आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाथर्डी- आपल्या मुलीशी प्रेमसंबंध ठेवणाऱ्या तरूणाला बंदुकीतून गोळी झाडून ठार मारण्याची घटना शनिवारी तालुक्यातील कामत शिंगवे येथे घडली. योगेश एकनाथ जाधव (२५) असे मृताचे नाव आहे. त्याला वाचवण्यासाठी गेलेले वडील किरकोळ जखमी झाले. त्यांना नगर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने कामत शिंगवे येथे तणाव निर्माण झाला. गोळी झाडणारा सेवानिवृत्त सैनिक पोपट गणपत आदमाने याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
योगेश जाधव (कामत शिंगवे) हा आदमाने (जवखेडे दुमाला) यांच्या ट्रॅक्टरवर चालक होता. योगेश व आदमाने याच्या मुलीचे प्रेमसंबंध होते. त्याची चर्चा गावात सुरू झाली होती. ही बाब मुलीचे वडील पोपट आदमाने यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मुलीला तंबी दिली. मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी योगेशच्या विरोधात त्यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रारही दिली. त्यानुसार योगेश याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.
पोलिस शोधत असल्याने योगेश फरार झाला होता. शुक्रवारी योगेशला अटकपूर्व जामीन मिळाल्याची माहिती पोपट आदमाने यांना समजली. त्याचा राग मनात धरून सेवानिवृत्त सैनिक असलेल्या आदमाने यांनी शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास योगेशचे घर गाठून त्याच्यावर आपल्याकडील रायफलीतून गोळी झाडली. यात योगेश जागीच ठार झाला. त्याला वाचवताना त्याचे वडीलही जखमी झाले आहेत.
ही घटना समजताच पोलिस तातडीने आले. त्यांनी आदमाने याला ताब्यात घेतले. पोलिस उपअधीक्षक मंदार जावळे व पाथर्डीचे पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी घटनास्थळी भेट दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनीही नंतर परिसराची पाहणी केली. सायंकाळी उशिरापर्यंत पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद नसल्याने सविस्तर तपशील समजू शकला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.