आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जालना- शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या बैठकीस विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी रविवारी सकाळी ९.४५ वाजता लाठीमार केला. यानंतर बंदोबस्तात भिडे यांची नियोजित बैठक आर्य समाज भवन येथे पार पडली. याप्रसंगी ताब्यात घेतलेल्या निदर्शकांना पोलिस वाहनात घालून नेत असताना कार्यकर्त्यांनी बैठकस्थळासमोर येऊन जोरजोरात घोषणाबाजी करत अंडे फेकले. यामुळे अजून तणाव निर्माण झाला होता. विविध ठिकाणी होत असलेल्या विरोधामुळे पोलिसांकडून ४९ जणांना ताब्यात घेतले होते.
संभाजी भिडे यांच्या वतीने गडकोट मोहिमेबाबत जनजागृती व बत्तीस मण सुवर्ण सिंहासनाबाबत माहिती देण्यासाठी रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस दलित संघटनांसह संभाजी ब्रिगेडकडून विरोध दर्शवला होता. रविवारी सकाळपासूनच शहरातील विविध चौकांत मोठा बंदोबस्त तैनात होता. मात्र बैठक सुरू होण्याच्या अर्धा तास अगोदर १५ ते २० कार्यकर्ते दुचाकीवर घोषणाबाजी देत कार्यक्रमस्थळी पोहोचले. यावेळी विरोध व घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी जोरदार लाठीमार सुरू करीत त्यांना ताब्यात घेतले. बंदोबस्तासाठी अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत ढवळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, विशेष कृती दलाचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांच्यासह पोलिस दलातील कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने कुमक होती.
गडकोट मोहीम २७ जानेवारीपासून, सहभागी व्हा
दुर्ग राजगडावर गडकोट मोहीम २७ ते ३० जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. यात हजारो युवकांनी सहभागी होण्याचे आवाहनही संभाजी भिडे यांनी केले. बैठकीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सकाळी ९ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत गोंधळ सुरु होता. यामुळे मुख्य बाजारपेठही दिवसभर कोलमडलेली होती.
युवकांना केले प्रेरित
भारत देशाचा धर्म विश्व धर्म आहे. संपूर्ण जगात कोठेही नाही ते भारत देशात आहे. त्यामुळे आपण श्रेष्ठ असल्याचे भिडे यांनी सांगितले. युवकांना प्रेरित करण्यासाठी भिडे यांनी महाभारत, रामायण, कवी कालिदास यांची अनेक उदाहरणे दिली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव घेताच माणसाच्या अंगात स्फुरण चढते. त्यांच्या विचारांची ज्वाला सतत तेवत ठेवावी. त्यांच्या विचारांची आज राष्ट्राला नितांत गरज असल्याचे सांगून शिवाजी महाराज व संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासोबतच ते टिकवण्यासाठी केलेल्या कष्टांची माहिती त्यांनी युवकांना दिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.