आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदच्युत पीएम विक्रमसिंघे समर्थक मंत्र्यास ओलीस ठेवण्याचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलंबो - श्रीलंकेतील राजकीय संकटात हिंसाचार उसळला आहे. पदच्युत पंतप्रधान रानिल विक्रमसिंघेंचे समर्थक पेट्रोलियम मंत्री व माजी क्रिकेटपटू अर्जुन रणतुंगांना सिलोन पेट्रोलियम कॉर्पाेरेशनच्या कार्यालयात ओलीस ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जमावावर त्यांच्या सुरक्षा रक्षकाने गोळीबार केला. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू तर दोघे जखमी झाले. जमावात सामील लोक नवनियुक्त पंतप्रधान महिंदा राजपक्षे समर्थक असल्याचे सांगण्यात येते. सुरक्षा रक्षकास अटक केली आहे. यादरम्यान संसदेचे सभापती कारू जयसूर्या यांनी मैत्रिपाला सिरिसेनांना पत्र लिहून विक्रमसिंघे पंतप्रधान असल्याचे सांगितले. विक्रमसिंघेंना लोकशाही व सुशासनासाठी जनमत मिळाल्याचे सभापतींनी सांगितले. सिलोन चर्चनेही राष्ट्राध्यक्षांचा निर्णय घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे.  


राष्ट्राध्यक्ष सिरिसेना यांनी विक्रमसिंघे यांना हटवण्याचा आपला निर्णय घटनात्मक असल्याचे म्हटले आहे. सिरिसेना यांनी सध्याच्या संकटात पहिल्यांदाच देशाला संबोधित करत सांगितले की, विक्रमसिंघे यांना अडेलतट्टूपणामुळे हटवावे लागले. 

 

राजपक्षेंकडे बहुमत नाही   
रानिल विक्रमसिंघेंच्या यूएनपीतील तामिळ वंशाचे नेते वाडीवेल सुरेश रविवारी राजपक्षे यांच्या समर्थनार्थ पुढे आले. यूएनपीतून राजपक्षे यांच्या गोटात येणारे हे दुसरे खासदार आहेत. श्रीलंकेच्या २२५ सदस्यीय सभागृहात राजपक्षे यांच्या पक्षाचे ९९ खासदार आहेत. बहुमतासाठी ११३ संख्याबळ असणे आवश्यक आहे. त्यांना सध्या १४ जागा कमी पडतात. यूएनपीजवळ १०५ खासदार आहेत. बहुमतासाठी या पक्षाकडे ८ जागा कमी आहेत. दरम्यान, राजपक्षे यांनी टीएनए नेते आर. संपथनशी दूरध्वनीवरून चर्चा करून पाठिंबा मागितला आहे.  

 

हट्टामुळे विक्रमसिंघेंना हटवले : सिरिसेना
विक्रमसिंघे यांनी चांगल्या प्रशासनाची कल्पना धुळीस मिळवली होती. भ्रष्टाचार सामान्य बाब झाली होती तसेच ते सरकार चालवताना मनमानी पद्धतीने निर्णय घेत होते. ते काही जवळच्या उद्योगपतींसाठी काम करत होते. त्यांना देशातील गरिबांची चिंता नव्हती. भ्रष्टाचार खुलेआम झाल होता,त्यामुळे सामूहिक निर्णय हा विनोदच झाला होता,असा आरोप राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना यांनी केला आहे.  सिरिसेना यांनी शुक्रवारी रात्री विक्रमसिंघे यांना पंतप्रधानपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

 

श्रीलंका संकटावर भारताची नाराजी 
श्रीलंकेतील राजकीय संकटावर भारत लक्ष ठेवून आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, एक लोकशाही व शेजारी मित्राच्या रूपात आम्ही श्रीलंकेतील लोकशाही मूल्य व घटनात्मक प्रक्रियेचा आदर केला जाईल,अशी आम्ही आशा करतो. आम्ही श्रीलंकेतील लोकांच्या विकासात सहकार्य ठेवत राहू.  

 

चीनकडून राजपक्षेंचे अभिनंदन :  श्रीलंकेतील राजकीय संकटात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी महिंदा राजपक्षे यांचे अभिनंदन केले आहे. राजपक्षे यांचे अभिनंदन करणारे जिनपिंग जगातील पहिले नेते आहेत. राजपक्षेंचा ओढा चीनकडे राहिलेला आहे.  

बातम्या आणखी आहेत...