आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील 5 केंद्रांतून 7 महिन्यांत 32 हजार जणांना मिळाले पासपोर्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -  एप्रिल २०१७ ते १५ ऑक्टोबर २०१८ या सात महिन्यांत मराठवाड्यातील पाच पासपोर्ट केंद्रांतून ३२ हजार नागरिकांना पासपोर्ट मिळाले आहेत. औरंगाबादेतील केंद्रातून या काळात १३ हजार पासपोर्ट देण्यात आले आहेत. उर्वरित चार केंद्रांतून १९ हजार पासपोर्ट देण्यात आले. 

 

मराठवाड्यात सर्वप्रथम छावणी डाक कार्यालयात स्वतंत्र पोस्ट पासपोर्ट केंद्र उघडले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जालना, बीड, नांदेड आणि जळगाव येथे केंद्र सुरू करण्यात आले होते. मार्च २०१७ पूर्वी पासपोर्ट मिळवणे म्हणजे तारेवरची कसरत होती. त्यासाठी मुंबईतील कार्यालयात चकरा माराव्या लागत. एवढे करूनही काही ना काही त्रुटी राहत असल्याने वेळेत पासपोर्ट मिळायचा नाही. 

 

याबाबत विविध संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर परराष्ट्र मंत्रालय, पासपोर्ट विभागाच्या समन्वयातून महाराष्ट्रात २८ मार्च २०१७ पासून स्वतंत्र पोस्ट पासपोर्ट केंद्र उघडण्यास सुरुवात झाली. मराठवाड्यात एकूण पाच पोस्ट पासपोर्ट केंद्रे कार्यान्वित झाली. 

 

नवीन केंद्रांमुळे हे झाले फायदे 
वर्षभरापूर्वी नागरिकांना पासपोर्टसाठी मुंबई येथे जावे लागत होते. त्यात वेळ आणि पैशांचाही अपव्यय होत असे. मात्र आता जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र पासपोर्ट सेवा सुरू झाल्याने औरंगाबाद, मुंबईला जाण्याची गरज उरली नाही. दलालांच्या मक्तेदारीला चाप बसला आहे. उद्योग-व्यवसायाला चालना मिळण्यास मदत झाली असून विद्यार्थ्यांना, संशोधक, अभ्यासकांना विदेशात शिक्षण, पर्यटनासाठी जाणे सोपे झाले आहे. यातून पर्यटनालाही चालना मिळत आहे. 

 

पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य 
पासपोर्टसाठी passportindia.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरणे अनिवार्य आहे. त्याची एक प्रत काढून घ्यावी. अर्ज भरल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी तारीख दिली जाते. त्या दिवशी ऑनलाइन अर्ज भरल्याची प्रत संबंधित पोस्ट पासपोर्ट कार्यालयात आणावी. तिथे अर्जदाराचे फोटो, बायोमेट्रिक, बोटांचे ठसे तपासणी होईल. चारित्र्य आदी कागदपत्रे तपासणीनंतर घरपोच पासपोर्ट मिळेल. 

 

प्रादेशिक विभागात आणखी ६ केंद्रे सुरू होणार 
औरंगाबाद प्रादेशिक विभागात एकूण ११ जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यापैकी औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड आणि जळगाव जिल्ह्यात स्वतंत्र पोस्ट पासपोर्ट केंद्र सुरू झाले असून याचा ३२ हजार नागरिकांना फायदा झाला आहे. लातूर येथे १८ ऑक्टोबर रोजी तर धुळे, हिंगोली, उस्मानाबाद, परभणी आणि भुसावळ जिल्ह्यात चार महिन्यांत पोस्ट पासपोर्ट केंद्रे सुरू होणार असल्याचे संचालक बी. अरुमुगम, सहायक निदेशक एस. एस. परळीकर यांनी सांगितले. 

 

केंद्रनिहाय पासपोर्ट वितरण 

औरंगाबाद १३ हजार 
जालना ५ हजार 
बीड ४ हजार 
नांदेड ४ हजार 
जळगाव ६ हजार 
एकूण ३२ हजार 

 

१५४ पोस्ट कार्यालयांतून आधार नोंदणी, दुरुस्ती सेवा 
प्रादेशिक विभागातील १५४ पोस्ट कार्यालयांत आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी केंद्र सुरू करण्यात आले आहे. नवीन आधार कार्ड नि:शुल्क दिले जाते, तर आधार कार्डातील चुका, नाव, फोटो आदी सुधारणा करण्यासाठी २५ रुपये शुल्क आकारले जाते. याचा एकूण २४ हजार ४४४ नागरिकांना फायदा झाला असून ४४४ नागरिकांना नवीन आधार कार्ड मिळाले आहे. २४ हजार नागरिकांनी आधार कार्डातील चुका दुरुस्त करून घेतल्या आहेत. या माध्यमातून डाक विभागाला सहा लाख रुपये महसूल मिळाला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...