आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संयुक्ताचा मृत्यू, सोमनाथची आत्महत्या प्रेमसंबंधांतून; पोलिस तपास त्या दिशेने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- विजयपूरच्या गोलघुमटवरून उडी घेतलेल्या सोमनाथ अप्पासाहेब तरनाळकरने सोमवारी संयुक्ता भैरीला मोबाइलवर संपर्क साधला होता. अकोलेकाटी-मार्डी परिसरातील शिवारात दोघेही उपस्थित होते, हे मोबाइलच्या ट्रॅकरवरून पोलिस तपासात समोर आले आहे. प्रेमसंबंधांतूनच दोघांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. 


दरम्यान, मंगळवारी सकाळी संयुक्ताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले. विषबाधा झाल्याचा प्रकार अहवालात पुढे आला. परंतु हे विष संयुक्ताने स्वत:हून घेतले की, तिला पाजले गेले याचा छडा लागलेला नाही. 'व्हिसेरा' पुण्याच्या प्रयोगशाळेला पाठवण्यात आलेला आहे. त्याच्या अहवालातून ते स्पष्ट होईल, असेही पोलिस म्हणाले. अकोलेकाटी मार्डी परिसरात सोमवारी सायंकाळी संयुक्ता रमेश भैरी (वय २१, रा. मार्कंडेय वसाहत, विडी घरकुल) या तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. 


संयुक्ता ही दयानंद महाविद्यालयात वाणिज्य विभागात तृतीय वर्षात शिकत होती. सोमनाथदेखील याच महाविद्यालयात शिकत होता. तो मूळचा कोडूर (कलबुर्गी) गावचा. येथील भवानी पेठ मड्डी वस्तीत एका खोलीवर राहत होता. सोमवारी अकाेलेकाटी- मार्डी परिसरात घडलेल्या घटनेनंतर तो थेट विजयपूरच्या दिशेने गेला. गोलघुमटवर चढला. प्रतिध्वनी ऐकू येत असलेल्या ठिकाणाहून त्याने आतून उडी घेतली. शंभर फूट खाली रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याचे शवविच्छेदन विजयपूर शासकीय रुग्णालयात झाले. तिथून कोडूर गावाकडे नेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 


विजयपूरमध्ये नोंद
सोमनाथच्या आत्महत्येबाबत गोलघुमट पोलिसांत आत्महत्येची प्राथमिक नोंद अाहे. मंगळवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत अधिक तपास केला जाईल. सोलापूरचे पोलिसही विजयपूरच्या पोलिसांशी संपर्क ठेवून आहेत. विजयपूर येथील घटनेचा तपास हवालदार जे. गंगाधर करत आहेत. 


काही अनुत्तरित प्रश्न... 
१. संयुक्ता आणि सोमनाथ अकोलेकाटी, मार्डी परिसराकडे का गेले? कसे गेले? 
२. विषद्रव्य कुणी सोबत आणलेले होते? ते संयुक्ताने प्यायले की तिला पाजले? 
३. दोघांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असेल तर सोमनाथ विजयपूरकडे का गेला? 
४. दोघांशिवाय आणखी कोणी आहेत का? असतील तर कोण असावेत? 


शवविच्छेदन अहवालात संयुक्ताचा मृत्यू विष घेतल्याने झाल्याचे समोर आले आहे. तिने स्वतःहून घेतले की, कोणी पाजले आहे, याचा शोध सुरू आहे. याच महाविद्यालयातील विद्यार्थी सोमनाथ तरनाळकर याने विजयपूर येथे आत्महत्या केली. त्यांनी हा प्रकार का केला, याचा शोध घेत आहोत. 
- विजय पाटील, पोलिस निरीक्षक, सोलापूर तालुका ठाणे 


संयुक्ताच्या कुटुंबीयांकडून फिर्याद नाही 
या घटनेबाबाबत मंगळवारी रात्री साडेदहापर्यंत पोलिसांत फिर्याद दाखल झालेली नव्हती. संयुक्ताच्या नातेवाइकांनी फिर्याद दिली नाही. तर पोलिस स्वत:हून फिर्याद देतील, अशी शक्यता अाहे. मंगळवारी अंत्यविधी असल्याने पोलिसांनी नातेवाइकांशी संपर्क केला नाही. बुधवारी याबाबत आवश्यक त्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून घेण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...