आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सबरीमाला मंदिरात महिलांनी पूजा करून मोडली 800 वर्षांची परंपरा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सबरीमाला- सबरीमाला मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेशाची परवानगी नाही. परंतु ८०० वर्षांची ही परंपरा बुधवारी चाळिशीतील दोन महिलांनी मोडली. ४४ वर्षांच्या कनकदुर्गा व ४२ वर्षीय बिंदू यांनी भल्या पहाटेच मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करून यशस्वी पूजा केली. 

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या २८ सप्टेंबर रोजी महिलांवरील ही बंदी हटवली होती. परंतु अयप्पा भक्त व हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधामुळे २० हून जास्त महिला पूजेविना परतावे लागले होते. अनेक वेळा प्रयत्न करुनही मंदिरात प्रवेश करण्यात महिलांना यश मिळाले नव्हते. अखेरी बुधवारी काळे कपडे परिधान केलेल्या दोन महिलांनी पहाटे ३ वाजून ३८ मिनिटांस मंदिरात प्रवेश करून पूजा केली. त्यानंतर भगवान अयप्पा यांच्या मंदिरात दोन महिलांच्या प्रवेशाची बातमी केरळच्या अनेक जिल्ह्यांत वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर तिरुवनंतपुरममध्ये भाजप कार्यकर्त्यांनी या विरोधात मोर्चा काढला होता. तो हिंसक बनला. त्यामुळे पोलिसांना अश्रुधुराचा मारा करावा लागला. दुसरीकडे मुख्य पुजाऱ्याने भाविकांना बाहेर काढून मंदिराचे दार बंद केले होते. पण तासाभराच्या शुद्धीकरण विधीनंतर दार पुन्हा उघडण्यात आले. 

 

केरळमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी केले महामार्ग, बाजारपेठाही बंद 
मंदिरात प्रवेश करणाऱ्या कोइलांडी येथील बिंदू (४२) व मलाप्पुरमच्या अंगाडीपुरम येथील कनकदुर्गा (४४) अशी पूजा करणाऱ्या महिलांची नावे आहेत. बिंदू महाविद्यालयात प्राध्यापक आहेत व डाव्या चळवळीच्या कार्यकर्त्याही आहेत. कनकदुर्गा नागरी पुरवठा विभागाच्या कर्मचारी आहेत. या दोघी पोलिस बंदाेबस्तात पंबा ते सन्निधानममध्ये पोहोचल्या व मंदिरात प्रवेश केला. दर्शनानंतर पोलिस त्यांना अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. बिंदू म्हणाल्या, पूजेदरम्यान अयप्पा भक्तांनी त्यांना विरोध केला नाही. 

 

तिरुवनंतपुरममध्ये भाजप कार्यकर्त्यांवर अश्रुधुराचा मारा 
मंदिरात महिलांना प्रवेशाचा हक्क मिळावा यासाठी केरळमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू झाली आहेत. तिरुवनंतपुरममध्ये राज्य सचिवालयासमोर भाजपने जोरदार निदर्शने केली. आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. त्याचबरोबर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी पाण्याचाही मारा केला. अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. कोल्लममध्ये पोलिस व मीडियावरही हल्ला झाल्याचे वृत्त आहे. कोची, पत्थनमिट्टा, तिरुवनंतपुरम व कोल्लममध्ये अनेक ठिकाणी निदर्शने झाली. देवस्वाम मंत्र्यांचे सुरेंद्रन व आरोग्य मंत्री के.के. शैलजा यांना लोकांनी काळे झेंडे दाखवले. सबरीमाला कर्मा समितीने गुरूवारी बंदचे आवाहन केले. 

 

सरकारने अयप्पा भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्या आदेशानेच पोलिसांनी महिलांना मंदिरापर्यंत पोहोचवले. शुद्धीकरण करणे १०० टक्के योग्य आहे. -रमेश चेन्निथाला, काँग्रेस 

सबरीमाला मंदिरात कम्युनिस्ट नेता, त्यांच्या भावी पिढ्या व केरळ सरकार असे कोणीही भगवान अयप्पांच्या कोपापासून वाचू शकणार नाही. -पीएस श्रीधरन पिल्लई, भाजप.