Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | news about solapur municipal corporation meeting

सभा तहकुबी वाढल्यामुळे विरोधी पक्षाच्या नगरसेविकांनी उतरवली महापौरांची आरती

प्रतिनिधी | Update - Aug 31, 2018, 11:12 AM IST

महापालिकेच्या सभा वेळेत होत नाहीत, झाल्याच तर तहकूब होण्याचे प्रमाण जास्त, शुक्रवारीही काहीसे तसेच होत होते म्हणून विरोध

 • news about solapur municipal corporation meeting

  सोलापूर- महापालिकेच्या सभा वेळेत होत नाहीत, झाल्याच तर तहकूब होण्याचे प्रमाण जास्त, शुक्रवारीही काहीसे तसेच होत होते म्हणून विरोधी पक्षाच्या नगरसेविकांनी गांधीगिरी करत महापौरांचीच ओवाळणी केली. कारभाराचा निषेध केला. सभा सुरू झाल्यानंतर आयुक्तांबरोबर नगरसेवकांचा वाद झाला, त्यातून अधिकाऱ्यांनी सभागृह सोडले, नंतर आलेही. दरम्यान, वादाचा मुद्दा ठरलेला. एलईडीचा मक्ता कर्नाटका स्टेट ऐवजी ईईएसएल या कंपनीस देण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला.


  महापालिकेची आॅगस्ट महिन्यातील तहकूब झालेली सर्वसाधारण सभा ३० आॅगस्ट रोजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी बोलावली होती. त्यात डांबर खरेदी, एलईडी दिव्यांचा मक्ता देणे आदी महत्त्वाचे विषय होते. एलईडीच्या मूळ प्रस्तावास बगल देत पुरवणी कागदपत्रे जोडत शासन मान्य ईईएसएल कंपनीस मक्ता देण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी सभागृहापुढे ठेवला. अचानक चर्चेचा प्रस्ताव असल्याने महापौर बनशेट्टी यांनी सभेपूर्वी बंद खोलीत गटनेत्यांबरोबर चर्चा केली. विषयास मान्यता देण्याचे ठरले, पण त्यापूर्वी सदर कंपनीने यापूर्वी कोणत्या शहरात काम केले आहे, ते पाहून त्यातील त्रुटींचा शोध घेण्याचे ठरले. त्यानुसार सभागृहात चर्चा होऊन प्रस्तावास मान्यता देण्यात आली. बसपाचे आनंद चंदनशिवे यांनी विरोध केला.


  आजवर सभा वेळेत झाल्या नाहीत, तहकूब करताना ताळमेळ नसतो. गुरुवारी सभा वेळेत सुरू झाली नाही म्हणून काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे, वैष्णवी करगुळे, फिरदोस पटेल, सुनीता रोटे, माकपच्या कामिनी आडम आणि परवीन इनामदार आदी आक्रमक झाल्या. प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली. महापौरांच्या फलकास आरती केली. महापौर सभागृहात येताना त्यांचीही आरती करत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. हा गोंधळ सुमारे अर्धा तास सुरू होता.


  सभागृहात मंजूर झालेले प्रस्ताव
  - सिटीबसमध्ये कोठेही फिरा शहरात रोज ४० तर ग्रामीण ८० रुपये.
  - पालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासन वेतन नुसार देणे.
  - चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना कपड्यांसह इतर साहित्य देणे.
  - दिवे दुरुस्तीकरिता साहित्य खरेदी
  - मनपा न्यायालयात बंद करणे सूचना व उपसूचनासह मंजुरी
  - आॅनलाइन मिळकत कर भरणाऱ्यांना ६ टक्के सूट.
  - सूरज चन्ना यांना आर्थिक मदत
  - २५० टन डांबर आवश्यकतेनुसार खरेदी करणे.
  - एलईडी दिवे बसवण्यासाठी ईईएसएल कंपनीस काम देणे


  झाडूवाल्यांची अडचण कोण ऐकणार
  चुतर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप करण्यास मान्यता देण्यात आली. पण त्यांना दोन वर्षातून एकवेळ कपडे देणे आवश्यक असताना तीन वर्षांपासून दिले नाही. यावरून नगरसेवक चंदनशिवे यांनी प्रशासनास लक्ष करत त्यांच्यासाठी मुतारी, वाहन व्यवस्थासह इतर सुविधा महापालिका काहीच कारवाई करत नसल्याचे चंदनशिवे आणि प्रा. नारायण बनसोडे यांनी सांगितले.


  आयुक्त व गटनेत्यांमध्ये खडाजंगी
  एलईडी प्रस्तावाची माहिती देण्यासाठी सर्व गटनेत्यांना महापौरांनी बोलावले होते. त्यावेळी आयुक्त डॉ. ढाकणे तेथे आले. तेथे नगरसेवक नागेश वल्याळ होते. ते म्हणाले, मी वल्याळ यांना माहिती देणार नाही गटनेत्यांना देणार. त्यांच्या प्रश्नास मी उत्तर देणार नाही. त्यास महापौर बनशेट्टी यांनी आक्षेप घेत माझे कार्यालय आहे, असे म्हणत वल्याळ यांना तेथे बसवले. पण वल्याळ काही वेळाने तेथून बाहेर पडले.


  विधान सल्लागारांची माहिती सादर करा
  अवमान याचिकेवरून नगरसेवक हंचाटे यांनी विधानसल्लागार यांच्याबाबत प्रश्न केला. त्यांच्यामुळे मनपास किती नुकसान झाले याची माहिती सादर करा असा आदेश महापौर यांनी दिला.


  सभागृहात यायचे कशाला?
  जुळे सोलापुरातील पाण्याच्या टाकीच्या जागेप्रकरणी एम. एन. वडवान यांनी याचिका दाखल केली. त्यासाठी न्यायालयाने निकाल दिला. त्यानुसार वडवान यांना चार कोटी देण्यासाठी भांडवली निधीतून रक्कम देण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी सादर केला. भांडवली निधी बंद आहे म्हणता मग येथे निधी कसा देता? हा मुद्दा पकडत महापालिका आयुक्तांनी भांडवली निधीचे कामे थांबवल्याने नगरसेवक आक्रमक झाले. नगरसेवक चेतन नरोटे यांनी आयुक्तांना लक्ष्य करत निधीची मागणी केली. १२०० कोटींच्या बजेटला हात वर करून मान्यता द्यायचे आणि शहर विकासासाठी ३२ कोटी निधी मिळत नसेल तर सभागृहात यायचे कशाला? असा प्रश्न उपस्थित केला. नगरसेवक चंदनशिवे, श्रीदेवी फुलारे, संजय कोळी, अमोल शिंदे, नागेश वल्याळ, किसन जाधव यांनी निधीची मागणी करत आयुक्तांना जाब विचारला. आयुक्त डॉ. ढाकणे यांनी महापालिकेची आर्थिक स्थिती स्पष्ट करत तूर्त निधी नसल्याचा पुनरूच्चार केला.


  अधिकाऱ्यांनी केला सभात्याग
  सभा सुरू झाल्यानंतर आयुक्त हे बसून माहिती देत होते, त्यास नगरसेवक नागेश वल्याळ, संतोष भोसले, श्रीनिवास करली यांनी आक्षेप घेतला. तो सभागृहाचा अपमान आहे अशी भूमिका घेतली. आयुक्तांनी नियम सांगत उभे राहून उत्तर देण्यास नकार दिला. आयुक्तांचा अपमान झाल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी एकजूट दाखवत सभात्याग केला. अधिकारी आक्रमक झाल्याने नगरसेवकांनी नमती भूमिका घेतली. काही काळानंतर अधिकारी सभागृहात आले आणि कामकाज पूर्ववत झाले.

Trending