आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धवसाहेब किती वेळा नागरिकांची माफी मागणार? शिवसेना खासदारांनी दत्तक घेतलेल्या गावांत काळोखच!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- विकास आणि सर्वसामान्यांचे प्रश्न, असे मुद्दे उचलून शिवसेनेने सातत्याने भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर हल्ले चालवले आहेत. मात्र, सत्तेतील वाटेकरी असलेल्या शिवसेनेच्या खासदारांनी दत्तक घेतलेल्या आपल्या गावांकडे किती लक्ष दिले किंवा औरंगाबादसारख्या बालेकिल्ल्यात सामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या प्रश्नांविषयी शहरातील या पक्षाच्या नेत्यांनी किती जबाबदारीने कामे केली याचा आढावा घेतला तर वास्तव चित्र वेगळेच दिसते. याची साक्ष देणारी ही काही उदाहरणे... 

 

शहरातील कचरा तिथेच अन् महापौरही तिथेच!
- उद्धवसाहेब, ऐन कचराकोंडीच्या काळात आपण १९ एप्रिल रोजी औरंगाबाद शहरात आलात. सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पाहून तुम्ही 'तुमच्या संभाजीनगर'वासीयांची माफी मागितली. १० दिवसांत शहर स्वच्छ करण्याचे आदेश दिलेत. महापौर नंदकुमार घोडेलेंनीही आदेश पाळत शहरातील कचरा जागा दिसेल तेथे कोंबला व १ मे रोजी शहर कचरामुक्त जाहीर केले. याला ८ महिने लोटले. १० दिवसांत शहर स्वच्छ करणारे महापौर व कचरा उचलल्यानंतर पुन्हा झालेला कचरा आज तेथेच आहे.

 

चिकलठाणा, पडेगाव, हर्सूल येथे कचरा प्रकल्प ३१ मार्च २०१९ पर्यंत सुरू झालेले असेल असा दावा आपलेच महापौर करत होते. प्रत्यक्षात अजून हर्सूल येथील जागाही निश्चित झालेली नाही. चिकलठाण्यात कचरा नुसता नेऊन टाकला जातो. पडेगावातही अजून काहीही काम झाले नाही. आजही आपली महापालिका मोकळी जागा दिसेल तेथे कचरा टाकून मोकळी होते. शहराच्या वैभवात भर घालणारे विभागीय ग्रंथालय सिल्लेखान्यात आहे. वेळात वेळ काढून आपण जर तेथे गेलात तर हे वैभव आता कचऱ्याच्या ढिगाऱ्यात लवकर दिसत नाही आणि कोणाला दिसलेच तर तेथे थांबवत नाही. असेच दृष्ये तुम्हाला शहरातील विविध ऐतिहासिक दरवाजांच्या बाजुलाही दिसेल. चित्र दिसले की मी वस्तुस्थिती स्वीकारून माफी मागतो, असे तुम्ही म्हणणार? पण साहेब किती वेळा? 
 
खासदार खैरे साडेचार वर्षांत तीनदाच आले दत्तक गावात 
कन्नड तालुक्यात आडगाव (पिशाेर) शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी दत्तक घेतले. नंतर ४ वर्षांत त्यांनी केवळ तीनदा गावाला भेट दिली. पंतप्रधान माेदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत खैरे यांनी सांसद आदर्श ग्राम याेजनेअंतर्गत हे गाव दत्तक घेतले. डिसेंबर २०१४ मध्ये विकासाचे नारळही फाेडण्यात आले. सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या या गावात ४४ विकास कामांचे उद‌्घाटन करण्यात आले. यातील २६ कामे पूर्ण झाली असली तरी अंगणवाडी, राष्ट्रीयीकृत बँक, बस थांबा, सार्वजनिक शौचालय, पाणीपुरवठा, आराेग्य केंद्र अशी १८ कामे शिल्लक आहेत.
 
खासदार जाधवांचे हे दत्तक गाव; पिण्यासाठी पाणी तर नाहीच, चालायला रस्ताही नाही... 
शिवसेना खासदार संजय जाधव यांनी केहाळ (ता. जिंतूर) हे गाव दत्तक घेतले. साडेचार वर्षांत विकास तर साेडाच, गावकऱ्यांना ना पाणी मिळाले, ना रस्ता. आजवर खा. जाधव तीनच वेळा गावात आले. गेल्या वर्षभरात तर ते फिरकलेच नाहीत. गटातटाच्या राजकारणामुळे कोणतेही मोठे काम गावात होऊ शकलेले नाही. पावसाळ्यात गावाचा संपर्क आजही तुटतो. अंतर्गत रस्त्याची अवस्था तर त्याहूनही वाईट. आरोग्य उपकेंद्राची दुरवस्थाच आहे. आतापर्यंत झालेल्या दोन पाणीपुरवठा योजना अयशस्वी ठरल्या. त्यामुळे खासगी शेतकऱ्यांनी विहिरीवरून दिलेल्या पाण्यावरच गावाची तहान भागते. राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली आहे. परंतु, ती देखील प्रशासकीय लालफितीत अडकली आहे. चार वर्षापुर्वी गावाचा समावेश सांसद आदर्श ग्राम योजनेत झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निधीतून पाच कोल्हापुरी बंधारे झाले. आदिवासी उप योजनेतून मिळालेल्या २३ लाखांतून आदिवासी वसाहतीत रस्ते तेवढे झाले. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून जुन्या बंधाऱ्याचे खोलीकरण झाले. २६५ घरकुलाची कामे झाली. १७५ शौचालये उभारली गेली. या व्यक्तिरिक्त रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, वेअर हाऊस, माथा ते पायथा बंधारे ही कामे झालीच नाहीत. गाव पातळीवरील राजकारणाचा परिणाम गावाचा विकासावर झाल्याचे दिसून येते.

बातम्या आणखी आहेत...