रफालप्रकरणी न्यायालयात दिलेले / रफालप्रकरणी न्यायालयात दिलेले पुरावे खोटे; काँग्रेस प्रवक्ते अर्जुन मोढवाडिया यांचा आरोप

४१ हजार कोटींचे नुकसान कसे झाले हे स्पष्ट व्हावे- अर्जुन मोढवाडिया 

Dec 22,2018 10:18:00 AM IST

औरंगाबाद- मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर रफाल प्रकरणात सादर केलेले पुरावे खोटे आहेत. द डसॉल्ट एव्हिएशन कंपनीने आठ लाख रुपये उलाढाल असलेल्या रिलायन्स एअरपोर्ट लिमिटेडचे दहा रुपये किमतीचे शेअर्स २८४ कोटी रुपयांत खरेदी केले. असे का घडले, याची चौकशी का झाली नाही, असा सवाल करतानाच हीच रक्कम भाजप नेत्यांना कमिशन म्हणून मिळाली, असा थेट आरोप गुजरात भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष तथा आता काँग्रेसचे प्रवक्ते असलेले अर्जुन मोढवाडिया यांनी शुक्रवारी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, रफाल घोटाळा बाहेर येऊ नये यासाठी भाजपने संसदीय समितीच्या चौकशीपासून पळ काढला. काँग्रेसने बोफोर्स, टूजी प्रकरणाची संसदीय समितीमार्फत चौकशी केली. आता भाजपवर लपवाछपवीची वेळ आली आहे, कारण त्यांनी यात गडबड करून ठेवली आहे. संरक्षण खरेदी पद्धती, संरक्षण कॅबिनेट समिती आणि संरक्षण संपादन परिषदेला टाळून खरेदीचा करार करण्यात आला आहे. हवाई दलाला १२६ लढाऊ विमाने खरेदी करायची होती. मोदी यांनी विमानांची संख्या ३६ वर का आणली, याचे उत्तर त्यांनी दिले नाही. रफाल व्यवहारातील भ्रष्टाचार, विमानांची किंमत, मित्राला फायदा मिळवून देण्यासंबंधी चौकशी होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे आराखडा नाही. हे काम संसदीय समिती करू शकते, त्यामुळे भाजपने संसदेतील चर्चेऐवजी समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

४१ हजार कोटींचे नुकसान कसे झाले हे स्पष्ट व्हावे
यूपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बोलीनुसार प्रत्येक विमानाची किंमत ५२६ कोटी होती. या समीकरणानुसार ३६ विमानांची किंमत १८ ते १९ हजार कोटी रुपये व्हायला हवी. परंतु ही विमाने ६० हजार कोटीत का खरेदी करण्यात आली, याचे उत्तर मोदी का देत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. देशाचे सुमारे ४१ हजार कोटींचे नुकसान का व कसे झाले हे देशवासीयांना समजले पाहिजे, यासाठी आपण काहीही करू, असेही ते म्हणाले.

X