आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चाैथी कसाेटी/पहिला दिवस: ऑस्ट्रेलियातील एका मालिकेत तीन शतके ठाेकणारा पुजारा तिसरा भारतीय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी- जबरदस्त फाॅर्मात असलेल्या चेतेश्वर पुजाराने (नाबाद १३०) आपली लय कायम ठेवताना गुरुवारी यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध चाैथ्या कसाेटीत शानदार शतकाची नाेंद केली. यासह त्याच्या नावे या कसाेटी मालिकेत तिसऱ्या शतकाची नाेंद झाली. ऑस्ट्रेलियामध्ये एकाच मालिकेत तीन वा त्यापेक्षा अधिक शतके झळकावणारा पुजारा हा भारताचा तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी सुनील गावसकर व काेहलीने असा पराक्रम गाजवला आहे. 

 

पुजारा आणि सलामीवीर मयंक अग्रवालच्या (७७) शतकी भागीदारीच्या बळावर टीम इंडियाने मालिका विजयाच्या आपल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. यातून भारताने पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात ४ गड्यांच्या माेबदल्यात ३०३ धावा काढल्या. आता पुजारा आणि हनुमा विहारी (३९) हे दाेघे मैदानावर कायम आहेत. त्यांनी पाचव्या विकेटसाठी अभेद्य ७५ धावांची भागीदारी रचली आहे. ऑस्ट्रेलियाकडून वेगवान गाेलंदाज जाेश हेझलवुड, स्टार्क आणि नॅथन चमकले. हेझलवुडने दाेन, स्टार्क आणि नॅथनने प्रत्येकी एक विकेट घेतली. 

 

मालिका विजयाच्या माेहिमेला नाणेफेकीचा काैल मिळाला. त्यामुळे कर्णधार काेहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. लाेकेश राहुलला पुन्हा एकदा संधी देण्यात आली. मात्र, ताे यात सपशेल अपयशी ठरला. त्याने ६ धावांचे याेगदान देऊन आल्यापावली पॅव्हेलियन गाठले. त्याला हेझलवुडने दुसऱ्या षटकात बाद केले. टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहलीने आपला सहकारी चेतेश्वर पुजाराचे शतकानंतर खास अभिनंदन केले. पुजाराचे मालिकेमधील हे तिसरे शतक ठरले. यातून त्याला नवा विक्रम नाेंदवता आला. 

 

पुजारा-मयंकने सावरले; शतकी भागीदारी रचली 
पहिल्या विकेटमुळे अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाचा डाव सलामीवीर मयंकने आपला सहकारी चेतेश्वर पुजारासाेबत सावरला. या दाेघांनी ऑस्ट्रेलियन गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेताना दुसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. यासह त्यांनी टीमच्या धावसंख्येलाही गती दिली. दरम्यान, मयंक अग्रवालने आपला फाॅर्म कायम ठेवताना दुसऱ्या कसाेटीत दुसऱ्या अर्धशतकाची नाेंद केली. त्याने ११२ चेंडूंचा सामना करताना ७ चाैकार अाणि २ षटकारांच्या आधारे ७७ धावांची खेळी केली. त्याला नॅथनने झेलबाद केले. 

 

काेहलीच्या ३९९ डावांतून १९ हजार धावा पूर्ण; सचिनवर मात 
टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहलीला पहिल्या डावात समाधानकारक खेळी करता आला नाही. त्यामुळे ताे २३ धावा काढून तंबूत परतला. मात्र, यादरम्यान त्याने आपल्या इंटरनॅशनल करिअरमध्ये (कसाेटी, वनडे, टी-२०) वेगवान १९ हजार धावांचा पल्ला यशस्वीपणे गाठला. त्याने ३९९ डावांत हा आकडा पार केला आहे. यासह त्याने सचिनला मागे टाकले. सचिनच्या नावे ४३२ डावांत १९ हजार धावांचा विक्रम नाेंद हाेता. 

 

११०० पेक्षा अधिक चेंडू खेळणारा पुजारा तिसरा खेळाडू 
चेतेश्वर पुजाराने या मालिकेत शतकासह अजून एक पराक्रम गाजवला. त्याने एका मालिकेत आतापर्यंत ११३५ चेंडूंचा सामना केला. अशी कामगिरी करणारा ताे भारताचा तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी राहुल द्रविडने २००३-०४ मध्ये १०९३ आणि गावसकरने १९७७-७८ मध्ये १०३२ चेंडूंचा सामना केला हाेता. 

 

पुजाराचे सात डावांत तिसरे शतक 
भारताच्या पुजाराने चार कसाेटींच्या सात डावांत तिसऱ्या शतकाची नाेंद केली. तसेच ताे ऑस्ट्रेलियातील एका कसाेटी मालिकेत तीन शतके झळकावणारा भारताचा तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी २०१४-१५ मध्ये काेहलीने ४ सामन्यांतील ८ डावांत ४ शतके ठाेकली हाेती, तर सुनील गावसकरने १९७७-७८ च्या दाैऱ्यात ५ कसाेटी सामन्यांतील ९ डावांत ३ शतके साजरी केल्याची नाेंद आहे. पुजाराने २५० चेंडूंचा सामना करताना नाबाद १३० धावा काढल्या. यात १६ चाैकारांचा समावेश आहे. 

 

पुजारा-मयंकची शतकी भागीदारी 
२२ व्यांदा काेहलीने नाणेफेक जिंकली आहे. यातूनच त्याला आता मालिका विजयाचाही काैल मिळाला. त्याने १९ हजार धावाही पूर्ण केल्या.