आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेबसाइटवर सर्वांनाच कळेल आपल्या शहरातील हवेचा दर्जा, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्टार रेटिंग ठरणार गेम चेंजर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महाराष्ट्रातील १७ शहरे हवा प्रदूषणाच्या बाबतीत अति धोकादायक श्रेणीत आहेत. वाढते औद्योगिकीकरण, वाहतूक, खराब रस्ते आणि बांधकामांमुळे हवेचे प्रदूषण वाढत आहे. अशा परिस्थितीत आपण श्वास घेत असलेल्या हवेची गुणवत्ता काय? हे जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. यासाठीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने भारतात प्रथमच उद्योगांसाठी स्टार रेटिंग प्रणाली सुरू केली आहे. याच्या वेबसाइटवर आपल्या भागातील हवेची स्थिती समजू शकते, अशी माहिती हवा प्रदूषण तज्ज्ञ आणि महापरिवेश संस्थेच्या संस्थापक संचालिका डॉ. गीतांजली कौशिक यांनी दिली. 


महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) स्टार रेटिंग उप्रक्रमाची माहिती देण्यासाठी डॉॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले

 

होतेे. यात कौशिक यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी विभागप्रमुख प्रा. डॉ. सतीश पाटील, प्रा.डॉ. एन.एन.बंदेला, जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.अरविंद छेल यांची प्रमुख उपस्थिती होती. गीतांजली कौशिक म्हणाल्या, एमपीसीबीने सुरू केलेल्या फाइव्ह स्टार रेटिंग प्रणालीमध्ये उद्योगांना धूलिकण उत्सर्जनावर आधारित एक ते पाच स्टार असे रेटिंग दिले जाते. अधिक घातक वायु उत्सर्जन करणाऱ्या उद्योगांना १ स्टार, तर कमी उत्सर्जन करणाऱ्या उद्योगांना ५ स्टार दिले जातात. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत ५ जून २०१७ रोजी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली, असे काैशिक यंानी सांगितले. प्रा. पाटील यांनी स्टार रेटिंग हे प्रदूषण नियंत्रणासाठी गेम चेंजर असल्याचे प्रतिपादन केले. 

 

औरंगाबादेत २७ पैकी २२ कारखाने प्रदूषित : स्टार रेटिंग कार्यक्रमात एमपीसीबीने वर्षभरात राज्यात २५२ उद्योगांचेच रेटिंग केले. या अंतर्गत औरंगाबादेतील २७ पैकी २२ कारखाने प्रदूषित श्रेणीत आले. १२ उद्योगांना अति प्रदूषित श्रेणीतील १ स्टार रेटिंग, १० उद्योगांना २ स्टार रेटिंग, तर २ उद्योगांना ३ स्टार रेटिंग मिळाले आहे. एकही कंपनी प्रदूषण न करणाऱ्या ४ किंवा ५ रेटिंगपर्यंत पोहोचू शकलेली नाही. सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांत बिअर, पॉलिस्टर, औषधी, साखर कारखान्यांचा समावेश आहे. यापूर्वी नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (निरी) ने २० एप्रिल २०१७ ला राज्यातील सर्वाधिक प्रदूषित १७ शहरांची यादी सादर केली होती. त्यातही औरंगाबादचा समावेश होता. 

 

बालकांना धूलिकण अधिक त्रासदायक 
हवेतील सर्वाधिक धोकादायक घटक म्हणून हवेत तरंगणारे धूलिकण म्हणजेच सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर (एसपीएम) आणि श्वसनावाटे शरीरात प्रवेश करणारे रेस्पायरेबल सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर (आरएसपीएम) असतात. त्यांचे प्रमाण वाढल्याने डोळ्यांत जळजळ, घसा दुखणे, नाक वाहणे, खोकला, हृदयविकार, छातीदुखी असा त्रास जाणवतो. यात प्रामुख्याने अॅलर्जी, वृद्ध, दमा असणारे तसेच छोट्या बालकांना अधिक त्रास होतो. 


येथे उपलब्ध अाहे सर्व माहिती 
आपल्या भागातील हवेची गुणवत्ता काय आहे हे तपासण्यासाठी आता http://mpcb.info/ या वेबसाइटवर सर्व माहिती मिळू शकते. वेबसाइटवर आपला जिल्हा आणि संबंधित स्टार, उद्योगाचे प्रकार टाकल्यास सर्व माहिती उपलब्ध होतेे. 
 

 

बातम्या आणखी आहेत...