आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त ‘म्होरक्या’ चित्रपटाचा निर्माता कल्याण पडाल यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा अट्टल गुन्हेगार श्रीनिवास संगा आणि त्याचे साथीदार अद्याप पोलिसांना सापडत नाहीत. तीन महिने झाले तरी पोलिस तपासात स्वारस्य दाखवत नाहीत. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी पडाल कुटुंबीयांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यात खासगी सावकारविरोधी कृती समितीचे पदाधिकारीही सहभागी झाले होते.
पडाल यांनी संगा आणि संतोष बसुदे यांच्याकडून कर्जाऊ पैसे घेतले होते. त्याच्या परतफेडीसाठी या दोघांनी तगादा लावला. घरातून उचलून नेऊन दमदाटी करणे, शिवीगाळ करणे आणि मारझोड करण्याचे प्रकार घडले. त्याला कंटाळून पडाल यांनी १७ मे २०१८ रोजी घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. त्याच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १५ मे रोजी पोलिस आयुक्तांना एक तक्रार अर्ज दिला होता. त्यात या दोघांची नावे घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली, अन्यथा अात्महत्या करणार असल्याचे सांगितले होते.
या अर्जाची पोलिसांनी दखलच घेतली नाही. परिणामी पडाल यांनी आत्महत्या केली. या प्रकाराला तीन महिने पूर्ण होऊनही पोलिसांच्या रेकॉर्डवरचा संगा अद्याप पोलिसांच्या हाती लागत नाही. याबाबत पडाल कुटुंबीयांनी पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांची भेट घेतली. त्यांना कारवाईचे आश्वासनही मिळाले. परंतु अद्याप कारवाई होत नसल्याने पोलिस तपासावरच प्रश्नचिन्ह उभे करत तपास सीबीआयकडे देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पाेलिस गंभीर नाहीत
कुख्यात गुन्हेगार श्रीनिवास संगावर अनेक गुन्हे नोंद आहेत. त्याला स्थानबद्ध करून येरवड्यात रवानगी केली होती. त्यानंतरही तो बाहेर पडला. खासगी सावकारी करून सामान्यांकडून खंडणी उकळू लागला. त्याने अनेक निष्पाप जीव गेले. त्याचा वेळीच बंदोबस्त झाला असता तर कल्याण कदाचित वाचला असता. परंतु त्यांचा बळी गेल्यानंतरही पोलिस गंभीर नाहीत. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली.
- निरंजन बोद्धूल, खासगी सावकारविरोधी कृती समिती
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.