आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी : मेडिकल कॉलेजसाठी लागणार 432 कोटींचा निधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - परभणी येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाबाबत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांनी शासनाकडे सकारात्मक अहवाल पाठवला आहे. आगामी पाच वर्षात २०२२-२३ पर्यंत अंदाजे ४३२ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. यासाठी एक हजार ५८२ पदांची निर्मिती करावी लागणार आहे. या खर्चात बांधकामे, मनुष्यबळ, यंत्रसामग्री व देखभाल दुरुस्तीचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. २०१८-१९ या चालू आर्थिक वर्षापासून टप्पाटप्प्याने हा खर्च समितीने प्रस्तावित केला आहे. त्यानुसार चालू आर्थिक वर्षासाठी या सर्व बाबींवर ६८ कोटी पाच लाख रुपये लागणार आहेत. 


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसाठी गठीत करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांना सादर केलेल्या अहवालात येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊ शकते, असा सकारात्मक अहवाल देतानाच या महाविद्यालयासाठी लागणारा आगामी पाच वर्षाचा खर्चही प्रस्तावित करण्यात आला आहे. महसूल विभागाकडून उपलब्ध असलेल्या जमिनी हस्तांतरित केल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणारा इमारतीची बांधकामे, पदाची निर्मिती यासह लागणारी यंत्र सामग्री व त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च प्रस्तावित केला आहे. समितीने प्रस्तावित केलेला अंदाजित खर्च हा भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या दि.३० मार्च १९९९ च्या मानाकांप्रमणे निश्चित केलेला आहे. 

 

टप्प्याटप्प्याने लागणारा खर्च 
२०१८-१९ : ६८ कोटी ५ लाख 
२०१९-२० : १०३ कोटी ६१ लाख 
२०२०-२१ : १०० कोटी ७७ लाख 
२०२१-२२ : ९५ कोटी ९२ लाख 
२०२२-२३ : ६४ कोटी ३ लाख 

एकूणः- ४३२ कोटी ३८ लाख

 

पदनिर्मितीसाठी लागणार १५३ कोटी 
वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेली पदे व त्यावरील अंदाजित खर्च हा ७३ कोटी १८ लाख रुपये प्रस्तावित करण्यात आला आहे. यासाठी ५१० पदांची निर्मिती करावी लागणार आहे. वर्ग एकची ४५, वर्ग दोनची ५०, वर्ग तीनची २३६ तर कंत्राटी पद्धतीने वर्ग चारची ६१ पदे निर्माण करावी लागणार आहे. यातच विद्या वेतनासाठी ११८ प्रशिक्षणार्थींवर १४ कोटी ३२ लाख रुपये लागणार आहेत. 

 

बांधकामासाठी १३७ कोटी 
महाविद्यालयाची प्रशासकीय इमारत, रुग्णालय, मुख्य ग्रंथालय, अचिकित्सालयीन विभाग व चिकित्सालयीन विभाग, रुग्णालयीन इमारत, व्याख्यान कक्ष, परीक्षागृह, कर्मचारी निवासस्थान, अधिष्ठाता निवास व वसतिगृह अशा इमारती उभाराव्या लागणार आहेत. ५९ हजार ५७० चौरस मीटरवर ही बांधकामे प्रस्तावित असून त्यासाठी १३७ कोटी एक लाख रु. लागतील 

 

यंत्र सामग्रीसाठी ९० कोटी 
वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी यंत्र सामग्री व उपकरणासाठी २०१८-१९ या आर्थिक वर्षापासून २०२२-२३ या पाच वर्षाच्या कालावधीसाठी यंत्र सामग्री उपकरणावर ९० कोटी रुपये लागतील. देखभालीसाठी ९ कोटी रुपये, आवर्ती खर्चासाठी ३१ कोटी तर बाह्यस्रोत खर्चासाठी १२ कोटी ३५ लाख रुपये खर्च लागणार आहे. 

 

१०७२ पदे निर्मिती 
महाविद्यालय बरोबरच रुग्णालयासाठी लागणाऱ्या आवश्यक पदांची निर्मिती करावी लागणार आहे. १०७२ पदांसाठी ७९ कोटी ८१ लाख रुपये लागतील. यात वर्ग एकची दोन, वर्ग दोनची सहा, वर्ग तीनची ५९० तर कंत्राटी पद्धतीने वर्ग ४ ची ४७४ पदे भरावी लागतील. 

बातम्या आणखी आहेत...