० मध्ये तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोग लागू केला तेव्हा ते मिळू लागले. आता पुन्हा ते हिरावून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे वेळीच त्यांना रोखण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.


शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लवकरच परिषद
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी लवकरच स्वतंत्र परिषद या आघाडीच्या वतीने बोलावण्यात येणार असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. ही परिषद औरंगाबादेतच होईल, असेही त्यांनी सांगितले.


बाबासाहेबांना मानणारे असाल तर...
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आर. आर. पाटील, काँग्रेसचे पतंगराव कदम यांच्या निधनानंतर सर्व पक्षांनी एकत्र येऊन पोटनिवडणुकीत उमेदवार दिले नाहीत. तसे अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत का होऊ शकत नाही, असा सवाल करतानाच येत्या लोकसभा निवडणुकीत सर्व पक्षांनी आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार न देण्याचे आवाहन आमदार इम्तियाज जलील यांनी केले.


नेते लाल गुलाबांची फुले घेऊन हजर
आपण एकत्र येत असल्याचे समजताच काही पक्षांच्या पोटात गोळा उठल्याचा उल्लेख इम्तियाज यांनी केला. ते म्हणाले, एमआयएमसोबत आंबेडकर जाणार असल्याचे समजताच काही पक्षांचे नेते दुसऱ्याच दिवशी त्यांच्या घरी लाल गुलाबांची फुले घेऊन हजर झाले अन् म्हणाले, तुम्ही तिकडे का जाता, आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मागेल ते देऊ. आता देताहेत, तेव्हा आधी का दिले नाही, असा सवाल इम्तियाज यांनी केला. लाल गुलाब हे 'आय लव्ह यू' म्हणत देत असतात. त्या पक्षांचाही तोच प्रयत्न होता, असे इम्तियाज म्हणाले.


'वंचित बहुजन आघाडी' म्हणजे १६ संघटनांची मोट
एमआयएम आणि बीबीएम (भारिप बहुजन महासंघ) हे दोन पक्ष एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्यात आली. हे दोन पक्ष मिळून काय करतील, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. प्रत्यक्षात जेव्हा यांची पहिली जाहीर सभा झाली तेव्हा त्यात फक्त हे दोनच पक्ष नव्हे, तर तब्बल १६ समाजांच्या संघटना यानिमित्ताने एकत्र आल्याचे दिसून आले. वंचित बहुजन आघाडी ही विविध संघटनांची मोट असणार हे स्पष्ट झाले. अठरापगड जातींचा या आघाडीत समावेश असल्याने ही आघाडी राजकीय दणका सक्षमपणे देऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. विश्वकर्मा सुतार समाज, साळी समाज संघटना, एसबीसी संघर्ष समिती, राष्ट्रीय बंजारा परिषद, मराठवाडा वारकरी परिषद, कोळी समाज संघटना, लाल सेना, वडार फोरम, कुणबी समाज, जय मल्हार संघटना, महात्मा बसवेश्वर सेवा मंच, मातंग समाज यांच्यासह एकूण १६ संघटना या आघाडीत आहेत. या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी सभेला संबोधित करत आम्ही सर्व जण अॅड. आंबेडकरांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.


मॉब लिंचिंग होणार नाही याची आघाडीने खबरदारी घ्यावी
एखादा मांस घेऊन घराकडे जात असतो, तर त्याच्याकडे गोमांस असल्याचे सांगून त्याच्यावर हल्ले केले जातात. अशी बेकायदेशीर कृत्ये अलीकडे वाढली आहेत. मात्र, आघाडीने अशा कायदा हातात घेणाऱ्यांना रोखले पाहिजे. त्यासाठी सजग राहिले पाहिजे, असे सल्ला आंबेडकरांनी दिला.

X
COMMENT